दिग्दर्शक सुभाष घई आणि गीतकार आनंद बक्षी यांचे जबरदस्त ट्युनिंग!
झी मराठीवरील ‘उंच माझा झोका’ ह्या मालिकेच्या शीर्षक गीताच्या जन्माची कहाणी…
‘उंच माझा झोका’ ही मालिका रमाबाई रानडे यांच्या जीवनावर आधारित होती. त्यामुळे या मालिकेच्या शीर्षकगीताला संगीत देण्यासाठी म्हणून कोणी प्रौढ संगीतकार असावा, असं निर्मिती संघाचे म्हणणे होते. पण या गीताचे गीतकार अरुण म्हात्रे यांनी ठामपणे सांगितले होते की निलेश मोहरीर हा तरुण संगीतकार त्यांनी लिहिलेल्या शब्दांना उत्तम आणि योग्य न्याय देईल. अरुण म्हात्रे यांनी निलेशशी संवाद साधला. त्यांनी मेल च्या माध्यमातून निलेशला गीत पाठवले. निलेश म्हणतो, “हे शीर्षकगीत माझ्याकडे येणे हा विलक्षण योगायोग होता. जेव्हा अरुण म्हात्रे यांनी मला गीत पाठवले, तेव्हा ते गीत वाचता वाचताच मला चाल सुचत गेली.” गाणे जान्हवी प्रभू अरोरा यांच्या आवाजात रेकॉर्ड करून निर्मिती संघाला पाठवण्यात आले, पण सुरुवातीला या गाण्याला निर्मिती संघाकडून मान्यता देण्यात आली नाही. पण मग दोन दिवसांनी निलेशला फोन आला आणि त्याला सांगण्यात आले की त्याने दिलेली चाल आणि जान्हवीने गायलेले गीतच निवडले गेले आहे. निलेश सांगतो, “या गीतासाठी जान्हवी प्रभू अरोरा ही गायिका असावी असा आम्ही विचार केला कारण जान्हवीच्या आवाजात एक निरागसपणा, लहान मुलीचा खट्याळपणा आणि मुलगी मोठी झाली की येणारी प्रगल्भता या सर्व गोष्टी आहेत. सुरुवातीला असाही विचार आला होता की लहान रमा साठी वेगळा स्वर आणि मग रमा मोठी झाल्यांनंतरचे व्हर्जन वेगळ्या गायिकेच्या स्वरात करूया का? पण मग तो विचार बाजूला ठेवला. पातिव्रत्य, सात्त्विकता असे सर्व भाव जसे ते शब्दात आहेत, तसे ते चालीत देखील असावेत, शिवाय लहान रमा ते मोठी रमा हा मालिकेचा आलेख सुद्धा लक्षात घेऊन ती चाल झाली होती. या सर्व गोष्टी मी लक्षात घेतल्या. जान्हवी प्रभू अरोरा या गीताला योग्य न्याय देईल हा विश्वास होता आणि तिने तो सार्थ ठरवला.”
गीतकार अरुण म्हात्रे यांच्या लेखणीतून साकारलेल्या “चांदण चाहूल होती कोवळ्या पाऊली, माप मी ओलांडले अन दूर गेली भातुकली”
या शब्दापासून ते “हाती अमृताचा वसा, साथ देई माझा सखा; त्याच्या कृतार्थ डोळ्यात, झुले उंच माझा झोका”
इथपर्यंत प्रत्येक शब्द आजही रसिक प्रेक्षकांच्या ओठांवर गुणगुणत आहे. आज जान्हवी प्रभू अरोरा हिच्या जीवनातील टर्निग पॉईंट म्हणून या गीताचा उल्लेख केला जातो. या गाण्यासाठी झी मराठीचे सर्वोत्कृष्ट शीर्षकगीताचे अवॉर्डही निलेशला मिळाले आहे.
या गीताच्या यशाचा अजून एक किस्सा आहे.
पुणे येथे पत्रकारांच्या पुरस्काराचा एक सोहळा होता, तिथे ज्येष्ठ संगीतकार आनंद मोडक आले होते. त्यांनी आपल्या भाषणात या शीर्षक गीताचा उल्लेख करून निलेश मोहरीर हा त्यांचा आवडता संगीतकार असल्याचे सांगून निलेशचे खूप कौतुक केले होते.
या शीर्षकगीताच्या यशाचा झोका सुद्धा उंच ठरला आहे, हे नक्की.
गणेश आचवल