मिलिंद गवळी यांनी त्यांच्या पोस्टमधून दिला ‘सवतीचे कुंकू’ चित्रपटाच्या आठवणींना
‘हम आपके दिल मे रहते है’ ची पंचवीशी….
पिक्चरच्या जगात कधीही, केव्हाही, काहीही घडू शकते हीच तर या क्षेत्राची विशेष खासियत. अशीच एक भारी गोष्ट, एखाद्या चित्रपटात एकदम वेगळीच अशी नायक व नायिका जोडी एकत्र येणार आहे असं समजलं तरी कुतूहल निर्माण होत की, दिग्दर्शकाला ही अशी ‘जोडी’ सुचली कशी ? या दोघांनी एकत्र काम करायला होकार देतांना काय बरं विचार केला ? थीमची गरज म्हणून अशी जोडी जमवली की, तारखा जुळल्या, बजेट जमले, वितरकांची पसंती म्हणून अशी जोडी जमवली ? या चित्रपटाचे रसिक स्वागत कसे करतील ? वगैरे बरेच प्रश्न येतातच. पूर्वी एक पिक्चर सुपरहिट झालं रे झालं की त्यातील नायक नायिका जणू जोडीने नवीन चित्रपट साईन करतात, पटकथाकार जणू त्या जोडीला डोळ्यासमोर ठेवून लिहितो, राकेश रोशन दिग्दर्शित ‘करण अर्जुन ‘ ( १९९५) आणि आदित्य चोप्रा दिग्दर्शित ‘दिलवाले दुल्हनिया ले जाऐंगे’ ( १९९५) तुफान हिट ठरले आणि शाहरुख खान व काजोल जोडीचा आपला एक हुकमी प्रेक्षकवर्ग कायमचाच निर्माण झाला.(Hindi Movie)
(सिनेमाच्या जगात सगळ्याच गोष्टी येतात, घडतात असे वाटते त्या एकाच जागेवर, ते म्हणजेच यश. एकमेव चलनी नाणे) काजोल म्हटलं की, अजय देवगन पती आणि शाहरुख खान पडद्यावरचा प्रेमिक ( व विश्वासाचा मित्र) हे समीकरण एकदम मस्त असतानाच काजोलचा नायक अनिल कपूर हे कसं वाटतंय ? क्षणभर आश्चर्य वाटते ना ? पण कधी वेगळीच जोडी जमवण्यातही रंगत असते. सुरेश प्राॅडक्सन्स निर्मित डी. रामा नायडू व सतिश कौशिक दिग्दर्शित ‘हमारा दिल आपके पास है’ या चित्रपटात अनिल कपूर व काजोल पती व पत्नी या नात्यात आहेत. अनिल कपूरने आजही आपल्याला असं आणि इतकं फिट्ट ठेवलयं की त्याचं खरं वय समजू नये ( पुरुषदेखिल वय लपवण्यात यशस्वी ठरतात बरं का ?) या चित्रपटाच्या मुंबईतील प्रदर्शनास ( २२ जानेवारी १९९९) पंचवीस वर्ष पूर्ण होत आहेत, पण पंचवीस वर्षांपूर्वीही अनिल कपूर आजच्यासारखाच होता (आजच्या डिजिटल भाषेत ‘डिट्टो ‘) तरी त्याची नायिका अथवा पत्नी म्हणून पडद्यावर जोडी शोभेल अशी व इतकी काजोल तेव्हा नक्कीच प्रत्यक्षात वयाने आणि पडद्यावर भूमिकेतून मोठी नव्हती.(Hindi Movie)
म्हणूनच ही जोडी जमवल्याचे/जमल्याचे विशेष कौतुक. डी. रामा नायडू हे दक्षिणेकडील प्रादेशिक भाषेतील चित्रपट निर्मितीतील भले मोठे प्रस्थ. हैदराबादला त्यांचा भला मोठा प्रशस्त असा रामा नायडू स्टुडिओ. ( दक्षिणेकडील चित्रपटसृष्टीचं सगळेच भारी. स्टुडिओ भारी, पिक्चर भारी, यश भारी) पूर्वी हैदराबाद आंध्र प्रदेशात होते. आता तेलंगणची राजधानी आहे. नायडू तेलगू व तमिळ भाषेतील चित्रपट निर्मितीबरोबरच हिंदी चित्रपटही सातत्याने निर्माण करीत. ‘प्रेम नगर ‘, ‘बंदीश ‘, दिलदार ‘, ‘दिल और दीवार’, तोहफा, मकसद, इन्साफ की आवाज, जीवन एक संघर्ष, प्रेम कैदी, अनाडी असे अनेक हिंदी चित्रपट त्यांनी निर्माण केले. दक्षिणेकडील निर्माते हिंदीत येताना आपल्याच तेलगू अथवा, तमिळ, मल्याळम, कन्नड भाषेतील चित्रपटाची हिंदीत रिमेक करतात. ‘हम आपके दिल.. ‘देखिल Muthyala Subbais ‘ ( पवित्र बंधन) या तेलगू चित्रपटाची रिमेक. सतीश कौशिक तसा बोनी कपूर निर्मित ‘रुप की रानी चोंरो का राजा ‘ ( १९९२) च्या वेळेस अनपेक्षितपणे दिग्दर्शक झालेला ( शेखर कपूरने अनेक चित्रपट मध्येच सोडून दिले आणि अन्य दिग्दर्शकांना संधी मिळाली तसाच हा चित्रपट) ‘हम आपके…’पर्यंत त्याची दिग्दर्शक म्हणून चांगली वाटचाल व वाढ होत राहिली. पुढेही ती कायम राहिली. तो मूळात कलाकार असल्याने आपण दिग्दर्शक झाल्यावरही तो अन्य दिग्दर्शकांच्या चित्रपटातून अभिनय करत होताच. आणि एक अतिशय विशेष, अनिल कपूर, अनुपम खेर आणि सतीश कौशिक खरोखरचे जिवलग मित्र. (एकूणच मनोरंजन क्षेत्रात खरीखरी, नि:स्वार्थी कमीच. स्पर्धेचे जग आणि क्षेत्र आहे. मैत्री करणार कशी?) (Hindi Movie)
मुंबईतील आम्हा काही सिनेपत्रकारांचा हम आपके दिल मे…साठी अतिशय उत्तम असा हैदराबाद दौरा झाला होता. डी. रामा नायडू यांचा स्टुडिओत पाऊल टाकताच एका वेगळ्याच ‘चित्रपट निर्मिती संस्कृती’त आल्यासारखं वाटलं. अतिशय नेटका आणि शिस्त. अतिशय हवेशीर आणि प्रशस्त. या वातावरणात सतीश कौशिकला आपल्या या चित्रपटावर किती बोलू नि काय बोलू असे झाले. एक गोष्ट जाणवली, ‘हम आपके है कौन ‘ ( १९९४) पासून सहकुटुंब सहपरीवार पाहण्याजोग्या चित्रपटांचे जुने दिवस पुन्हा आलेत आणि ते येताना साधेपण मागेच ठेवून चकाचकपणा घेऊन आलेत त्यातलाच हा एक चित्रपट आहे हे त्या दौऱ्यात लक्षात आले आणि मग चित्रपट पडद्यावर आल्यावर दिसलेही.
काही विशेष गोष्टी, सतीश कौशिक दिग्दर्शक आणि अनिल कपूर नायक म्हटल्यावर अनुपम खेर असायलाच हवा तो यात होताच.
अनिल कपूरला काजोलशी सूट होण्यास फारसे कष्ट पडले नव्हते, तसा तो व्यावसायिक. पण काजोलने मात्र मेकअप, देहबोली, साडीतील वावर यातून आपण अनिल कपूरच्या पत्नी शोभून दिसू याची पुरेपूर काळजी घेत असल्याचे संपूर्ण पडद्याभर जाणवले. अभिनयात अर्थात ती सरस. अनिल कपूरशी तितकाच सहज. या चित्रपटात ग्रेसी सिंगही आहे हे लक्षात कधी आले माहित्येय? आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित ‘लगान ‘ ( २००१) साठी आमिर खानची नायिका म्हणून तिची निवड होताच तत्पूर्वी तिने कोणत्या चित्रपटातून काम केले होते बरे असा प्रश्न आला तेव्हा तिने हम आपके दिल मे… मध्ये छोटी भूमिका साकारली होती हे लक्षात आले. एक चित्रपट मागच्या गोष्टी अशा समोर आणतो हेही विशेष.
या चित्रपटात साधु मेहेरचीही भूमिका आहे. तो खास करुन सत्तरच्या दशकातील समांतर चित्रपटात भूमिका साकारत असे. म्हणूनच या चित्रपटात तो दिसल्याचे विशेष. (Hindi Movie)
==============
हे देखील वाचा : अस्वस्थ करणारा चित्रपट ‘दो बिघा जमीन’
==============
अनिल कपूर व स्मिता जयकर यांचे वय जवळपास सारखेच ( हे खरंच सांगायला हवे?) पण या चित्रपटात स्मिता जयकरने काजोलच्या आईची भूमिका साकारलीय. हे मात्र सांगायलाच हवे. एखाद्या चित्रपटाच्या आठवणी अशाही. म्हटल तर वेगळ्याच. समीरची गीते आणि अन्नू मलिकचे संगीत यात हम आपके दिल मे रहते है हे कुमार शानू व अनुराधा पौडवाल यांनी गायलेले गाणे आजही लोकप्रिय. एकाद्या म्युझिकल संगीत वाहिनीवर ते पाह्यला मिळतेय. या चित्रपटाला चक्क पंचवीस वर्ष पूर्ण कधी झाली हे अजिबात समजले नाही. याचं कारण, हा चित्रपटच सांगतोय, हम आपके दिल मे रहते है…