शबाना आझमी यांनी दोन वेळा केला होता आत्महत्येचा प्रयत्न कारण…
अटेंशन सिकिंग सिंड्रोम हा एक मानसिक आजार आहे. तो सर्व वयोगटात दिसत असला तरी लहान मुलांमध्ये बऱ्याचदा याची लक्षणे जास्त दिसतात. ज्यावेळी घरात एकाहून अधिक भावंड असतात त्यावेळी आपल्याकडे पालकांचे अधिक लक्ष असावे याकडे प्रत्येकाचा ओढा असतो. यातूनच मग सिबलींग रायव्हली सुरू होते. भावंडांमधील सूक्ष्म असूयेची बीजे तिथेच रोवली जातात. अर्थात मुलं मोठी झाली की ही भावना उताराला लागते. अशावेळी पालकांची मोठी कसोटी असते. त्यांना आपल्या प्रेमाची मात्रा सर्वांसाठी सारखीच ठेवावी लागते. पण कधीकधी उन्नीस-बीस होते आणि त्यातूनच मोठे कडवट प्रसंग निर्माण होऊ शकतात. अभिनेत्री शबाना आझमीच्या (Shabana Azmi) लहानपणीचा एक किस्सा असाच आहे.
शबाना आझमी ख्यातनाम शायर कैफी आझमी आणि ज्येष्ठ रंगकर्मी शौकत आझमी यांची कन्या. घरातच साहित्य आणि अभिनयाचा वारसा मिळाल्याने तिच्यातील अभिनेत्रीला लहानपणापासूनच प्रोत्साहन आणि वातावरण मिळाले. एक सक्षम, संवेदनशील अभिनेत्री म्हणून ती रुपेरी पडद्यावर आली. तिच्या लहानपणीचा हा किस्सा आहे. शबाना आझमीची (Shabana Azmi) आई शौकत अजमी यांनी २००५ साली त्यांचे ‘कैफी अँड आय’ हे आत्मचरित्र लिहिले. त्यात त्यांनी या घटनेचा उल्लेख केला आहे.
कळत-नकळतपणे पालकांकडून झालेल्या चुकीचा मुलांच्या मनावर खोलवर परिणाम होतो आणि त्यातून ते किती टोकाचे पाऊल उचलतात हे यातून आपल्याला दिसते. शबाना त्यावेळी दहा वर्षांची तर तिचा धाकटा भाऊ बाबा आझमी सहा वर्षांचा होता. एकदा सकाळी दोघे शाळेत जाण्यासाठी तयार झाले होते. नाश्ता करण्यासाठी टेबलवर येऊन बसले होते. शबानाची (Shabana Azmi) आई शौकत आझमी यांनी शबानाच्या प्लेटमधील टोस्ट बाबाच्या प्लेटमध्ये टाकला. आणि ती म्हणाली “बाबाची स्कूल बस आज लवकर येणार आहे त्यामुळे त्याला तुझ्या आधी खाऊ दे तुझ्या साठी नवीन टोस्ट नंतर बनवून देते” असे म्हणून त्यांनी त्यांची कामवाली एलिस्सा हिला शबाना साठी नवीन टोस्ट बनवायला सांगितला.
एलिस्सा टोस्ट घेऊन आली पण तिला शबाना तिथे दिसली नाही. तिने शबानाला तिच्या खोलीमध्ये शोधले पण तिथेही ती नव्हती. तिने शौकत आझमी यांना बोलावले. दोघींनी शबानाचा शोध घ्यायला सुरुवात केली. त्यावेळी तिचा बाथरूम मधून रडण्याचा आवाज आला. बाथरूम मध्ये शबाना (Shabana Azmi) रडत होती.
ती दहा वर्षाची चिमुरडी पोर पण तिच्या मनावर आघात झाला होता. माझ्यापेक्षा आई धाकट्या भावावर जास्त प्रेम करते अशी भावना तिच्या मनात निर्माण झाली होती. त्या रागातच ती शाळेत जायला निघाली. शौकत यांनी तिला हर तऱ्हेने समजावून सांगितले, पण तिचे समाधान झाले नाही आणि ती तशीच शाळेत गेली.
शाळेत गेल्यावर ती मैत्रिणींना आपली सकाळची कहाणी रडत रडत सांगू लागली आणि मी कोणालाच आवडत नाही, मी सर्वांना नकोशी झाली आहे असे म्हणू लागली. तेवढे बोलून ती थांबली नाही, तर तडक शाळेतील प्रयोगशाळेत (केमिस्ट्री लॅब) गेली आणि तिथे बाटलीतील कॉपर सल्फेट (मोरचूद) हे विषारी द्रव्य ती प्यायली. तिच्या मैत्रिणी धावत धावत तिच्याकडे गेल्या. ताबडतोब तिला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. परंतु शाळेतील रसायनची ‘एक्सपायरी डेट’ उलटून गेलेली असल्यामुळे तिला विशेष काही झालं नाही आणि तिचे प्राण वाचले.
याच पुस्तकात शौकत आझमी यांनी, याच वयात शबानाने (Shabana Azmi) आणखी एकदा आत्महत्येचा प्रयत्न केला होता अशी नोंदही केली आहे. यावेळी ग्रँट रोडच्या रेल्वे स्टेशनवर ती धावत गेली होती. धावत्या लोकल खाली जीव द्यायचा प्रयत्न ती करत होती. पण लोकांचे लक्ष गेल्यामुळे तिला त्यांनी बाहेर ओढले.
=======
हे देखील वाचा- ‘या’ चित्रपटासाठी अनिल कपूरने केला आपल्या प्राणप्रिय ‘मिशांचा’ त्याग; पण तरीही…
=======
भविष्यात मात्र शबानाने स्वत:ला एक परिपूर्ण अभिनेत्री म्हणून सिद्ध केले. तिच्या अभिनय यात्रेत तिला पाच वेळा सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. अंकुर(१९७४), अर्थ(१९८३),खंडहर(१९८४),पार(१९८५) गॉडमदर (१९९९) हेच ते पाच चित्रपट!१९८३ , १९८४ आणि १९८५ अशी सलग तीन वर्षे राष्ट्रीय पुरस्कार मिळवून तिने हॅट्रिक पूर्ण केली. स्वामी(१९७८) अर्थ(१९८४) आणि भावना (१९८५) या सिनेमातील भूमिकांना तिला फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता. वैयक्तिक आयुष्यात १९८० साली तिची बेंजामिन गिलानी सोबत एंगेजमेंट झाली होती.पण नंतर १९८४ साली तिने जावेद अख्तर सोबत निकाह केला.