ऋतुजा बागवेला मिळाला मानाचा उस्ताद बिस्मिल्लाह खाँ युवा पुरस्कार
जेव्हा उमेश कामतला एक ‘नॉन मराठी मुलगा’ पोलिओग्रस्त समजला…
मराठी चित्रपटसृष्टीमधला ‘चॉकलेट बॉय’ म्हणजे अभिनेता उमेश कामत. नाटक, मालिका, चित्रपट आणि वेबसीरिजच्या दुनियेतही या अभिनेत्याने आपला ठसा उमटवला आहे. चित्रपटसृष्टीची कोणतीही पार्श्वभूमी नसलेल्या सर्वसामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातून चित्रपटसृष्टीमध्ये आलेला उमेश टाइम्स ऑफ इंडियाच्या (२०१७) महाराष्ट्रातील ‘टॉप 20 मोस्ट डिझायरेबल मेन’ या यादीमध्ये तिसऱ्या, तर २०१८ सालच्या यादीमध्ये चौदाव्या क्रमांकावर होता. मराठी चित्रपटसृष्टीतील अतिशय यशस्वी आणि गुणी अभिनेता असणाऱ्या उमेशने इथवर पोहोचण्यासाठी बरीच मेहनत घेतली आहे. (Marathi Actor Umesh Kamat)
मध्यमवर्गीय कुटुंबाचे संस्कार असल्यामुळे असेल कदाचित पण एवढं यश मिळूनही उमेशचे पाय कायम जमिनीवरच राहिले. कॉलेजमध्ये असताना एकांकिका स्पर्धा करूनही त्याने ‘फर्स्ट क्लास’ कधी सोडला नाही. अर्थात याचं संपूर्ण श्रेय तो मित्रांना देतो. त्यांच्या सहकार्यामुळेच अभ्यास या विषयाचं टेन्शन कधी घ्यावं लागलं नाही, हे तो आवर्जून सांगतो.
उमेशने आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात ‘सोनचाफा’ या नाटकापासून केली. या नाटकामधील भूमिका त्याला अपघातानेच मिळाली होती. सोनचाफामध्ये उमेशची भूमिका आधी त्याचा भाऊ जयेश करत होता. भावाचं नाटक म्हणून बरेचदा तो नाटकाच्या प्रयोगाला जात असे. (Marathi Actor Umesh Kamat)
हे नाटक आजोबा आणि त्यांचा नातू यावर आधारित होतं. साधारण २ वर्षांमध्ये या नाटकाचे २५० प्रयोग झाले. या दरम्यान जयेशची उंची वाढली. त्यामुळे नातवाच्या भूमिकेमध्ये तो फिट बसत नव्हता. याच दरम्यान, “भावाचं काम करणार का?” असा प्रश्न उमेशला विचारण्यात आला आणि त्याने चटकन ‘हो’ म्हटलं. त्यावेळी उमेशला त्याने का ‘हो’ म्हटलं, कशासाठी ‘हो’ म्हटलं, काही कळलं नाही. पण ही भूमिका त्याला मिळाली.
सोनचाफा या नाटकाचे साधारण ५० प्रयोग उमेशने केले. पण हे नाटक त्यावेळी त्याने केवळ छंद म्हणूनच केलं होतं. पुढे कॉलेजमध्ये असताना केलेल्या एकांकिका स्पर्धांमुळे त्याला अभिनयाची आवड निर्माण झाली.
‘वादळवाट’ मालिकेदरम्यान उमेशला एका चित्रपटामध्ये नायकाची भूमिका करायची संधी मिळाली. हा चित्रपट होता समर – एक संघर्ष. अर्थात याआधी त्याने काही चित्रपटांमध्ये छोट्या मोठ्या भूमिका केल्या होत्या, पण नायक म्हणून हा त्याचा पहिलाच चित्रपट होता. यामध्ये उमेशने पोलिओ झालेल्या एका मुलाची भूमिका साकारली होती. जो जिद्दीने शिकून वकील होतो आणि आपल्याच अपंग पण गुन्हेगार मित्राविरुद्ध केस लढतो आणि ती जिंकतोही. (Marathi Actor Umesh Kamat)
या भूमिकेसाठी उमेशने प्रचंड मेहनत घेतली होती. भूमिकेच्या अभ्यासासाठी तो अपंग मुलांच्या शाळेत जाऊन त्यांना भेटला. त्याला फक्त या मुलांची ‘बॉडी लँग्वेज’ नाही, तर मानसिकताही समजून घ्यायची होती. जवळपास महिनाभर तो या भूमिकेचा अभ्यास करत होता. या अभ्यासातून त्याला कळलं या मुलांना सहानुभूती नको असते. ही गोष्ट उमेशला प्रचंड भावली.
उमेशच्या या अभ्यासात त्याला मदत झाली ती दीपक जाधव नावाच्या मुलाची. पुढे ट्रायसिकलवर प्रॅक्टिस करण्यासाठी दररोज रात्री १२ वाजता उमेश वरळी सी फेसला जाऊन प्रॅक्टिस करायचा. यासाठी उमेशने दीपकच्या मदतीने एक वेगळा प्रयोग करायचा ठरवला.
===========
हे देखील वाचा – प्रपंच: विभक्त कुटुंबातील मुलांच्या मनात एकत्र कुटुंबाची ओढ निर्माण करणारी मालिका
===========
दिपकचा एक अमराठी मित्र होता. तो पोलिओग्रस्त होता. दिपकने उमेशला सांगितलं, “तू त्याला भेटायला ये. मी त्याला तुझ्याबद्दल काहीच सांगणार नाही. तो मित्र उमेशला भेटल्यावर त्याला वाटलं, हा देखील अपंग मुलगा आहे. इथेच उमेशला आपली तपश्चर्या फळाला आल्याची जाणीव झाली. (Marathi Actor Umesh Kamat)
पुढे या चित्रपटामधील भूमिकेसाठी उमेशला सर्वोत्कृष्ट नायक म्हणून महाराष्ट्र शासन, मटा सन्मान आणि झी गौरव पुरस्कार असे तीन मोठे पुरस्कार मिळाले आणि त्याच्या मेहनतीचं खऱ्या अर्थाने चीज झालं.
– भाग्यश्री बर्वे