‘गोड गोजिरी लाज लाजिरी’ गाण्याची गायिका आठवतेय का?
कलेच्या क्षेत्रात यशातील सातत्य टिकवणं फार अवघड असतं कारण इथं यश हे कलावंतासोबत ऊन सावलीचा खेळ खेळत असतं. लाईमलाईटच्या झगमगाटात चमकणारेच फक्त दिसत राहतात. विझलेल्या दिव्यांना कुणी विचारत नाही. आणि इथे यश मिळवायला व टिकवायला फक्त गुणवत्ता पुरेशी नसते. जोडीला प्राक्तनही असावं लागतं.
कुणाच्या बाबतीत हे सारं सहज जमून जातं, तर कुणाला टॅलेंट असूनही यशाच गणित सहजासहजी सोडवता येत नाही. पण यांच्याबाबत एक असतं कारकिर्द छोटी का असेना त्यावर ते आपलं नाव कोरून टाकतात.
अशीच एक पार्श्वगायिका साठच्या दशकाच्या उत्तरार्धात आली. ‘मन पिसाट माझे अडले रे… थांब जरासा’, ‘पुनवेचा चंद्रमा आला घरी’, ‘परीकथेतील राजकुमारा स्वप्नी माझ्या येशील कां…..’ या अशा मनात खोलवर घर केलेल्या गीतांनी तिने रसिकांचं लक्ष वेधून घेतलं होतं. ही गायिका होती कृष्णा कल्ले.
कृष्णा कल्ले यांचा जन्म १८ डिसेंबर १९४० चा! शालेय जीवनात त्या गायन शिकत असताना स्पर्धांमध्ये आपले गुण प्रदर्शित करून त्यांनी तत्कालीन पंतप्रधान पं. नेहरू आणि राष्ट्रपती राजेंद्रप्रसाद यांच्या हस्ते पारितोषिकं पटकावली होती. १९६५ मध्ये त्यांनी राष्ट्रीय पातळीवरच्या गायन स्पर्धेत सहभाग घेतला आणि ‘गोल्डन व्हॉइस ऑफ इंडिया’चा किताब मिळवला.
‘गोड गोजिरी लाज लाजिरी’ या आज देखील रसिकांच्या ओठी असलेल्या गीतासह ‘केला इशारा जाता जाता’ आणि ‘एक गाव बारा भानगडी’ या त्याकाळी गाजलेल्या चित्रपटांतील लावण्या त्यांनीच गायलेल्या आहेत.
तिच्या स्वराबाबत जगदिश खेबूडकर यांनी सांगितले होते, “अस्सल कोल्हापुरी उच्चार करून ग्रामीण लोकगीते, लावण्या, झगडे, सवाल जवाब, नृत्य गीते कृष्णा कल्ले यांनी इतक्या परिणामकारक रीतीने गायली आहेत की, ऐकताना कुणीही श्रोता म्हणणार नाही की, ही गाणी एका अमराठी गायिकेने गायली आहेत!’
====
हे देखील वाचा: विनोदाचा बादशहा ‘मेहमूद’
====
परीकथेतील राजकुमारा’ या त्यावेळी अनिल मोहिले या तरुणाने स्वरसाज चढवलेल्या गीताला याच आवाजाचा परीसस्पर्श झाला आणि मोहिले त्यानंतरच्या काळात यशस्वी संगीतकार म्हणून उदयाला आले. १९६५ ते १९७५ या काळात त्यांची गाणी खूप गाजली.
श्रीरंग सावळा तू गौरकाय राधा, कशी रे आता जाऊ घरी सांग मला श्री हरी, तू अबोल होवूनी जवळी मजला घ्यावे, राम प्रहरी राम गाथा, मैना राणी चतुर शहाणी, शुक शुक मन्या जातोस की नाही, अहो राया चला घोड्यावरती बसू, बिबं घ्या बिबं शिककाई, आज आले उद्या मी येणार बी नाई, औंदा मुंबई बघायची, देश हिच माता देश जन्मदाता, कामापुरता मामा ताकापुरती आजी ही आणि अशी अनेक गाणी आजही रसिक विसरलेले नाहीत.
====
हे देखील वाचा: चित्रपटसृष्टीला व्यापून राहिलेला कवी…साहिर लुधियानवी!
====
मुळातच अबोल आणि आपले गोडवे न गाण्याच्या स्वभावामुळे अफाट गुणवत्ता असुनही त्या प्रवाहाबाहेर गेल्या. त्या काळात त्यांनी दस लाख, गाल गुलाबी नैन शराबी या हिंदी सिनेमातून देखील पार्श्वगायन केले.
१५ मार्च २०१५ रोजी कृष्णा कल्ले यांचे निधन झाले. आज तिचा स्मृती दिन. किती जणांना या स्वराची आठवण आहे?