महाराणी येसूबाईंच्या भूमिकेतले अमृता खानविलकरचे फोटो व्हायरल
तोडी नाक तबला ने फोडी नाक पेटी
मी नेहमीच म्हणतो, आपल्या देशातील चित्रपट प्रेक्षक संस्कृतीचे मोजदाद करणारा असा कोणताही तराजू, थर्मामिटर, कॉम्प्युटर, मोजमाप नाही. तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटेल, पूर्वी काही चित्रपट एकाच गाण्याच्या लोकप्रियतेवर सुपर हिट ठरत. त्या चित्रपटात फार काही पाहण्यासारखे नसे वा जे असे ते फारसं रंगतदार नसे. पण त्यातले एक गाणे देखील पब्लिकचा पैसा वसूल करुन देई. अरुण भट्ट दिग्दर्शित “वरदान” या चित्रपटातील
होशियार रहेना खबरदार रहेना
दुनिया मे रहना है तो खबरदार रहेना
तोडी नाक तबला ने फोडी नाक पेटी
या एका गाण्याच्या लोकप्रियतेवर चित्रपट बर्यापैकी लोकप्रिय ठरला. हा चित्रपट २९ ऑक्टोबर १९७४ रोजी सेन्सॉर संमत होऊन मुंबईत हा चित्रपट ७ नोव्हेंबर १९७४ रोजी प्रदर्शित झाला. मुंबईत या चित्रपटाचे मेन थिएटर गंगा येथे “वरदान” ने शंभर दिवसांचा मुक्काम केला. (गुगलवर हा चित्रपट १९७५ साली प्रदर्शित झाल्याचे म्हटलंय पण तसे नाही.)
हे गाणे पडद्यावर साकारलयं मेहमूदने. “वरदान”मध्ये विनोद मेहरा व मौशमी चटर्जी नायक नायिका आहेत. पण लक्षात राहिला मेहमूदचा तोडी नाकचा ठेका आणि ठसका. मेहमूद (mehmood) हिंदी झालेच पण भारतीय चित्रपटसृष्टीतील एक अफलातून विनोदी अभिनेता. कोणी त्याला आपला आदर्श मानले तर कोणी त्याची नक्कल केली. लहानपणापासून मेहमूदच्या गाण्यावर नाचतो म्हणून ज्युनियर मेहमूदही अनेक चित्रपटांत चमकला.
मेहमूद (mehmood)ने अनेक प्रकारच्या व्यक्तीरेखा साकारताना अनेक प्रकारचे गेटअप केले. रसिकांना भरपूर हसवले. त्यानेच दिग्दर्शित केलेल्या “कुंवारा बाप” (१९७४) मध्ये प्रेक्षकांना हसवता हसवता डोळ्यात पाणी देखील आणले. मेहमूदने रुपेरी पडद्यावर साकारलेली विविध प्रकारची गाणी हा देखील एक कौतुकाचा फंडा.
अगदी रोमॅन्टीक गाण्यांपासून मेहमूद रुपेरी पडद्यावर खुललाय. बेटी बेटे या चित्रपटातील गोरी चल ना हंस की चाल, ससुरालमधील जाना तुम्हारे प्यार मे, हमराहीमधील वो दिन याद करो ही प्रेमाची गाणी आवर्जून पहा. मेहमूद (mehmood)चा शुभा खोटे यांच्यासोबत रुपेरी पडद्यावर प्रेमाविष्कार खुललाय. हाच मेहमूद कुंवारा बापमध्ये आरी आजा निंदीया या अंगाई गीतातही तितक्याच संयमाने वावरतो. गुमनाममधील हम काले है तो क्या हुआ हम दिलवाले है या स्वप्नगीतात हेलनसोबत तितक्याच चपळतेने लवचिकपणे बेभान नाचताना दिसतो. प्यार किये जा चित्रपटात ओ मेरी मैना मानले मेरा कहना या प्रेमगीतातील मुमताजसोबतची धमाल.
त्यानेच दिग्दर्शित केलेल्या “कुंवारा बाप” मधील हिजड्यांसोबतच्या सज रही गली मेरी मा या गाण्यात तो आपला पिता मुमताज अलीसह खुललाय. मेहमूद (mehmood)ला कोणत्याही प्रसंगातील गाणे व्यर्ज नव्हतेच. म्हणून तर जो “मै सुंदर हू” या चित्रपटातील “हीरो” नाच मेरी जान फटाफट गाण्यावर जयश्री टी.सोबत नाचतो तोच “दो फूल”मध्ये रमा प्रभासोबत नाचत चेन्नईतील समुद्र किनाऱ्यावर लुंगी नेसून मुत्तुकोडी कव्वाडी हडाचाही मूड पकडतो. (समुद्रातून माझ्यासाठी मोती घेऊन ये असे या गाण्याचे बोल आहेत.), हाच मेहमूद “लाखों मे एक” या चित्रपटातील चंदा हो चंदा किसने चुराई तेरी मेरी निंदीया या अंगाई गीतात हळवा होतो तर त्याच चित्रपटातील जोगी ओ जोगी प्यार कैसा होगा या प्रेमगीतात मोकळा नाचतो. अशी आणखीन किती उदाहरणे द्यायची? आणखीन गाणी आहेत, तरी ही त्याचं अष्टपैलुत्व अधोरेखित करण्यास पुरेशी.
विनोदाचे उत्तम टायमिंग असलेला मेहमूद (mehmood) अनेकदा हीरोपेक्षा जास्त भाव खाऊन जायचा म्हणून हळूहळू काही हीरोंनी त्याचाच पत्ता कट करायला सुरुवात केली. तोपर्यंत मेहमूद “कथेचा नायक” झाला आणि मस्ताना, अलबेला, लाखों मे एक, हंगामा अशा चित्रपटात नायक झाला. अरुणा इराणीशी त्याची जोडी जमली. दो फूलमध्ये डबल रोल तर हमजोली चित्रपटात तिहेरी भूमिकेत चमकला. कुंवारा बापपासून दिग्दर्शकही झाला. त्यानंतर मात्र तो जीनी और जानी, एक बाप छे बेटे, जनता हवालदार अशा प्रत्येक चित्रपटापासून ढेपाळत गेला….
==============
हे देखील वाचा : ‘दोस्ती’ची साठी, गाणी आजही लोकप्रिय!
==============
गाण्यातील मेहमूद ही एक मस्त कलरफुल व विविधरंगी “स्टोरी” आहे. “वरदान” चित्रपटाला पन्नास वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त पटकन काय आठवले? मेहमूद (mehmood)ने अतिशय मजेशीरपणे पडद्यावर साकारलेले तोडी नाक तबला… यू ट्यूबवर हे गाणे आवर्जून एन्जाॅय करा. आज डिजिटल युगात फक्त एक गाणे आपण पाहू शकतोय, पूर्वी मात्र अशा एकाच गाण्यासाठी अख्खा चित्रपट पाहण्यासाठी सिंगल स्क्रीन थिएटर्सला जायची तयारी असे….हा कदाचित वेडेपणा वाटेल पण होता खरा.