सलमानने विनंती करूनही ‘हम दिल दे चुके सनम’ चित्रपटाचा शेवट भन्साळींनी बदलला नाही कारण…
बॉलिवूडमध्ये काही दिग्दर्शकांचं नाव मोठ्या सन्मानानं घेतलं जातं. या दिग्दर्शकांच्या चित्रपटात काम करायला मिळणं, हे भाग्याचं लक्षण समजलं जातं. चित्रपट फ्लॉप होवो किंवा हिट, समीक्षकांकडून कौतुक होणार हे जवळपास निश्चितच असतं. यापैकीच एक नाव म्हणजे ‘संजय लीला भन्साळी’. (Sanjay Leela Bhansali)
१९९६ साली आलेला ‘खामोशी – द म्युझिकल’ हा त्यांनी दिग्दर्शित केलेला पहिला चित्रपट. या चित्रपटाला त्या वर्षीचा सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा (समीक्षक) फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला. आपल्या पहिल्याच चित्रपटामधून त्यांनी आपलं दिग्दर्शन कौशल्य दाखवलं. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अगदीच सुपरहिट नाही पण ठिकठाक कमाई केली असली तरी समीक्षकांनी मात्र या चित्रपटाचं प्रचंड कौतुक केलं. संजय लीला भन्साळी खामोशी चित्रपटाचे केवळ दिग्दर्शक नव्हते तर, लेखक आणि निर्मातेही होते.
तसं बघायला गेलं तर, दिग्दर्शक म्हणून त्यांचा प्रवास सुरु झाला होता १९८९ सालच्या ‘परिंदा’ या चित्रपटापासून. या चित्रपटासाठी त्यांनी सहाय्यक दिग्दर्शकाची जबाबदारी पार पाडली होती. तर लेखक म्हणून त्यांचा प्रवास सुरु झाला ‘१९४२ ए लव्ह स्टोरी’ या चित्रपटापासून. या चित्रपटासाठी त्यांनी विधू विनोद चोप्रा आणि कामना चंद्र यांच्यासोबत सहलेखकाची जबाबदारी पार पाडली होती. बॉलिवूडमधील मातब्बर मंडळींकडे काम केल्यामुळे त्यांना खूप काही शिकायला मिळालं होतं. पण संजय भन्साळींना एवढ्यावरच थांबायचं नव्हतं. त्यांना या मायानगरीमध्ये स्वतःचं अस्तित्व निर्माण करायचं होतं. (Sanjay Leela Bhansali)
‘खामोशी’ नंतरचा त्यांचा चित्रपट म्हणजे ‘हम दिल दे चुके सनम’. सबकुछ संजय लीला भन्साळी (लेखक – दिग्दर्शक- निर्माता) असणारा हा चित्रपट त्यावर्षीचा ब्लॉगबस्टर हिट ठरला. ऐश्वर्या, सलमान आणि अजय देवगनचा ‘लव्ह ट्रँगल’ लोकांच्या पसंतीस उतरला. शिवाय त्या वर्षीच्या फिल्मफेअर अवॉर्डमध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट व सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक अशा दोन पुरस्कारांसह एकूण ९ पुरस्कार या चित्रपटाला मिळाले.
‘हम दिल दे चुके’ सनम नंतर २००२ साली आलेला ‘देवदास’ हा चित्रपटही प्रचंड हिट झाला. या चित्रपटाच्या यशाने संजय लीला भन्साळी या नावाला एक वलय प्राप्त झालं. बॉलिवूडमधल्या आघाडीच्या दिग्दर्शकांमध्ये त्यांचं नाव घेतलं जाऊ लागलं. त्यांना जे हवं ते त्यांनी मिळवलं होतं. पण इथपर्यंतचा त्यांचा प्रवास अजिबात सोपा नव्हता. (Sanjay Leela Bhansali)
संजय लीला भन्साळी यांचा बालपणीचा काळ तसा कठीण होता. त्यांचे वडील प्रचंड दारू प्यायचे. त्यामुळे घरातलं वातावरणही सतत बिघडलेलं असायचं. त्यांचा मृत्यूही दारूमुळेच झाला आहे. वडिलांच्या दारूच्या नशेमुळे भन्साळी यांच्या कुटुंबाची वाताहत झाली. त्यांना आर्थिक चणचणीचा सामना करावा लागला. त्यांच्या आईने व बहिणीने कष्ट करून घर सावरलं. आई कपडे शिवायचं काम करून चरितार्थ चालवायची.
या साऱ्यामुळे संजय भन्साळी (Sanjay Leela Bhansali) यांचं आणि त्यांच्या वडिलांचं कधीच पटलं नाही. कदाचित म्हणून ते आपल्या नावामध्ये कधी आपल्या वडिलांचं नाव न लावता आईचं नाव लावतात. अर्थात असं असलं तरी त्यांना या मनोरंजन क्षेत्राची ओळख झाली ती त्यांच्या वडिलांमुळेच. म्हणूनच भन्साळी आपल्या चित्रपटांमध्ये वडिलांच्या आठवणी आवर्जून दाखवतात.
‘हम दिल दे चुके सनम’ या चित्रपटामध्ये शेवटच्या प्रसंगात सलमान आकाशाकडे बघून आपल्या वडिलांशी भांडताना दाखवला आहे. वडिलांच्या मृत्यूनंतर संजय लीला भन्साळी (Sanjay Leela Bhansali) आकाशाकडे बघून असंच आपल्या वडिलांशी बोलत असत.
या चित्रपटाच्याच दरम्यान ऐश्वर्या – सलमानची प्रेमकहाणी सुरु झाली होती. त्यामुळे सलमानला चित्रपटाचा शेवट मान्य नव्हता. त्याला नंदिनी तिच्या खऱ्या प्रेमाकडे परत जाते, हा शेवट त्याला योग्य वाटत होता. परंतु संजय लीला भन्साळी यांनी असं करण्यास ठाम नकार दिला कारण भन्साळी यांना काहीही करून ‘तो’ प्रसंग चित्रपटात दाखवायचा होता. तसंच नंदिनीने पतीला सोडून प्रियकराकडे परत जाणं, हा शेवट त्यांना स्वतःला अजिबातच पटला नव्हता.
======
हे देखील वाचा – लगान: चित्रपटाच्या मेकिंग दरम्यानचे ७ भन्नाट किस्से
======
वडिलांचा आठवणीतला असाच एक प्रसंग त्यांनी ‘देवदास’ चित्रपटातही दाखवला होता. हा प्रसंग म्हणजे, देवदासच्या वडिलांच्या मृत्यूची शोकसभा चाललेली असते आणि देवदास नशेतच तिथे जातो आणि आपल्या आईजवळ बसून तिला अनोळखी माणसासारखी सहानुभूती दाखवतो. हा प्रसंग संजय लीला भन्साळी यांच्या आयुष्यात घडलेला प्रसंग आहे. त्यांच्या आजीच्या शोकसभेला त्यांचे वडील असेच दारू पिऊन येऊन बसले होते. या प्रसंगाचा संजय भन्साळींच्या मनावर खूप मोठा आघात झाला होता.
आज संजय लीला भन्साळी हे नाव बॉलिवूडमध्ये अत्यंत सन्मानाने घेतलं जातं. बालपणात त्यांनी खूप प्रतिकूल परिस्थितीचा सामना केला आहे. आयुष्याचे टक्के टोपणे खूप लहान वयातच सहन केल्यामुळे असेल कदाचित पण इतकं यश मिळवूनही त्यांचे पाय जमिनीवरच आहेत.
– भाग्यश्री बर्वे