हम आपके है कौन – अबब! या चित्रपटासाठी माधुरीने घेतलं होतं ‘इतकं’ मानधन!
हम आपके है कौन! चित्रपट प्रदर्शित झाल्यावर अनेकांनी ‘लग्नाची कॅसेट’ म्हणत चित्रपटाची चेष्टा केली, तर कोणी चित्रपटामध्ये जास्त गाणी आहेत म्हणून टीका केली, तर कोणी चित्रपटाची लांबी मोठी आहे म्हणत नाक मुरडले. पण तरीही चित्रपट रेकॉर्डतोड कमाई करत सुपर डुपर हिट झाला. चित्रपटाची साधी सरळ कौटुंबिक कहाणी आणि त्याच्या जोडीला असणारी हलकी फुलकी प्रेमकहाणी प्रेक्षकांना भावली.
हम आपके है कौन (Hum Aapke Hain Koun) रिलीज झाला त्यावेळी हाणामारीच्या चित्रपटांचा जमाना होता. अक्षयकुमार, सुनील शेट्टी, अजय देवगण अशा ॲक्शन हिरोंचे चित्रपट तेव्हा तिकीट बारीवर गर्दी खेचत होते, तर गोविंदाच्या विनोदी चित्रपटांचा खास असा प्रेक्षक वर्ग तयार झाला होता.
या भाऊगर्दीत हा साधा सरळ चित्रपट हरवून जाणार असं सर्वानाच वाटत होतं. पण सर्व अंदाज खोटे ठरवत हा चित्रपट त्यावर्षीचा ‘ब्लॉकबस्टर हिट’ ठरला आणि त्यावर्षीच्या सर्वोत्कृष्ट चित्रपटाचे फिल्मफेअर अवॉर्डही याच चित्रपटाला मिळाले.
चित्रपटाच्या यशामध्ये गाण्यांचा वाटाही तितकाच महत्त्वाचा होता. चित्रपटाची लांबी जास्त असल्यामुळे “चॉकलेट, लाईम ज्यूस…” आणि “मुझ से जुदा होकर…” ही दोन गाणी चित्रपटांमधून काढून टाकण्यात आली होती. परंतु, चित्रपटाची लोकप्रियता पाहून काही दिवसांतच ‘आता … या गाण्यांसह’ असे बॅनर झळकले आणि चित्रपटाने पूर्वीपेक्षा जास्त गर्दी खेचली.
हम आपके है कौनच्या (Hum Aapke Hain Koun) यशाने ‘मैने प्यार किया’ नंतर अजून एक सुपरहिट चित्रपट ‘राजश्री’च्या आणि सलमानच्या खात्यात जमा झाला. माधुरी तर नंबर १ पदावर होतीच. पण या चित्रपटाच्या यशाने ते स्थान बळकट झालं. या चित्रपटाचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे नेहमी नकारात्मक भूमिकेत दिसणारा गोड चेहऱ्याचा हँडसम कलाकार मोहनीश बहल प्रथमच एका ‘आदर्श’ भूमिकेत दिसला आणि प्रेक्षकांनी त्याला आनंदानं स्वीकारलंही. याशिवाय रेणुका शहाणे या मराठी अभिनेत्रीलाही प्रचंड लोकप्रियता मिळाली. तिने साकारलेली ‘पूजा’ ही व्यक्तिरेखा आजही लोकांच्या समरणात आहे.
हम आपके है कौन मध्ये म्हटलं तर मुख्य भूमिका होती ती ‘टफी’ची. या टफीला चित्रपटाच्या शुटिंगनंतर माधुरीने दत्तक घेतलं. त्यानंतर २००० साली टफी हे जग सोडून गेला.
या चित्रपटाने महाराष्ट्रात सांस्कृतिक बदलही घडवले. महाराष्ट्रातील लग्न सोहळ्यांमध्ये अतित्वातच नसणारी ‘बूट लपविण्याची प्रथा’ लग्न सोहळ्याचा एक महत्त्वाचा भाग बनली. तर, माधुरी दीक्षितचे ड्रेसेस आणि रेणुका शहाणेच्या साड्यांची फॅशनही अगदी खेड्यापाड्यांपासून सर्वत्र लोकप्रिय झाली.
या चित्रपटाबद्दल बोलताना एक गोष्ट अजिबात विसरून चालणार नाही, ती म्हणजे प्रसिद्ध चित्रकार एम एफ हुसैन यांनी हा चित्रपटर तब्बल ८५ वेळा बघितल्याच्या बातम्या त्यावेळी वृत्तपत्रांमधून झळकत होत्या. या चित्रपटानंतर एम एफ हुसैन माधुरीचे जबरदस्त फॅन झाले.
या चित्रपटाबद्दल जेवढं लिहावं तेवढं कमी आहे. पण या चित्रपटाच्या ‘मेकिंग’चे किस्से मात्र भन्नाट आहेत आणि त्याबद्दल आवर्जून लिहिलायच हवं.
हम आपके है कौन हा एक ‘रिमेक’ होता
अनेकांचा विश्वास बसणार नाही पण, हा चित्रपट १९८२ साली आलेल्या ‘नदिया के पार’ या हिंदी चित्रपटाचा रिमेक होता. ‘नदिया के पार’ या चित्रपटामध्ये नायक नायिकेच्या भूमिकेत होते सचिन पिळगावकर आणि साधना सिंग. तसंच या चित्रपटातही उत्तरप्रदेश मधील गावातील कुटुंब दाखविण्यात आलं होतं. अर्थात हम आपके है कौन (Hum Aapke Hain Koun) एवढी प्रचंड लोकप्रियता या चित्रपटाला मिळाली नव्हती हे देखील तितकंच खरं आहे.
सलमान खान नाही तर आमिर खान होता पहिली पसंती
प्रसिद्ध वेबसाईट आयएमडीबी (IMDB) नुसार, सूरज बडजात्या यांनी या चित्रपटासाठी नायक म्हणून आमिर खानची निवड केली होती. त्यावेळी आमिर- माधुरी जोडीचा ‘दिल’ सुपरहिट झाला होता तर, दिवाना मुझसा नही या चित्रपटानेही ठीकठाक कमाई केले होती. ही जोडी हळूहळू प्रेक्षकांची लोकप्रिय जोडी बनत चालली होती. परंतु, मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानला चित्रपटाची स्क्रिप्ट आकर्षक वाटली नाही. त्यामुळे त्याने नकार दिला आणि ही भूमिका सलमान खानला मिळाली.
स्क्रिप्टसाठी दिली तब्बल दोन वर्ष
मैने प्यार किया चित्रपटाच्या तुफान यशानंतर सूरज बडजेत्या यांनी लगेचच हम आपके है कौन चित्रपटाची स्क्रिप्ट लिहायला घेतली. मनासारखी स्क्रिप्ट लिहून झाल्याशिवाय चित्रपट हातात घ्यायचा नाही, असा जणू पण त्यांनी केला होता. अखेर दोन वर्षांच्या अथक प्रयत्नानंतर चित्रपटाचं स्क्रिप्ट पूर्ण झालं आणि चित्रपटाच्या यशाने ही दोन वर्षांची मेहनत सार्थकी लागली.
दीदी तेरा देवर दिवाना हे गाणं ‘ओरिजिनल’ नाही
चित्रपटातील दीदी तेरा देवर दिवाना ही गाणं तुफान लोकप्रिय झालं होतं. त्यावेळचे लग्न समारंभ या गाण्याशिवाय पूर्णच होत नसत. परंतु, हे गाणं उस्ताद नुसरत फतेह अली खान यांच्या ‘सारे नबियन’ या गाण्यापासून प्रेरित होतं.
‘धिकताना-धिकताना’ हे असू शकलं असतं चित्रपटाचं शीर्षक
सूरज बडजात्या यांचे वडील आणि राजश्री प्रॉडक्शनचे संस्थापक ताराचंद बडजात्या यांना ‘धिकताना-धिकताना’ हे गाणं इतकं आवडलं होतं की, त्यांनी चित्रपटाचं शीर्षक म्हणून हेच नाव सुचवलं होतं
माधुरीने चित्रपटासाठी घेतले होते तब्बल पावणे तीन कोटी रुपयांपेक्षा जास्त मानधन
प्रसिद्ध वर्तमानपत्र इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार माधुरी दीक्षितने निशाच्या भूमिकेसाठी रु.२,७५,३५,७२९ मानधन घेतलं होतं. अर्थात चित्रपटाची रेकॉर्डतोड कमाई बघता सूरज बडजात्यांचे सर्व पैसे वसूल झाले.
=====
हे देखील वाचा: माधुरीच्या ‘एक दो तीन’ या गाण्यामागील ही ‘भन्नाट’ गोष्ट तुम्हाला माहीत आहे का?
=====
सध्या बॉलिवूडमध्ये १०० कोटी क्लब, २०० कोटी क्लब, ३०० कोटी क्लब निर्माण झाले असले तरी त्यावेळी बॉक्स ऑफिसवर १ बिलियनपेक्षा जास्त कलेक्शन करणारा हा पहिला हिंदी चित्रपट होता. बॉक्स ऑफिस इंडियाने या चित्रपटाचे वर्णन “आधुनिक युगातील सर्वात मोठा ब्लॉकबस्टर” असे केले होते. केवळ भारतातच नाही तर, परदेशातही या चित्रपटाने रेकॉर्डतोड कमाई केली होती.
हम आपके है कौन म्हणजे एक हवाहवासा कौटुंबिक प्रवास आणि या प्रवासामध्येच घडते एक हळवी प्रेमकहाणी; नात्यांची गुंफण आणि भारतीय संस्कृतीचे एक सुंदर चित्रण आणि सोबतच सुमधुर अवीट गीतांची मेजवानी.