‘या’ क्रिकेटपटूमुळे झाला होता राजेश खन्ना आणि अंजू महेंद्रूचा ब्रेकअप!
सत्तरच्या दशकातील हिंदी सिनेमाचा सुपरस्टार राजेश खन्ना याला आपल्यातून जाऊन देखील आता दहा वर्षे झाली. पण त्याच्या बद्दलच्या बातम्या, त्याचे किस्से, त्याची डोळे झुकवून मान वळवण्याची ‘जान लेवा’ अदा, त्याचं बेधुंद वागणं, त्याच्या लव्ह स्टोरीज याबद्दल रसिकांमध्ये अजूनही प्रचंड उत्सुकता कायम आहे.
२४ डिसेंबर १९४२ रोजी जन्मलेल्या राजेश खन्नाचा पहिला चित्रपट वयाच्या २४ व्या वर्षी म्हणजे १९६६ साली आला होता. चेतन आनंद दिग्दर्शित हा सिनेमा होता ‘आखरी खत’! कथानकाच्या दृष्टीने हा सिनेमा उत्तमच होता, पण फारसा चालला नाही!
राजेशची पुढची दोन-तीन वर्षे अशीच गेली. या काळात तो खूप नैराश्यग्रस्त असायचा. पण शक्ती सामंत यांच्या १९६९ साली प्रदर्शित झालेल्या ‘आराधना’ या चित्रपटाने राजेश खन्नाचे नशीबच पालटले आणि तिथून पुढे सलग १५ सिल्वर जुबली चित्रपट देण्याचं रेकॉर्ड त्याने प्रस्थापित केलं.
त्या काळात राजेश खन्नाची इतकी जबरदस्त क्रेझ होती की, तरुणी त्याच्या कारचे चुंबन घेण्यासाठी त्याच्या कारच्या मागे पळत जायच्या आणि संपूर्ण कारला आपल्या लिपस्टिकने रंगवून टाकायच्या, त्याला रक्ताने पत्र काय लिहायच्या, इन शॉर्ट त्याच्यावर ‘जान कुर्बान’ करीत होत्या! साऱ्या भारतवर्षामध्ये राजेश खन्नाने सर्वांना भुरळ घातली होती. याच काळात त्याची पहिली प्रेमकहाणी सुरू झाली!
अंजू महेंद्रू ही राजेश खन्नाची पहिली प्रेयसी. १९६७ ते १९७२ या काळात आजच्या भाषेत सांगायचे तर, राजेश खन्ना तिच्यासोबत ‘रिलेशनशिप’ मध्ये होता. अंजू त्या वेळी एक स्ट्रगलर मॉडेल होती. तिला नायिका व्हायचं होतं. अंजूच्या आईला राजेश खन्ना आणि अंजू महेंद्रू यांचे लग्न व्हावे असे वाटत होते. राजेश खन्ना देखील तिच्यात पूर्णत: गुंतला होता. मीडियामध्ये देखील यांच्या लग्नाच्या वावड्या कायम उठत होत्या. पण अशी एक घटना घडली की त्यातून हे या दोघांचं अचानक ब्रेकअप झालं आणि एकमेकाच्या जीवाला जीव देणारे दोघे अचानक एकमेकाना टाळू लागले.
काय बिनसलं होतं दोघांमध्ये? याला कारणीभूत ठरला एक क्रिकेटचा खेळाडू! हा क्रिकेटचा खेळाडू आपल्या देशातील नव्हता, तर तो होता वेस्टइंडिजचा कर्णधार सर गारफील्ड सोबर्स!
सोबर्स हा त्या काळात क्रिकेट इतिहासातील बुलंद तारा होता. त्याच्या नावावर त्याकाळी कसोटी क्रिकेटमध्ये पाकिस्तान विरुद्ध त्याने फटकावलेल्या नाबाद ३६५ धावांचा वैयक्तिक विक्रम होता. वेस्ट इंडिज संघाचा कर्णधार होता.
१९७०-७१ मध्ये भारताच्या दौऱ्यावर आल्यानंतर त्याची आणि अंजू महेंद्रू या दोघांची भेट झाली आणि ते चक्क एकमेकांच्या प्रेमात पडले! ही गोष्ट राजेश खन्नाला आवडणे शक्यच नव्हतं. त्याने हरतऱ्हेने अंजूला समजावून सांगायचा प्रयत्न केला. खरं तर सोबर्स हा त्या वेळी विवाहित होता, पण अंजू महेंद्रू वर त्याने अशी काय जादू केली होती की राजेश खन्ना सोबत असलेले सगळे संबंध तोडून टाकले आणि ती सरळ सोबर्सच्या गळ्यात जाऊन पडली!
अर्थात त्या काळात आलेल्या मीडियामधील बातम्या वाचल्यानंतर असे लक्षात येते की, राजेश खन्ना आणि अंजू महेंद्रू यांच्यामध्ये त्यापूर्वीच मतभेदांना सुरुवात झाली होती. राजेश खन्नाला टिपिकल ‘भारतीय स्त्री’ बायको म्हणून हवी होती.
शूटिंग वरून परत आल्यानंतर तिने दारात आपली वाट पाहत थांबावे, अशी पारंपारिक पुरुषसत्ताक विचारसरणी राजेश खन्नाची होती. तिने कोणते कपडे घालावेत, पार्टीत कुणाशी बोलावे यावर राजेशची करडी नजर असायची, अशी माहिती अंजू महेंद्रू हिने त्याकाळातील ‘स्टारडस्ट’ या मासिकांमध्ये दिली.
या उलट राजेश खन्नाने त्याच काळातील एका दुसऱ्या मासिकांमध्ये यांच्या ब्रेकअपचे कारण वेगळेच दिले होते. त्याच्या मते अंजू महेंद्रा हिला महागडी शॉपिंग, किटी पार्ट्या यामध्ये जास्त इंटरेस्ट होता. तिला राजेशचा शिडी सारखा वापर करायचा होता. त्यामुळे दोघांमध्ये मतभेद झाले होते आणि त्यात भर पडली सोबर्सच्या प्रेम प्रकरणाची.
दोघांनी एकमेकांवर भरपूर तोंड सुख घेतले. ‘राजेश ला सुरुवातीला मी डिप्रेशन मधून बाहेर काढले’ असा ही दावा अंजूने केला होता. सोबर्स प्रकरण काही वर्ष चाललं आणि नंतर बंद पडलं. दरम्यान राजेश खन्नाने ‘बॉबी’ चित्रपटाची नायिका डिंपल कपाडिया हिच्यासोबत लग्न केले. या लग्नाची देखील एक भन्नाट स्टोरी होती.
एक तर राजेश खन्ना वयाने डिंपल पेक्षा खूप मोठा होता. त्या दोघांमध्ये तब्बल १५ वर्षांचे अंतर होते! पण राजेशला डिंपल बेफाम आवडल्यामुळे त्याने ताबडतोब तिच्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतला.
बॉबी चित्रपटाच्या चित्रीकरणाच्यावेळी डिंपल कपाडिया गरोदर होती! पुढे डिंपल आणि राजेश खन्ना यांचे देखील फार काळ वैवाहिक जीवन टिकले नाही आणि १९८४ साली हे दोघे विभक्त झाले! नंतर काही वर्षांनी डिंपल आणि राजेश खन्ना यांनी एकत्र ‘जय शिव शंकर’ या चित्रपटात काम केले, पण हा चित्रपट प्रदर्शित झालाच नाही.
====
हे ही वाचा: या’ म्युझिक अल्बम्सच्या ‘१२ लाख’ कॅसेट्सची झाली होती विक्रमी विक्री!
====
गंमत पहा राजेश खन्नाची पहिली प्रेयसी अंजू महेंद्रू आणि जिच्या सोबत लग्न झाले ते डिंपल कपाडिया या दोघींसोबत राजेश खन्नाचा एकही चित्रपट आला नाही.
नव्वदच्या दशकामध्ये अंजू महेंद्रू छोट्या पडद्यावर आली आणि अनेक हिंदी मालिकांमध्ये तिने अभिनय केला. डिंपल पासून विभक्त झाल्यानंतर पुन्हा एकदा अंजू महेंद्रा राजेशच्या आयुष्यात आली आणि अधुरे वर्तुळ पूर्ण झाले. राजेश खन्नाचा मृत्यूपर्यंत ती त्याच्यासोबत होती, असं ती सांगते!