ऋतुजा बागवेला मिळाला मानाचा उस्ताद बिस्मिल्लाह खाँ युवा पुरस्कार
आशा पारेख का आग्रह करत होत्या स्वतःवरच चित्रित झालेलं गाणं डिलीट करण्याचा?
हिंदी सिनेमातील काही गाणी चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी मोठी वादग्रस्त बनलेली असतात. ही गाणी सिनेमातून काढून टाकावीत की काय इथपर्यंत विचार झालेला असतो. परंतु ज्यावेळी चित्रपट प्रदर्शित होतो त्यावेळी मात्र ही वादग्रस्तता कुठल्या कुठे पळून जाते आणि ती गाणी चक्क सुपरहिट होतात. असाच एक किस्सा १९६८ सालच्या ‘शिकार’ या चित्रपटातील एका गाण्याबाबत झाला होता.ते गाणं होतं परदे में रहने दो परदा ना उठाओ…’ ‘शिकार’ हा चित्रपट ज्येष्ठ अभिनेते दिग्दर्शक गुरुदत्त यांचे बंधू आत्माराम यांनी निर्माण केला होता आणि त्याचे दिग्दर्शन देखील त्यांचेच होते. त्यांच्या दिग्दर्शनातील हा पहिला सुपरहिट सिनेमा होता. गुरुदत्त फिल्मची सर्व टीम म्हणजे अब्रार अल्वी, व्ही के मूर्ती, जॉनी वॉकर, रेहमान या सिनेमाच्या सोबत होती. हा सिनेमा म्हणजे एक मर्डर मिस्टरी होता. धर्मेंद्र, आशा पारेख, संजीव कुमार, रमेश देव हेलन, रहमान, जॉनी वॉकर हे कलावंत या चित्रपटात होते. या चित्रपटाची गाणी हसरत जयपुरी यांनी लिहिली होती. तर संगीत शंकर जयकिशन यांचे होते.
१९५९ सालच्या ‘कागज के फूल’ या चित्रपटानंतर गुरुदत्त फिल्मच्या चित्रपटाचे संगीतकार सातत्याने बदलत होते. ‘कागज के फूल’ चे संगीतकार होते सचिन देव बर्मन. १९६० साली आलेल्या ‘चौदहवी का चांद’ या चित्रपटाला संगीतकार रवि, त्यानंतर १९६३ सालच्या ‘साहब बीवी और गुलाम’ या चित्रपटाला संगीत हेमंत कुमार यांचे होते. या चित्रपटानंतर गुरुदत्त यांनी आत्महत्या केली आणि त्यांचा अर्धवट राहिलेल्या ‘बहारे फिर भी आयेगी’ या चित्रपटाला ओ पी नय्यर यांचे संगीत होते. या चित्रपटातील गाणी मोहम्मद रफी, आशा भोसले, लता मंगेशकर आणि कृष्णा कल्ले यांनी गायलेली होती. ‘तुम्हारे प्यार मे हम बेकरार होके चले, शिकार करने को आये शिकार होके चले’ हे रफीच्या धुंद स्वरातील गाणे मस्त जमून आले होते. या सिनेमात लता मंगेशकर आणि आशा भोसले यांनी एकत्रित गायलेलं ‘जबसे लगी तो से नजरिया…’ हे गाणं होते. पण या चित्रपटाचे हायलाईट ठरले आशा भोसले यांनी गायलेले ‘परदे मे रहने दो परदा ना उठाओ परदा जो उठ गया तो भेद खुल जायेगा…’ हे गाणं आज देखील प्रचंड लोकप्रिय आहे.
परंतु तुम्हाला माहिती आहे का हे गाणं चित्रपटातून काढून टाकावे इथपर्यंत चर्चा झाल्या होत्या. काय होता हा किस्सा? मुळात हे गाणं एका कव्वालीवर आधारित होतं. युसुफ आझाद यांचे नाव साठच्या दशकामध्ये भारतभर गाजत होते. त्यांच्या कव्वालीने सर्वत्र रेकॉर्ड ब्रेक लोकप्रियता हासील केली होती. त्यांची एक कव्वाली होती ‘सीनेमे रहने दो होटोपे ना लाओ..’ याच कव्वालीवरून हसरत जयपुरी यांनी गाण्याचा मुखडा लिहिला. अर्थात कव्वाली आणि गाण्याचा सारखेपणा इथपर्यंतच होता. नंतरचे गाणे टोटली वेगळे होते. आशा भोसले यांनी मोठ्या ठसक्यात गाणं गायलं होतं. आशा पारेख यांच्यावर हे गाणं चित्रीत झालं. तोपर्यंत सर्व ठीक होत. परंतु ज्या वेळेला ट्रायलच्या वेळेला हे गाणं आशा पारेख यांनी पाहिलं; त्यावेळेला त्यांचे कान कोणीतरी भरले आणि हे गाणे अश्लील आहे असे त्यांच्या डोक्यात बसवले! या गाण्यातून अश्लीलता दिसून येते असं आशा पारेखच्या डोक्यात फिट्ट बसले!
तिने दिग्दर्शक आत्माराम यांना हे गाणे चित्रपटातून काढून टाका असे सांगितले. त्यांनी कारण विचारले असता तिने ‘हे गाणे अश्लीलता वाढवणारे आहे’ असे सांगितले. आत्माराम यांनी डोक्याला हात मारून घेतला! आशा पारेख पुढे असं म्हणाली ,”म्हणूनच हे गाणे लता मंगेशकर यांनी गायला नकार दिला होता. खरं तर लता मंगेशकर ह्या शंकर जय किसन यांच्या फेवरेट गायिका आहेत. मग त्यांनी हे गाणे का नाकारले? या गाण्याचा माझ्या करिअरवर परिणाम होऊ शकतो. तुम्ही हे गाणे चित्रपटातून काढून टाका. किंवा दुसऱ्या कुठल्या तरी सहाय्यक अभिनेत्री वर हे गाणे चित्रित करा” आत्माराम म्हणाले ,” असं काही नाही .आणि मुख्य म्हणजे तुला हे अजब तर्कट कुणी सांगितले?” त्यावर आशा पारेख काही बोलली नाही पण तिचा गाणे डिलीट करण्याचा हट्ट कायम होता. आत्माराम यांच्यापुढे मोठा पेच प्रसंग निर्माण झाला. कारण शंकर जयकिशन यांच्या मते यात अश्लीलता अजिबात नव्हती आणि हे गाणे सुपरहिट होणार याची त्यांना खात्री होती. काय करावे? चित्रपटात गाणे ठेवले तर आशा पारेख नाराज होणार आणि काढले तर शंकर जयकिशन नाराज होणार! आत्माराम दोन्ही बाजूने कात्रित सापडले होते. यामुळे चित्रपटाच्या प्रदर्शनाला उशीर होत होता.
=======
हे देखील वाचा : त्या दिवशी मन्नाडे, गायिका कविता कृष्णमूर्ती वर कां इतके संतापले?
======
पुन्हा एकदा सर्वजण एकत्र बसले. शंकर जय किशन यांनी व्यवस्थितपणे आशा पारेख यांना सांगितले,” आपण म्हणता तसं काहीही अश्लीलता या गाण्यात नाहीए. तुमचा अभिनय देखील या गाण्यातला अतिशय सुंदर झालेला आहे. तुमच्या एकून कारकिर्दीतील हे सुपर हिट गाणे होणार आहे. तेंव्हा डोंट वरी! कृपा करून या चांगल्या गाण्याला सिनेमातून डिलीट करू नका!” सगळ्यांनी समजून सांगितल्यानंतर आशा पारेख यांनी गाणे चित्रपटात ठेवण्यात आला होकार दिला परंतु प्रेक्षकांकडून जर तशी मागणी आली तर गाणे डिलीट करा असा आग्रह कायम ठेवला. शेवटी या गाण्यासहित चित्रपट प्रदर्शित झाला आणि हे गाणे सुपरहिट ठरले. सर्वांच्या तोंडी हेच गाणे होते. त्यावर्षीच्या वार्षिक बिनाका गीतमाला मध्ये या गाण्याने नववा क्रमांक मिळवला.
प्रेक्षकांना, समीक्षकांना कुणालाही हे गाणे अश्लील वाटले नाही. हळूहळू आशा पारेख देखील या गाण्याला लाईक करू लागल्या. या गाण्याला आशा भोसले यांना या गाण्यासाठी चक्क फिल्मफेअर पुरस्कार देखील मिळाला! आशा पारेख यांच्या सांगण्यावरून जर ते गाणे चित्रपटातून काढून टाकले असते तर एका चांगल्या गाण्याला प्रेक्षक मुकले असते. कधी कधी माणूस विचार काहीही करतो आणि खरंतर भाग्य काही वेगळेच सांगत असते!
धनंजय कुलकर्णी