आर.के.च्या ‘हीना’ सिनेमाचे संगीत रवींद्र जैन यांना कसे मिळाले?
‘स्वदेस’ची वीस वर्ष…
“Lagaan” (मुंबईत रिलीज १५ जून २००१) नंतरचा दिग्दर्शक आशुतोष गोवारीकरचा चित्रपट कोणता याची उत्सुकता फारच वाढलेली. पूर्वप्रसिध्दी (त्यात आमिर खानने एका मुलाखतीत म्हटलं, लगानचा निर्मिती खर्च पंचवीस कोटी आहे. त्या काळात ही रक्कम प्रचंड मोठी वाटत होती. चित्रपट त्याच्या आमिर खान प्राॅडक्सन्सची निर्मिती.), त्याची पोस्टर्स व होर्डिग्ज (अतिशय कल्पक होती), त्याचे प्रदर्शन (इराॅस मेन थिएटर ही निवड योग्य होती. चित्रपटाच्या क्लासला साजेशी होती), त्याचा आम्हा चित्रपट समीक्षकांसाठीचा प्रिव्ह्यू खेळ (महालक्ष्मीच्या फेमस स्टुडिओतील मिनी थिएटरमध्ये होता), त्याची प्रभावी समिक्षा, चित्रपट प्रदर्शित झाल्यावरची प्रसिद्धी ( मला आठवतय शुक्रवारी प्रदर्शित झालेला लगान पाह्यला सोमवारी दिलीप वेंगसरकर आला आणि त्याच्या लाईव्ह कव्हरेजसाठी स्टार न्यूजची व्हॅनिटी इराॅसच्या कार पार्किंगमध्ये उभी होती) असे करत करत चित्रपट लोकप्रिय असतानाच लगानची ऑस्करसाठीची भारताची अधिकृत प्रवेशिका म्हणून निवड झाली, ही तर ब्रेकिंग न्यूज. (Swades)
काही दिवसातच अमेरिकेतून बातमी आली, लगानला ऑस्करच्या विदेशी चित्रपट विभागात नामांकन प्राप्त झाले आणि सांस्कृतिक सामाजिक माध्यम क्षेत्रातील वातावरण बदलले. आपल्या देशातील चित्रपट ऑस्करच्या अंतिम फेरीत प्रवेश मिळवतो हे सच्च्या चित्रपट रसिकांसाठी विलक्षण अभिमानास्पद ठरले. अंतिम फेरीत जरी Oscar Award प्राप्त झाला नसला तरी हिंदी चित्रपटाला आणि आशुतोष गोवारीकरला एक उंची नक्कीच प्राप्त झाली…. त्याची दखल हवीच.
यानंतरचा आशुतोष गोवारीकरचा चित्रपट कोणता असा प्रश्न, असे कुतूहल निश्चितच महत्वाचे…
Swades या नावावरुन आशुतोष गोवारीकर लगानसारखाच (पण वेगळ्या पाश्र्वभूमीवरील) देशभक्तीवरील चित्रपट घेऊन येतोय हे स्पष्ट होतेच. चित्रपटाचे नाव त्याची पहिली ओळख असते. त्याच्याशी प्रेक्षक पहिला जोडला जातो. या चित्रपटात काय पाह्यला मिळेल याचा एक तर्क सुरु होतो. (चित्रपटांपर्यंत प्रेक्षक जाण्याचा प्रवास हा असतोच असतो. ते दुर्लक्षित राहिलेय इतकेच. )
ह्रतिक रोशन स्वदेसचा नायक असणार अशी चर्चेतील बातमी बाजूला पडून शाहरुख खानची झालेली निवड काहीशी आश्चर्याची. आदित्य चोप्रा व करण जोहर (यशराज फिल्म, धर्मा प्राॅडक्सन्स) यांच्या चित्रपटांचा हुकमी हिरा चक्क आशुतोष गोवारीकरच्या दिग्दर्शनातील चित्रपटात हे काही वेगळेच समीकरण. नायिका म्हणून गायत्री जोशी हे देखील वेगळेपण. ती माॅडेल म्हणून ओळखली जाणारी.
कला दिग्दर्शक नीतिन चंद्रकांत देसाई यांजकडून एका भेटीत समजले, स्वदेस (Swades) साठी नाशिक जिल्ह्य़ातील अनेक गावांत बाह्यचित्रीकरण स्थळांचा शोध घेतलाय. पण त्यात समाधानकारक काही नाही म्हणून सातारा जिल्ह्यातील गावांत जातोय. त्यानुसार वाई परिसरात शूटिंग सुरु झाल्याचे समजले. चित्रपटात ते दिसतेय.
चित्रपट पूर्ण होताच पूर्वप्रसिध्दीचे पहिले पाऊल म्हणून गेट वे ऑफ इंडिया येथे संध्याकाळी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. ऑक्टोबर महिना होता. पण दुर्दैवाने पावसाच्या सरी वाढत वाढत गेल्याने नरीमन पाॅईंट येथील एका पंचतारांकित हॉटेलमधील प्रशस्त हाॅलमध्ये आम्हा सिनेपत्रकारांना स्वदेसचा ट्रेलर व गाणी दाखवण्यात आली. आशुतोष गोवारीकरशी झालेल्या गप्पांत त्याने देशातील ग्रामीण भागातील एका खेड्यातील वास्तव पडद्यावर मांडलयं हे समजले आणि उत्सुकता वाढली. (bollywood tadka)
आशुतोष गोवारीकर विचारपूर्वक विषय निवडून त्याच्या लेखनावर अधिकाधिक मेहनत घेऊन कॅमेर्यासमोर जाणारा दिग्दर्शक यावर माझा ‘हिंदी चित्रपटाचा प्रेक्षक’ म्हणून विश्वास. यावेळी गायत्री जोशी का आली नाही याचे उत्तर त्याने टाळले.
चित्रपट प्रदर्शनास सज्ज झाला तरी गायत्री जोशी मिडियापासून दूर आहे ( दूर ठेवली गेलीय) हे मला जाणवले. असं करण्यामागे काही टॅक्टीक्स असणार हे स्पष्ट होते (चित्रपटाच्या पूर्वप्रसिध्दीतील अशा खेळींमागे नक्कीच काही हेतू असतात. येथेही दिग्दर्शकाची हुशारी दिसतेय. )
============
हे देखील वाचा : भोपाल एक्स्प्रेस चित्रपटाची पंचवीशी
============
मुंबईत १७ डिसेंबर २००४ रोजी स्वदेस (Swades) प्रदर्शित झाला (याला वीस वर्ष पूर्ण झाली देखील. तरीही चित्रपट आजचाच वाटतोय. हे त्याचे मोठेच यश). हा चित्रपट तुम्ही नक्कीच पाहिला असणार म्हणून त्याची गोष्ट सांगणे टाळलेय. देशातील ग्रामीण भागातील गरीबी, जातीभेद, जुन्या चालीरिती, पारंपरिक विचारसरणी, श्रध्दा, अंधश्रद्धा, वीज टंचाई, सामाजिक सेवेबद्दल दुर्लक्ष (वा दुरावस्था), सण संस्कृती, पंचायत असे बरेच काही हा चित्रपट आपल्याला दाखवतो. सुन्न करतो. वेगळ्याच विश्वात नेतो.
वीस वर्षांनंतर या परिस्थितीत किती बरे फरक पडला असेल हा मोठाच प्रश्न. स्वदेसचा पुढचा भाग अर्थात सिक्वेल निर्मिती केलीच तर त्याचे उत्तर मिळेलही.
आशुतोष गोवारीकरची मला एक गोष्ट आवडते. त्याने स्वतःला कधीच चौकटीत अडकवून ठेवले नाही. लगानने क्लास व मास यात उंची गाठल्यावर स्वदेस (Swades) सारखा ज्वलंत विषय हाताळण्यात यश प्राप्त केले. Shah Rukh Khan च्या रोमॅन्टीक हीरो या इमेजपेक्षा त्याला ‘हटके’ भूमिकेत त्याने रसिकांसमोर आणले. (ते जोहर, चोप्रा याना फारसे रुचले नसेल) शाहरुख खानच्या खणखणीत सुपर हिट वाटचालीतील सर्वोत्तम तीन भूमिकांतील ही एक.
या चित्रपटाची कथा एम. जी. सथ्य्या आणि आशुतोष गोवारीकर यांची आहे तर पटकथा आशुतोष गोवारीकर, समीर शर्मा, ललित मराठे, अमिन हाजी, यशोधन निरगुडकर आणि आयर्न मुखर्जी यांची आहे. संवाद के. पी. सक्सेना यांचे आहेत. या चित्रपटात शाहरूख खान, गायत्री जोशी, किशोरी बल्लाल, राजेश विवेक, दयाशंकर पांडे, स्मिथ सेठ, लेख टंडन, विष्णूदत्त गौर, फारुख जाफर, विश्व बडोला, दिलीप आंबेकर, मयूरी बगाडे, राजा अवस्थी आणि विशेष भूमिकेत मकरंद देशपांडे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. सुरुवातीस एका दृश्यात ओझरती प्राजक्ता माळीही आहे, हे मात्र खूप दिवसानंतर समजले (आणि डिजिटल युगात तीही बातमी झाली) या चित्रपटाची गीते जावेद अख्तर यांची असून संगीत ए. आर. रेहमान यांचे आहे. ये तारा वो तारा, यूं ही चला चला, यह जो देश है मेरा ही गाणी आजही लोकप्रिय आहेत. कधीही ही गाणी पहावीत. छान अनुभव मिळतोच. (Swades)
स्वदेस (Swades) प्रदर्शित झाला आणि दुसर्याच रात्री गायत्री जोशी एका पबमध्ये डान्स करायला गेल्याचा फोटो एका इंग्रजी वृत्तपत्रात पाह्यला मिळाला. गोष्ट छोटी वाटते पण तिची भूमिका रसिकांसमोर आल्यावर हे घडले ( की त्यातही काही हेतू?) त्यानंतर तिने काही मुलाखती देताना म्हटले, मी भूमिका केलेला हा एकमेव चित्रपट असेल. आता नेहमीप्रमाणेच माॅडेलींग व जाहिरातपटावर लक्ष केंद्रित करणार…
============
हे देखील वाचा : क्रेझ क्रेझ क्रेझ म्हणतात ती कितीही भन्नाट असू शकते…
============
स्वदेस (Swades) हा देशभक्तीवरील चित्रपट असेही त्याचे कौतुक झाले. त्याबाबतही तो वेगळाच चित्रपट. तो देशातील ग्रामीण भागातील जीवनातील वास्तव दाखवतो आणि अस्वस्थही करतो. काही चित्रपट फक्त पडद्यावर राहत नाहीत तर ते काही महत्वाच्या गोष्टीही सांगतात. स्वदेस अगदी तस्साच.