या कारणासाठी आमिर खान ‘कभी खुशी कभी गम’ चित्रपटाच्या प्रीमिअर शो मधून निघून गेला…
हा किस्सा आहे ‘कभी खुशी कभी गम’ (Kabhi Khushi Kabhie Gham) या चित्रपटाच्या प्रिमिअरच्या वेळेचा. हा चित्रपट मल्टीस्टारर चित्रपट होता. अमिताभ बच्चन, जया बच्चन, शाहरुख खान, काजोल, हृतिक रोशन, करीना कपूर अशी तगडी स्टारकास्ट या चित्रपटात होती. या चित्रपटाचे दिग्दर्शक होते करण जोहर. दिग्दर्शक म्हणून त्याचा हा दुसराच चित्रपट होता.
दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे या चित्रपटासाठी करण जोहरने सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम पाहिलं होतं. त्यावेळी त्याची कामाची पद्धत बघून दिग्दर्शक आदित्य चोप्रा आणि अभिनेता शाहरुख खान यांनी त्याला स्वतंत्रपणे दिग्दर्शन करण्याचा सल्ला दिला. यानंतर करणाला अनेकांनी हा सल्ला दिला. अखेर करणने स्वतंत्र चित्रपट बनवायचं ठरवलं आणि १९९८ साली त्याने स्वतंत्रपणे दिग्दर्शित केलेला ‘कुछ कुछ होता है’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि तो सुपर डुपर हिट ठरला. पहिल्याच चित्रपटाला मिळालेलं यश पाहून करण सुखावला. त्याचा आत्मविश्वासही वाढला आणि त्याने दुसरा चित्रपट दिग्दर्शित करायचं ठरवलं.
पहिला चित्रपट म्हणजे लव्हस्टोरी होती. आता आपला दुसरा चित्रपट एक कौटुंबिक चित्रपट असावा असं करणला मनापासून वाटत होतं. पण त्याच्याकडे यासाठी कुठलंच स्क्रिप्ट नव्हतं. मग त्याने यश चोप्रा यांचा ‘कभी कभी’ आणि सूरज बडजात्यांचा ‘हम आपके है कौन’ या चित्रपटांवरुन प्रेरित होऊन एक स्क्रिप्ट तयार केलं. करणवर ‘हम आपके है कौन’ या चित्रपटाचा एवढा प्रभाव पडला होता की, त्याने त्याच्या या नव्या चित्रपटातही असाच भव्यदिव्य फॅमिली ड्रामा दाखवायचा निश्चय केला.
या नव्या चित्रपटासाठी त्याने बॉलिवूडमधले नामांकित चेहरे निवडले. भव्य सेट, कलाकारांचे महागडे कपडे, परदेशी लोकेशन्स आणि चित्रपट भव्यदिव्य होण्यासाठी आवश्यक असणाऱ्या सर्वच गोष्टींवर त्याने पाण्यासारखा पैसा खर्च केला. हा चित्रपट होता ‘कभी खुशी कभी गम’. या चित्रपटात शाहरुख आणि हृतिक प्रथमच एकत्र आले होते. हृतिक त्यावेळी त्याचा पहिलाच चित्रपट ‘कहो ना प्यार है मुळे’ स्टार बनला होता. सर्व कलाकारांची निवड मनासारखी झाली होती. तसंच बिग बींसोबत काम करण्याचं स्वप्न सत्यात उतरतंय म्हटल्यावर करण प्रचंड सुखावला. एका इंटरव्यूमध्ये करणने सांगितलं होतं, “चित्रीकरणाच्या दिवशी बिग बींना समोर बघून मनात आनंद, उत्साह, भीती या सर्व भावना एकत्र दाटून आल्या आणि मला सेटवरच चक्कर आली.”
एवढे मोठे स्टार कलाकार असूनही करणची हौस काही फिटली नव्हती म्हणून या चित्रपटात राणी मुखर्जी, जुगल हंसराज या कलाकारांना त्याने पाहुणा कलाकार म्हणून म्हणून घेतलं. खरंतर राणी मुखर्जीची भूमिका प्रेक्षकांसाठी ‘सरप्राईज’ ठरावी म्हणून करणने याबद्दल मौन बाळगायचं ठरवलं होतं. पण ‘सोनी म्युझिक’च्या चुकीमुळे ही गोष्ट उघड झाली. या चित्रपटात एका दृश्यामध्ये रस्त्यावरून जाणारा एक माणूस करिना कपूरला वेळ विचारतो. हा माणूस म्हणजे अभिषेक बच्चन असतो. पण नंतर चित्रपट तयार झाला तेव्हा अभिषेकच्या सांगण्यावरून करणने हे दृश्य चित्रपटातून काढून टाकलं.
=======
हे देखील वाचा : जेव्हा खुद्द दिलीपकुमार खजील झाले…
=======
अखेर करणला हवा तसा भव्यदिव्य चित्रपट ‘कभी खुशी कभी गम’ (Kabhi Khushi Kabhie Gham) तयार झाला. चित्रपटाचा प्रीमियर शो आयोजित करण्यात आला. याठिकाणी आमिर खान आणि आशुतोष गोवारीकर यांच्यासह इंडस्ट्रीतील नामवंत कलाकार उपस्थित होते. आमिर खान सुरुवातीला चित्रपट बघायला बसला परंतु नंतर मात्र संधी मिळताच तो हळूच तिथून निघून गेला. कारण त्याला चित्रपट अजिबात आवडला नव्हता आणि त्याला माहिती होतं प्रीमिअर नंतर करण नक्की चित्रपटाबद्दल विचारणार. बरं प्रिमिअरच्याच दिवशी चित्रपट आवडला नाही, असं करणला कसं सांगणार? त्यामुळे आमिरने गुपचूप तिथून निघून जायचा निर्णय घेतला.
चित्रपटगृहांमध्ये चित्रपट कसा चालेल, याचा अंदाज सहसा या प्रीमियर्समध्ये लावला जातो. पण ‘कभी खुशी कभी गम’च्या (Kabhi Khushi Kabhie Gham) प्रीमियरला आलेल्या लोकांच्या प्रतिक्रिया खूपच नकारात्मक होत्या. अनेकांना असं वाटत होतं की, हा साडेतीन तासांचा चित्रपट थिएटरमध्ये कोण बघणार? पण सूरज बडजात्याच्या ‘हम आपके है कौन’ या चित्रपटाच्या वेळीही असंच वातावरण निर्माण झालं होतं. पण तो चित्रपट या सगळ्या प्रतिक्रियांच्या पलीकडे गेला आणि सुपर डुपर हिट ठरला आणि कबी खुशी कभी गम हा चित्रपटही यशस्वी ठरला.