नासा टॉम क्रुझला घेऊन करणार आंतराळात शुटींग!!!
हॉलिवूडवाले कुठला चित्रपट काढतील याचा नेम नाही. आणि काढल्यावर त्यात किती मारहाण करतील याचाही नेम नाही. आता याच हॉलिवूडचा टॉप हिरो टॉम क्रुझ आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर म्हणजेच स्पेस सेंटरवर एका चित्रपटाचे शुटींग करणार आहे. खुद्द नासाने ही बातमी जाहीर केली आहे, म्हणजेच हॉलिवूड आणि टॉम क्रुझच्या चाहत्यांना अनोखी मेजवानी ठरणार आहे.
नासाचे प्रवक्ते जिम ब्रिडनस्टाईन यांनी ट्विटरद्वारे ही माहिती दिली आहे. नासा आंतराळात अनेक नवीन प्रोजेक्ट राबवत आहे. या नव्या योजनेमध्ये अभियंते आणि वैज्ञानिकांच्या नव्या पिढीला प्रोत्साहन देण्यासाठी नासा काही माहितीपट काढण्याच्या विचारात आहे. त्यासाठी टॉम क्रुझ उत्सुक आहे. मिशन इम्पॉसिबल, टॉप गन, दि ममी, वॉर ऑफ दि वर्ड सारखे अनेक यशस्वी चित्रपट टॉमच्या नावावर जमा आहेत. अर्थात सर्वच चित्रपट ॲक्शन आणि थ्रिलर आहेत. त्यामुळे या माहिती चित्रपटात टॉम असल्यामुळे यात धाडसी स्टंटसं असतील का याचीच चर्चा त्याच्या चाहत्यांमध्ये आहे. शिवाय टॉम क्रुझ आपल्या मिशन इंम्पोसिबल या चित्रपटाच्या सिक्वलच्याही तयारीत असल्याची चर्चा आहे. या सिक्वेलचं शुटींग थेट अंतराळात होणार का याचीही आता प्रतीक्षा आहे. मात्र या शुटींगसाठी टॉम क्रुझ स्वतः अंतराळ स्थानकात जाणार किंवा नाही हे मात्र अद्याप नक्की झालेलं नाही. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या सर्वासाठी स्पेसएक्सचे संस्थापक इलॉन मस्क हे फंडींग करणार आहेत.
गेल्या वर्षी नासाने खासगी अंतराळवीर आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर 30 दिवस घालवू शकतील अशी योजना जाहीर केली होती. अर्थात यासाठी अरबो-खरबो रुपये खर्च करण्याची क्षमता ज्यांच्याकडे आहे, तेच प्रवासी जाऊ शकणार होते. या योजनेवरही काम चालू आहे. आता नासाने थेट टॉम क्रुझला घेऊन आंतराळात शुटींग करायचे ठरवले आहे. यासाठी आवश्यक असलेल्या क्रु मेंबरचे ट्रेनिंगही सुरु झाले आहे. आंतराळात पहिल्यांदाच अशाप्रकारे चित्रपटाचे शुटींग होणार आहे. स्वतः टॉम क्रुझही नासाच्या तंत्रज्ञानांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत असल्याचीही बातमीही आहे. हे शुटींग सुरु केव्हा होईल तेव्हा होईल पण एखाद्या चित्रपटासाठी आंतराळात होणारे हे पहिलेच शुटींग आहे. त्यात टॉम क्रुझसारखा ऍक्शन हिरो. त्यामुळे जेव्हा कधी हा चित्रपट येईल तेव्हा टॉमच्या चाहत्यांच्या रांगा लागतील हे नक्की….
-सई बने