‘या’ चित्रपटासाठी अनिल कपूरने केला आपल्या प्राणप्रिय ‘मिशांचा’ त्याग; पण तरीही…
त्या काळात यश चोप्रा यांच्या सिनेमात काम मिळावे म्हणून प्रत्येक कलावंत धडपडत असायचा. अनिल कपूरची देखील यश चोप्रांच्या चित्रपटात भूमिका मिळावी ही आंतरिक इच्छा होती. त्यांची इच्छा पूर्ण देखील झाली. यश चोप्रांच्या दोन सिनेमात त्यांनी काम केले. ‘मशाल’ आणि ‘विजय’. परंतु हे दोन्ही चित्रपट अनिल कपूरसाठी (Anil Kapoor) ओळखले जात नाहीत.
१९८३ साली आलेल्या ‘मशाल’ हा चित्रपट प्रामुख्याने दिलीप कुमारसाठी ओळखला जातो, तर १९८८ साली आलेल्या ‘विजय’ मध्ये राजेश खन्ना, हेमा मालिनी, ऋषी कपूर अशी मोठी स्टारकास्ट होती. हा चित्रपट मल्टिस्टारर असल्यामुळे अनिल कपूरला फारसे क्रेडिट मिळालं नाही. त्यामुळे अनिल कपूरला यश चोप्रा सोबत ‘सोलो हिरो’ असलेला सिनेमा हवा होता. ही संधी त्यांना मिळाली ती १९९१ साली आणि चित्रपट होता लम्हे.
खरं तर या लम्हे चित्रपटामध्ये सुरुवातीला अमिताभ बच्चन आणि श्रीदेवी ही जोडी जमणार होती. परंतु चित्रपटातील नायकाचे वय अमिताभच्या तत्कालिन वयाशी मॅच न होणारे असल्यामुळे हे कल्पना मागे पडली. मग नायकाचा शोध सुरू झाला. या चित्रपटाचे कथानक हनी इराणी यांनी लिहिले होते. हनी इराणी यांनी अनिल कपूरचे (Anil Kapoor) नाव यश चोप्रा यांना सुचवले.
यश चोप्रा यांनी अनिल कपूरला बोलावून त्याची स्क्रीन टेस्ट घेतली. कारण यात नायकाची भूमिका सर्वस्वी वेगळी होती. यातील तरुणपणाच्या नायकाच्या भूमिकेसाठी यश चोप्रांनी अनिल कपूरला तुझ्या मिशा तुला काढाव्या लागतील असे सांगितले. अनिल कपूरचे त्याच्या मिशांवर जीवापाड प्रेम होते. त्यामुळे त्याने कधीच कुठल्याही चित्रपटात मिशा काढल्या नव्हत्या. पण या चित्रपटासाठी मात्र मिशा काढायची आवश्यकता होती.
खूप जड अंतःकरणाने त्याने आपल्या मिशांचा त्याग केला आणि ‘सफाचट’ अनिल कपूर (Anil Kapoor) पहिल्यांदाच ‘लम्हे’ या चित्रपटात दिसला. चित्रपट पूर्ण झाला. समीक्षकांना हा चित्रपट खूप आवडला. पण सामान्य जनतेला मात्र हा चित्रपट अजिबात आवडला नाही. कदाचित हा विषय काळाच्या पुढे असल्यामुळे त्यांच्या डोक्यावरून गेला. त्यामुळे चित्रपट फ्लॉप ठरला. यश चोप्रांनी चुकीच्या काळात सिनेमा काढला असे म्हणावे लागेल.
आज ओटीटीच्या माध्यमामुळे प्रेक्षकांची ‘मॅच्युरिटी’ वाढली आहे. ओटीटीमुळे वेगवेगळ्या ‘जॉनर’चे विषय त्यांच्यासमोर येत आहेत. आजच्या काळात जर ‘लम्हे’ सारखा विषय आला असता, तर कदाचित त्याला यश मिळालं नसतं. आपल्या प्राणप्रिय मिशांचा त्याग करून अनिल कपूरने (Anil Kapoor) ‘लम्हे’ केला, पण त्याला व्यावसायिक यश मिळाले नाही. तसेच त्याला पारितोषिक देखील मिळाले नाही. पण या चित्रपटातील भूमिकेसाठी श्रीदेवीला मात्र सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचे फिल्मफेअर पारितोषिक मिळाले.
लम्हे या चित्रपटाला त्यावर्षीचे फिल्मफेअरचे सर्वोत्कृष्ट चित्रपटाचे पारितोषिक मिळाले होते. तसेच सर्वोत्कृष्ट विनोदवीर म्हणून अनुपम खेर यांना, सर्वोत्कृष्ट कथानक म्हणून हनी इराणी यांना आणि सर्वोत्कृष्ट संवाद म्हणून राही मासूम रजा यांना पुरस्कार प्राप्त झाले. राही मासूम रजा यांच्यासाठी हा शेवटचा चित्रपट ठरला. कारण या चित्रपटानंतर काही महिन्यातच त्यांचे दुर्दैवी निधन झाले.
लम्हे या चित्रपटाला शिवहरी यांचे संगीत होते. गाणी आनंद बक्षी यांनी लिहिली होती. यातील ‘कभी मै कहू कभी तुम कहो’ या गाण्याची धून ‘चांदनी’(१९८९) या यश चोप्रा यांच्या चित्रपटात पार्श्वभागी वापरली होती. या धून मधूनच हे गाणे तयार झाले. यातील इला अरुण आणि लता मंगेशकर यांनी गायलेले ‘मोरनी बागा मा बोले’ त्या काळात खूप लोकप्रिय झाले होते. हरिहरन यांच्या स्वरातील ‘ये लम्हे ये पल’ या गाण्याला देखील रसिकांनी चांगली दाद दिली होती. (Anil Kapoor)
=======
हे देखील वाचा – ‘या’ गोष्टीमुळे काजोलने केले होते आईसोबत भांडण; दोन आठवडे धरला होता अबोला..
=======
हा चित्रपट खरंतर दिवाळीतच प्रदर्शित होणार होता, पण त्याचवेळी रमेश सिप्पी यांचा अमिताभ बच्चन अभिनीत ‘अकेला’ हा चित्रपट प्रदर्शित होणार होता. त्यामुळे विनाकारण टक्कर नको म्हणून त्यांनी या सिनेमाचे प्रदर्शन एक महिना पुढे ढकलले. ‘लम्हे’ हा चित्रपट २२ नोव्हेंबर १९९१ या दिवशी प्रदर्शित झाला. याच दिवशी अजय देवगनचा पहिला चित्रपट ‘फूल और कांटे’ हा देखील प्रदर्शित झाला. यश चोप्रांना ‘फूल और कांटे’ हा चित्रपट बी ग्रेडचा मारधाड सिनेमा वाटल्याने त्यांनी ‘लम्हे’ चित्रपट त्याच्यासोबत प्रदर्शित केला. पण झाले उलटेच. दुर्दैवाने लम्हे फ्लॉप झाला आणि ‘फूल और कांटे’ चित्रपट धो धो तुफान चालला.