“काडतूस” चित्रपटाची पंचवीशी बहुरंगी
नेहमीच म्हटलं जाते की कुठे थांबायचं हे वेळीच समजले नाही तर, बदलत्या काळानुसार जुळवून घेणे अवघड होत जाते…चार्म उतरुन जातो. महेश भट्ट यांनी चित्रपट दिग्दर्शनातून निवृत्ती जाहीर केली तेव्हा एकिकडे त्यांच्या चित्रपट दिग्दर्शनाची पंचवीस वर्ष पूर्ण होत होती, तर दुसरीकडे विविध थीमवर चित्रपट साकारण्याचे सातत्य त्यांनी कायम ठेवले होते. त्यांनी दिग्दर्शित केलेला पहिला चित्रपट “मंझिले और भी है“ला सेन्सॉरने आपल्या कात्रीत पकडल्याने बरीच वादावादी झाल्यावर एकदाचे त्याला “ए” अर्थात फक्त प्रौढांसाठी हे प्रमाणपत्र मिळाले आणि चित्रपट १९७४ साली मुंबईत प्रदर्शित झाला.
आपल्या “काडतूस“(kartoos) या चित्रपटाच्या वेळेस त्यांनी चित्रपट दिग्दर्शन निवृत्ती जाहीर केली. ही गोष्ट १९९९ ची. म्हणजेच महेश भट्ट यांच्या दिग्दर्शन वाटचालीचे हे पंचवीसावे वर्ष होते. “काडतूस” मुंबईत ७ मे १९९९ रोजी प्रदर्शित झाला, त्यालाही आता पंचवीस वर्ष पूर्ण होत आहेत. याचाच अर्थ, महेश भट्टच्या दिग्दर्शनाचे हे पन्नासावे वर्ष आहे. दरम्यान, २०२० साली त्यांनी आपल्या चित्रपट दिग्दर्शन निवृत्तीतून थोडी माघार घेतली आणि आपल्याच दिग्दर्शनातील “सडक” (१९९१)चा पुढचा भाग अर्थात सिक्वेल “सडक २” चे दिग्दर्शन केले.
महेश भट्टची दिग्दर्शनीय वाटचाल फक्त आणि फक्त तपशीलात सांगण्यापेक्षा त्यांनी जे सातत्य कायम ठेवताना कमालीची विविधता दिली तीच कम्माल आहे. “अर्थ” वेगळा नि “सारांश” केवढा वेगळा. नावातूनच ते सुचित होते. “आशिकी” वेगळा तर “हम है राही प्यार के” त्याहीपेक्षा वेगळाच. कोणत्याच चौकटीत न राहणारा हा दिग्दर्शक “साथी” चित्रपटही देतो आणि “चाहत” ही. एखादा चित्रपट सुपरहिट होवू देत, एखादा फ्लाॅप होवू देत, महेश भट्टने थांबणे मंजूर केले नाही. त्याची क्रियाशीलता (क्रियेटीव्हीटी) सुरुच.
मला आठवतय, वांद्र्यातील मेहबूब स्टुडिओत आम्हा काही सिनेपत्रकारांना निर्माते यश जोहर यांनी “ड्युप्लीकेट”च्या सेटवर शूटिंग रिपोर्टींगसाठी आमंत्रित केले होते (माझ्या स्टुडिओ भटकंतीतील वाटचालीत यश जोहर मला सर्वात आवडलेला निर्माता. सेटवर पाऊल टाकताच बसण्याची व चहाची व्यवस्था करणार. त्या काळात आम्ही सिनेपत्रकार आगुंतकपणेही अर्थात बिन बुलाये सेटवर जात असू आणि तेव्हाही यश जोहर स्वागत करे.) “ड्युप्लीकेट”च्या सेटवर शाहरुख खान, जुही चावला व सोनाली बेन्द्रे यांच्यावर काही दृश्य चित्रीत होत असतानाच महेश भट्ट मात्र शेजारच्याच सेटवर “अंगारे”साठी अक्षयकुमार व पूजा भट्टवर काही दृश्य चित्रीत करीत होता.(kartoos)
एकाच वेळेस दोन सेटवर दिग्दर्शन करण्यास लागणारा आत्मविश्वास व क्षमता महेश भट्टमध्ये होती. तोपर्यंत मोबाईल आले नव्हते. अन्यथा एकाच जागी बसून तीन स्टुडिओत त्याने सेटवर दिग्दर्शन केले असते. त्याने दिग्दर्शन थांबवले तरी चित्रपट लेखन, विविध चर्चासत्रात भाग घेणे वगैरे काम सुरु ठेवले. चित्रपट माध्यम व व्यवसायात मुरलेला हे करु शकतो. तो स्वस्थ बसणार नाहीच.
“काडतूस“ला(kartoos) पंचवीस वर्ष पूर्ण होत असताना काय सांगावे? हा चित्रपट १९९३ च्या “पाॅईंट ऑफ नो रिटर्न” या विदेशी चित्रपटावर बेतलाय. यातील संजय दत्तचा लूक “la Femme Nikita” या फ्रेंच चित्रपटातील ‘Bridget Fonda’ याच्याशी मिळताजुळता होता. मला मात्र काहीसा तो सुभाष घई दिग्दर्शित “खलनायक”शी मिळता जुळता वाटला. या चित्रपटाची कथा आनंद वर्धन याची तर राॅबिन भट्ट व आकाश खुराना यांची पटकथा. भूषण पटेल छायाचित्रणकार व वामन भोसले संकलक.
मध्यवर्ती कथासूत्र सांगायचे तर अतिशय खौपनाक टेरर असलेला राजा म्हणजेच जीत बलराज (संजय दत्त) हा मनप्रीत मिनी कौर (मनिषा कोईराला) च्या सहवासात बदलत जातो. आपण तिच्या प्रेमात तर पडलेलो नाही ना याबाबत तो कन्फ्युज होतो. आणि अशातच पोलीस अधिकारी जय सूर्यवंशी (जॅकी श्राॅफ) त्याला कायद्याच्या कचाट्यात पकडण्याचा प्रयत्न करतोय. चित्रपटात गुलशन ग्रोव्हर, जसपाल भट्टी, जॅक गौड, रझ्झाक खान इत्यादींच्याही भूमिका आहेत.
========
हे देखील वाचा : ‘या’ रुपात माधुरी हवी होती असं आता वाटतंय का?
========
महेश भट्ट व संजय दत्त ही जोडी “नाम” (१९८६), “कब्जा” (१९८८), “सडक” (१९९१), “गुमराह” (१९९३), “काडतूस“(kartoos) (१९९९) आणि “सडक २” या चित्रपटात एकत्र आलेली. संजय दत्तमधील गुणवत्ता, फायटींग स्पिरिट, क्षमता आणि अगदी मर्यादाही चांगल्याच ठावूक. महेश भट्टच्या पन्नास वर्षांच्या कारकीर्दीतील त्यांनी संजय दत्तसोबत केलेले काम एक वेगळेच रसायन आहे. “काडतूस“ला(kartoos) रसिकांनी नाकारले तरी या जोडीची खेळी उल्लेखनीय.