थ्री इडियट्स: जेव्हा आमिर दारू पिऊन चित्रीकरण करत होता आणि रिटेकवर रिटेक झाले तेव्हा…
काही चित्रपट असे असतात, जे कितीही वेळा बघितले तरी त्यांच्या कंटाळा येत नाही. 3 इडियट्स हा असाच एक चित्रपट आहे. एका वाक्यात या चित्रपटाचं वर्णन करायचं असेल तर, “सामाजिक संदेश देणारा एक अत्यंत रंजक चित्रपट”, एवढंच याबद्दल सांगता येईल. शिक्षणपद्धती सारख्या क्लिष्ट विषयावर अत्यंत विनोदी पद्धतीने आणि मार्मिकपणे केलेलं लेखन आणि दिग्दर्शन ही या चित्रपटाची जमेची बाजू. (Unknown facts about 3 Idiots)
हा चित्रपट चेतन भगतच्या ‘फाइव्ह पॉइंट समवन’ या कादंबरीवरून प्रेरित होता. इंजिनिअरिंग करणाऱ्या तीन मित्रांची कहाणी यामध्ये दाखवण्यात आली आहे. गरीब कुटुंबातला आत्मविश्वास हरवलेला राजू रस्तोगी (शर्मन जोशी), वाईल्ड लाईफ फोटोग्राफीची आवड असणारा फराहन कुरेशी (आर माधवन) यांच्या आयुष्यात आलेला रणछोडदास चंचड उर्फ ‘रांचो’ (आमिर खान) त्यांची विचार करण्याची पद्धत आणि एकूणच त्यांचं आयुष्यच बदलून टाकतो. या तिघांच्या जोडीने चतुर रामलिंगन (ओमी वैद्य), पिया (करीना कपूर) आणि प्रोफेसर वीरू सहस्रबुद्धे उर्फ व्हायरस (बोमन इराणी) यांनी चित्रपटात धमाल उडवून दिली आहे.
तीन तास डोक्याला कोणताही ‘शॉट’ न देता मस्त करमणूक करणाऱ्या आणि पोटभरून हसायला लावणाऱ्या या चित्रपटात शैक्षणिक पद्धतीवर टीकाही करण्यात आली आहे. देशात दरवर्षी हजारो ‘परीक्षार्थी’ पदवीधर होतात. शैक्षणिक संस्था फक्त परीक्षार्थी घडवतात विद्यार्थी नाही. हा महत्त्वाचा मुद्दा या चित्रपटातून मांडण्यात आला आहे.
एका चांगल्या कथानकाला समृद्ध दिग्दर्शनाची आणि कसदार अभिनयाची जोड मिळाल्यावर एक उत्तम कलाकृती निर्माण होते. 3 इडियट्स हा असाच चित्रपट आहे. यामधली गाणीही सुपर डुपर हिट झाली होती. कॉलेज, हॉस्टेल लाईफ, प्रेम, मैत्री या साऱ्या गोष्टी तर यामध्ये आहेतच; पण यामधली सर्वात जास्त भावलेली गोष्ट म्हणजे हा चित्रपट दुःखाचं भांडवल न करता त्यातही हसायला शिकवतो. आपल्या विचारांवर ठाम राहायला शिकवतो. चित्रपटाबद्दल लिहावं तेवढं कमी आहे. पण चित्रपटाच्या मेकिंग दरम्यान घडलेल्या गंमतींबद्दल अगदी थोडक्यात सांगता येईल. त्याबद्दलच थोडंसं (Unknown facts about 3 Idiots)-
रांचोच्या भूमिकेसाठी आमिर खान नव्हता पहिली पसंती
पूर्वी आमिरने नाकारलेले काही चित्रपट शाहरुखला मिळाले आणि त्याच्या कारकिर्दीने आकार घेतला. पण थ्री इडियट्समधील आमिरची भूमिका आधी शाहरुख खानला ऑफर करण्यात आली होती. पण त्यावेळी त्याला ‘माय नेम इज खान’ चित्रपटावर सर्व लक्ष केंद्रित करायचं होतं. त्यामुळे त्याने या चित्रपटाला नकार दिला आणि ही भूमिका आमिरला मिळाली.
चित्रीकरणादरम्यान हॉटेल नाही तर, हॉस्टेलमध्ये राहणं केलं पसंत
चित्रीकरणादरम्यान आमिरने हॉटेलमध्ये राहण्याऐवजी हॉस्टेलमध्ये राहण्यास पसंती दिली. परंतु यासाठी आर माधवन मनापासून तयार नव्हता. अखेर आमिरच्या आग्रहावरून तो तयार झाला. चित्रीकरणामधून ब्रेक मिळाल्यावर आमिर खान हॉस्टेलच्या विद्यार्थ्यांसोबत बुद्धिबळ आणि टेनिस खेळत असे. (Unknown facts about 3 Idiots)
पियाच्या भूमिकेसाठी करीना कपूरने स्वतःहुन घेतला पुढाकार
करीना कपूर राजकुमार हिरानीसोबत काम करण्यास उत्सुक होती. त्यामुळे पियाच्या भूमिकेसाठी तिने स्वतःहून त्यांची भेट घेतली. यानंतर पियाची भूमिका त्यांनी करीनाला दिली.
जेव्हा आमिर दारू पिऊन चित्रीकरण करत होता
चित्रपटामध्ये रांचो, राजू आणि फरहान दारू पितात असं एक दृश्य आहे. हे दृश्य परफेक्ट जमून यायला हवं म्हणून आमिरने खरोखरच दारू पिऊन चित्रीकरण करायचं सुचवलं. परंतु या दृश्याचे असंख्य रीटेक झाले. अखेर कॅमेरा रोलचा स्टॉक संपला. (Unknown facts about 3 Idiots)
अर्शद वारसीला होती ऑफर
अर्शद वारसीला फरहान आणि राजू या दोनपैकी कोणतीही एक भूमिका करण्याची ऑफर देण्यात आली होती. परंतु तारखांअभावी तोहा चित्रपट करू शकला नाही. या दोन भूमिका जॉन अब्राहम आणि सैफ अली खान यांनाही ऑफर करण्यात आल्या होत्या. पण त्यांनीही नकार दिल्यावर शेवटी आर माधवन आणि शर्मन जोशी यांची वर्णी लागली.
दिल्ली नाही बंगलोरमध्ये झालं आहे चित्रकरण
चित्रपटात जरी दिल्ली मधील कॉलेज दाखवण्यात आलं असलं, तरी कॉलेज आणि हॉस्टेलची दृश्ये इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (IIM), बंगलोर येथे चित्रित करण्यात आली होती. (Unknown facts about 3 Idiots)
उलट क्रमाने झालं होतं चित्रीकरण
चित्रपटाचं चित्रीकरण उलट क्रमाने करण्यात आलं होतं म्हणजेच शेवटचं दृश्य सर्वात आधी तर, पहिलं दृश्य सर्वात शेवटी चित्रित करण्यात आलं होतं.
==========
हे देखील वाचा – जेव्हा ‘ऑल द बेस्ट’ नाटकाचे प्रेक्षक भरत जाधव यांच्या वडिलांवर चिडले…
=========
आमिरने घटवलं तब्बल ८ किलो वजन
या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या वेळी आमीरचं वय होतं ४४ वर्ष. यामध्ये आमिरने एका ‘कॉलेज स्टुडंट’ची भूमिका साकारली होती. त्यामुळे तरुण दिसण्यासाठी त्याला तब्बल ८ किलो वजन कमी करावं लागलं.