कहो ना प्यार है – चित्रपट सुपरहिट झाल्यावर आला होता अंडरवर्ल्डच्या हिट लिस्टवर
तो काळ होता प्रेमकथांचा. शाहरुख, आमिर आणि सलमान हे तीन खान चित्रपटसृष्टीवर अधिराज्य गाजवत होते. तमाम कॉलेज तरुणींच्या हृदयात यापैकी एक ‘खान’ तरी घर करून बसलेला होता. अशातच आगमन झालं ते ‘कहो ना प्यार है’ या रोमँटिक चित्रपटाचं आणि त्याचसोबत या तिन्ही खानांच्या साम्राज्याला आव्हान निर्माण झालं ते ‘हृतिक रोशन’ नामक तरुण, गोड हिरोचं.
सन २००० मध्ये मकरसंक्रांतीच्या दिवशी ‘कहो ना प्यार हैं’ रिलीज झाला आणि बघता बघता दुहेरी भूमिकेतला हृतिक तमाम कॉलेज तरुणींच्या गळ्यातील ताईत बनला. एक साधी सरळ प्रेमकहाणी. कथेमध्ये नावीन्य म्हणाल तर, ते तसं फारसं नव्हतंच. पण राकेश रोशन यांचं उत्तम दिग्दर्शन, परदेशातील ऑफबीट शूटिंग लोकेशन्स, कर्णमधुर गाणी आणि हृतिक – अमिषाच्या जोडीने रसिकांना वेड लावले.
साधारणतः ६ फूट उंचीचा, घाऱ्या डोळ्यांचा, गोरा गोमटा, डान्सर हृतिक आणि गोड चेहऱ्याची अमिषा रातोरात स्टार झाले आणि बघता बघता हा चित्रपटही सुपरहिट चित्रपटांच्या यादीत दाखल झाला. या चित्रपटानंतर हृतिक रोशनला तब्बल ३०,००० ‘मॅरेज प्रपोजल्स’ आली होती.
हृतिक – अमिषा सोबतच चित्रपटसृष्टीत अजून एका कलाकाराचा उदय झाला, तो म्हणजे गायक लकी अली. ‘एक पल का जीना’ आणि ‘क्यों चलती हैं पवन’ या गाण्यांनी लकी अलीसाठी बॉलिवूडचे दरवाजाचे उघडले गेले. ‘क्यों चलती हैं पवन’ या गाण्यासाठी तर लकी अलीला त्या वर्षीचं फिल्मफेअर अवॉर्डही मिळालं.
‘कहो ना प्यार है’ या चित्रपटाला त्या वर्षीची सर्वात जास्त फिल्मफेअर अवॉर्ड्स मिळाली. या पुरस्कारांसह चित्रपटाला वर्षभरात एकूण ९२ पुरस्कार मिळाले आणि याचं नाव थेट गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड’ मध्ये समाविष्ट करण्यात आलं.
या चित्रपटाला मिळालेल्या घवघवीत यशानंतर राकेश रोशन यांना अंडरवर्ल्ड कडून धमक्या आल्या होत्या. तसंच त्यांच्यावर झालेल्या हल्ल्यामधून ते थोडक्यात बचावले होते. या चित्रपटाची कहाणी तशी सामान्य असली, तरी चित्रपट प्रदर्शित झाल्यावर मात्र अनेक असामान्य गोष्टी घडल्या. तसंच, चित्रपटाच्या मेकिंग दरम्यानचे किस्सेही रंजक आहेत. त्याबद्दलच थोडंसं –
नायकाच्या भूमिकेसाठी पहिली पसंती हृतिक नाही तर शाहरुख होता
अनेकांना हे वाचून आश्चर्याचा धक्का बसला असेल. कारण ‘कहो ना प्यार है’ हा राकेश रोशनने हृतिकला फिल्म इंडस्ट्रीमध्ये लॉन्च करण्यासाठीच बनवला होता. परंतु, या स्क्रिप्टच्या सुरुवातीला राकेश रोशनच्या डोक्यात नायकाच्या भूमिकेसाठी शाहरुख खानचे नाव होते. पुढे काही कारणांनी क्लायमॅक्स मनासारखा जमत नसल्यामुळे राकेश रोशनने या स्क्रिप्टसाठी अजून काही वेळ घेतला आणि मग हृतिकने या चित्रपटात काम करण्यास रस दाखवला आणि त्याची निवड करण्यात आली.
हृतिक – अमिषाची पहिली भेट
चित्रपटामध्ये हृतिक – अमिषाची पहिली भेट सिग्नलला होते. अगदी तशीच भेट हृतिक आणि सुझानची (त्याची खऱ्या आयुष्यातली प्रेयसी) झाली होती.
अमिषा पटेलच्या आईनेही चित्रपटामध्ये भूमिका केली होती
चित्रपटात राजच्या आईची भूमिका अमिषा पटेलच्या आईने केली होती.
अमिषा होती तिसरी पसंती
अमिषा पटेलच्या आधी सोनियाची भूमिका करीना कपूरला ऑफर करण्यात आली होती. परंतु, करिनाने पदार्पणासाठी रिफ्युजी चित्रपटाची निवड करत या चित्रपटात काम करायला नकार दिला हे आता ‘ओपन सिक्रेट’ आहे. परंतु, करिनानंतर सोनियाच्या भूमिकेसाठी ऐश्वर्या रायची निवड करण्यात आली होती. परंतु, ऐश्वर्याने नकार दिल्यामुळे ही भूमिका अमिषा पटेलला मिळाली.
रोहित आणि राजच्या व्यक्तिरेखा
चित्रपटातील रोहित आणि राज या दोन्ही व्यक्तिरेखा सकारात्मक व्यक्तिरेखा दाखविण्यात आल्या आहेत. सुरुवातीला राकेश रोशन यांनी राजला नकारात्मक भूमिकेमध्ये दाखविण्याचा विचार केला होता. परंतु, हृतिकच्या सांगण्यावरून राजची व्यक्तिरेखा सकारात्मक दाखविण्यात आली.
=====
हे देखील वाचा : असे सुपरहिट चित्रपट जे आमिरने नाकारायला नको होते…
=====
चित्रपटाचा गोड शेवट
मूळ स्क्रिप्टमध्ये चित्रपटात शेवटी राजचा मृत्यू दाखविण्यात येणार होता. परंतु, चित्रपटाचा शेवट गोड करण्यासाठी राज आणि सोनिया एकत्र आलेले दाखविण्यात आले.
रोहित, राज आणि ह्रतिकची सहा बोटं
हृतिकच्या उजव्या हाताला ६ बोटं आहेत. त्यामुळे राजची व्यक्तिरेखा साकारताना हृतिकने उजव्या हातात ग्लोव्ज घातले व राजला ‘लेफ्टी’ दाखविण्यात आलं आहे.
=====
हे देखील वाचा : दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे – हलक्या फुलक्या प्रेमकहाणीच्या पडद्यामागच्या रंजक कथा
=====
सलमान खानने दिले होते ट्रेनिंग
राजच्या व्यक्तिरेखेसाठी ह्रतिकला बॉडी बिल्डिंग ट्रेनिंग सलमान खानने दिलं होतं.
‘कहो ना प्यार हैं’ म्हणजे अधुरी प्रेम कहाणी पूर्ण करणाऱ्या एका हळव्या प्रेमकहाणीचा सुरेल रोमँटिक प्रवास. या रोमँटिक म्युझिकल हिट चित्रपटामध्ये दाखवलेली सामान्य प्रेमकहाणीच प्रेक्षकांच्या मनाला जास्त भावली. आपलीशी वाटली आणि बॉलिवूडच्या इतिहासात ही कहाणी अजरामर झाली.