एकाच सिनेमाचे दोन रिमेक: एक सुपरहिट तर दुसरा सुपर फ्लॉप!
आपल्या भारतीय चित्रपट सृष्टीत रिमेक (Remake) ही काही नवी संकल्पना नाही. हॉलीवूडच्या बऱ्याचशा चित्रपटांचा रिमेक(Remake) भारतीय भाषांमध्ये होतात. कधी कधी तो ऑफिशियल रिमेक(Remake) असतो तर कधी कधी त्याला इन्स्पायर असं गोंडस नाव देखील दिलं जातं. हिंदी सिनेमाचा साउथ मध्ये रिमेक(Remake) होतो तर साउथ कडील अनेक सिनेमाचा हिंदीत होतो. अलीकडे तर साउथ कडील अनेक सिनेमे डब होऊन भारतभर प्रदर्शित होतात आणि चांगला धंदा देखील करतात.
कधी कधी मात्र एकाच गाजलेल्या सिनेमाचे दोन दोन रिमेक (Remake) होतात आणि ते देखील एकाच वर्षी प्रदर्शित होतात. अशावेळी दोघेही
परस्परांवर चोरीचे आरोप करतात पण हे दोघेही तसे एका अर्थाने चोरच असतात! यातील एखादा सिनेमा चालतो आणि दुसरा फ्लॉप होतो. १९८० साली असाच काहीसा प्रकार घडला होता. त्यावेळी तर रिमेक केलेल्या दोन्ही हिंदी सिनेमाचे टायटल देखील एकाच अद्याक्षराने सुरू झाले होते. कोणते होते हे चित्रपट? काय होत हा नक्की मामला?
१९७८ साली ‘काटाकटला रुद्रया’ या नावाचा तेलगू चित्रपट प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट दासरी नारायणराव यांनी दिग्दर्शित कर्ला होता आणि त्यात कृष्णाम राजू,जयासुधा यांच्या प्रमुख भूमिका होत्या. तिकडे हा सिनेमा सुपरहिट झाला. साहजिकच त्याचा रिमेक (Remake) आपल्या हिंदीमध्ये करण्याचा घाट घातला गेला. ‘मुकद्दर का सिकंदर’ या चित्रपटाचे दिग्दर्शक प्रकाश मेहरा यांनी या तेलगू चित्रपटाचा रिमेक (Remake)हिंदी मध्ये करायचे ठरवले आणि तशी तयारी त्यांनी सुरू केली. सिनेमाचा नायक म्हणून शत्रुघ्न सिन्हा ला घेतले तर नायिका रिना रॉय आणि शबाना आजमी होत्या. चित्रपटाचे नाव ठरले ‘ज्वालामुखी’. पण त्याच तेलगू चित्रपटाचा आणखी एक रिमेक हिंदी मध्ये त्याच वेळी बनवला जात होता या चित्रपटाची निर्मिती अभिनेता जितेंद्र यांनी केली होती या सिनेमाचे दिग्दर्शन दासरी नारायणराव यांच्याकडे दिले होते. चित्रपटाचे नाव होते ‘ज्योती बने ज्वाला’.
या चित्रपटांमध्ये जितेंद्रची नायिका होत्या मौसमी चटर्जी आणि सारिका. गंमत म्हणजे दोन्ही चित्रपटातील तीन कलाकार दोन्ही
चित्रपटातील सारख्याच भूमिका करत होते. हे कलाकार होते विनोद मेहरा, वहिदा रहमान आणि कादर खान. चित्रपटाला संगीत लक्ष्मीकांत प्यारेलाल यांची होते. जितेंद्रचा ‘ज्योती बने ज्वाला’ हा चित्रपट उशिरा सुरू होऊन आधी तयार झाला कारण दक्षिणेतील चित्रपट निर्मिती ची शिस्त. हा सिनेमा ६ जून १९८० या दिवशी प्रदर्शित झाला. ‘ज्वालामुखी’च्या सहा महिने आधीच प्रदर्शित झाला आणि सुपरहिट ठरला. त्यावर्षीच्या बॉक्स ऑफिस कलेक्शन मध्ये तो सहाव्या क्रमांकाची कमाई करणारा चित्रपट ठरला. प्रकाश मेहरा यांचा ‘ज्वालामुखी’ हा चित्रपट २६ डिसेंबर १९८० या दिवशी प्रदर्शित झाला आणि सुपर फ्लॉप झाला.
सेम कथानक प्रेक्षकांनी काहीमहिन्यापूर्वी पाहिल्यामुळे त्यांनी ‘ज्वालामुखी’ कडे अजिबात लक्ष दिले नाही. या ‘ज्वालामुखी’ ची आठवण आज कोणाला असण्याची सुतराम शक्यता नाही पण या चित्रपटातील एक गाणे जे किशोर कुमार आणि शत्रुघन सिन्हा यांनी गायले होते ‘पान बिडी सिगरेट तंबाखू ना शराब हमको तो नशा है मोहब्बत का जनाब..’ हे गाणे त्याकाळी बिनाका गीतमाला मध्ये खूप गाजले होते. चित्रपटाला कल्याणजी आनंदजी यांचे संगीत होते. असे एकाच कथा नकावरील दोन चित्रपट हा प्रकार अलीकडे देखील झाला होता.
हे देखील वाचा : आणि अक्षरश: काही मिनिटात गाणे तयार झाले
अक्षय कुमारचा ‘पॅडमॅन’ हा चित्रपट २०१७ साली प्रदर्शित झाला होता. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अरुणाचलम मुरुगांथम यांची ती आत्मकथा होती. स्त्रियांच्या प्रश्नावरील चित्रपटाने त्या काळात प्रचंड बिजनेस केला गंमत म्हणजे याच कथानकावर २०१६ साली फुल्लू’ नावाचा एक चित्रपट आला होता पण हा चित्रपट कधी आला आणि कधी गेला कोणाला कळालेच नाही. २००३ साली शहीद भगतसिंग यांच्या आयुष्यावर देखील दोन चित्रपट काही महिन्याच्या अंतराने प्रदर्शित झाले होते. एकाचा नायक होता बॉबी देवल तर दुसऱ्याचा नायक होता अक्षय कुमार!