दिग्दर्शक सुभाष घई आणि गीतकार आनंद बक्षी यांचे जबरदस्त ट्युनिंग!
…यामुळे बिग बींनी बस स्टॉपवर असहाय्य अवस्थेत असलेल्या भारत भूषण यांना दिली नाही लिफ्ट
कोणत्याही कलाकाराला रुपेरी पडद्यावर मिळालेले यश हे काही चिरंतन असत नाही. यश आणि अपयशाचा हा उन सावलीचा खेळ अनेक कलावंतांच्या वाट्याला येतो. सतत लाईमलाईटच्या प्रकाशात उजळून जाणारं रुपेरी आयुष्य क्षणार्धात अंधाराच्या गर्तेत फेकलं जातं आणि मग सुरू होतो जीवन संघर्ष. कैफी आजमी यांनी ‘कागज के फूल’ या चित्रपटात एक फार सुंदर गाणं लिहिलं आहे. “वक्त ने किया क्या हसी सितम, तुम रहे ना तुम हम रहे ना हम” त्या सिनेमाच्या संदर्भात हे प्रेमाचं गाणं जरी असलं तरी व्यावहारिक जीवनात १००% लागू पडतं. (Untold story of Bharat Bhushan)
यशाची हुलकावणी कलावंताला खूप वेदनादायी असतं. यशाच्या, प्रसिद्धीच्या लाटेवर स्वार असणाऱ्याला पुन्हा संघर्षाचे क्षण वाट्याला आल्यावर होणारी जीवाची तगमग भयंकर असते. ‘उगवत्या सूर्याला नमस्कार’ करण्याची रीत असलेल्या समाजात हे कलाकार मग क्षणार्धात आपली ओळख हरवून बसतात. जिथे लाखोंचा चाहता वर्ग असायचा तिथे आता चिटपाखरूही फिरकत नाही ही खंत मनाला पोखरणारी असते. पण आयुष्य जगावंच लागतं. ते कुणासाठी कधी थांबतं?
पन्नासच्या दशकातील लोकप्रिय कलावंत भारत भूषण यांना याच यशापयाशाच्या खेळाच्या कटू अनुभवाला सामोरं जावं लागलं. याबाबत असा एक किस्सा अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या ब्लॉगमध्ये लिहिला आहे. पन्नासच्या दशकात भारत भूषण यांची गणना टॉपच्या अभिनेत्यांमध्ये होत होती. बैजू बावरा, मिर्झा गालिब, बसंत बहार, फागुन, गेट वे ऑफ इंडिया या आणि अशा यशस्वी सिनेमांचे ते नायक होते. त्यांच्या सिनेमांना तुफान यश मिळत होतं. त्यांचा ‘बरसात की रात’ हा साठ सालातला सिनेमा प्रचंड गाजला होता. त्या काळातील आघाडीच्या नायिका नर्गीस, मीना कुमारी, मधुबाला, माला सिन्हा यांच्या सोबत भारत भूषण नायक म्हणून चमकत होते. अनेक दिग्गज दिग्दर्शकांसोबत त्यांनी काम केले होते.
साठच्या दशकात त्यांनी नंतर चित्रपट निर्मितीमध्ये लक्ष घातलं. ‘दूज का चांद’ हा चित्रपट बनवला. यात राजकुमार, अशोक कुमार, भारत भूषण, बी सरोजा देवी यांच्या भूमिका होत्या. नितीन बोस हे बुजुर्ग दिग्दर्शक लाभले होते. लाखो रुपये खर्चून बनवलेल्या या चित्रपटाला अजिबात व्यावसायिक यश मिळाले नाही. कर्जाचा डोंगर उभा राहिला आणि इथूनच भूषण यांच्या अधोगतीला सुरुवात झाली. (Untold story of Bharat Bhushan)
साठच्या दशकाच्या अखेरीस त्यांनी चरित्र अभिनेत्याची भूमिका करायला सुरुवात केली. सत्तरच्या दशकात त्यांनी अनेक लहान सहान चित्रपटातून भूमिका केल्या. पण नंतर त्यावरदेखील मर्यादा येऊ लागली. ऐंशीच्या दशकात तर त्यांना जुनिअर आर्टिस्ट म्हणून कामं मिळू लागली. ‘डेली पेड आर्टिस्ट’ या कॅटगिरीमध्ये ते केव्हा गेले, हे त्यांचं त्यांनाच कळलं नाही.
यशाची मोठी इनिंग खेळलेला हा कलाकार आता छोट्या भूमिकेसाठी तरसू लागला. पण भारत भूषण यांची कामावरची श्रद्धा अजिबात कमी झाली नाही. स्टारडम गेलं, वैभव गेलं, बंगला गेला (त्यांचा पुण्यातही युनिव्हर्सिटी रोडवर शानदार बंगला होता). एकेकाळी दहा दहा गाड्यांचा ताफा असलेला हा कलाकार खऱ्या अर्थाने ‘बे-कार’ झाला. मुंबईत अनेकदा ते पब्लिक ट्रान्सपोर्टच्या बसमधून प्रवास करीत. (Untold story of Bharat Bhushan)
याच काळातील एक आठवण अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या ब्लॉगमध्ये लिहिली आहे. एकदा अमिताभ बच्चन त्यांच्या कारमधून सांताक्रूझ भागातून एका स्टुडिओमध्ये चालले होते. सकाळची वेळ होती. रस्त्यावर भरपूर रहदारी होती. बसेस पूर्ण गर्दीने वाहत होत्या. अमिताभ बच्चन यांचे लक्ष सहज एका बस स्टॉपवर गेलं आणि त्यांना हादराच बसला. कारण त्या बस स्टॉपवर पन्नासच्या दशकातील एक सुपरस्टार भारत भूषण सामान्य नागरिकाप्रमाणे बसची वाट पाहत उभे होते.
या स्टॉपवर अनेक लोक होते. पण कुणालाही कल्पना नव्हती की, गोल्डन एरा मधील एक कलाकार ज्याच्यावर ‘तू गंगा की मौज, मै जमुना का धारा’, ‘दो घडी वो जो पास आ बैठे हम जमानेसे दूर जा बैठे’, ‘तेरी आंख के आंसू पी जाऊ ऐसी मेरी तकदीर कहां’, ‘इक परदेसी मेरा दिल ले गया’, ‘फिर वही शाम वही गम वही तनहाई है’ अशी अप्रतिम गाणी चित्रित झाली आहेत! (Untold story of Bharat Bhushan)
अमिताभ बच्चन यांच्या काळजात चर्र झालं. भारत भूषण यांचा वैभवाचा काळ त्यांच्या डोळ्यापुढे आला. ‘खून पसीना’, ’शराबी’, ’याराना’, ’नास्तिक’ हे सिनेमे दोघांनी एकत्र केले होते. त्यांनी ड्रायव्हरला गाडी साईडला घ्यायला सांगितली. एका क्षणी त्यांना वाटलं की, भारत भूषण यांना गाडीत घ्यावं, त्यांची विचारपूस करावी, त्यांना गंतव्य स्थानावर सोडावं. पण नंतर लगेच त्यांनी असा विचार केला की, आपल्या या कृतीने भारत भूषण यांच्या स्वाभिमानाला धक्का पोहोचेल. त्यांना आता बस स्टॉपवरचं कुणी ओळखत नाही, पण त्यांना जर आपण तिथून गाडीत घेतलं, तर त्यांची लाजिरवाणी अवस्था होईल. त्यांचं अपयश, त्यांची गरीबी, त्यांना आणखी प्रकर्षाने जाणवू लागेल. त्यांना या क्षणी अशा पद्धतीनं दुखावणं योग्य नाही, असा ‘समंजस ‘ विचार करून जड मनाने अमिताभ बच्चन भारत भूषण यांना आपल्या गाडीत न घेता निघून गेले. (Untold story of Bharat Bhushan)
=========
हे देखील वाचा – या पाकिस्तानी चाहत्यामुळे हेमा मालिनीने गमावली आपली जवळची व्यक्ती..
=========
पण ते दृश्य त्यांचा पिच्छा सोडायला तयार नव्हते. त्यांनी ब्लॉगमध्ये याबाबत लिहिलं, “असा प्रसंग कुणावरही येऊ शकतो. प्रेक्षक तुम्हाला यशाच्या शिखरावर घेऊन जातात तसंच तिथून तुम्हाला ते उतरवूही शकतात. त्यामुळे प्रत्येकानं मानसिकरित्या अशा कठीण प्रसंगी खंबीर राहण्याची तयारी ठेवली पाहिजे. “Nothing is permanent in the life!” हेच अंतिम सत्य आहे.”
भारत भूषण यांनी या कटू काळाला देखील स्वीकारलं आणि कलेप्रती असलेली आपली श्रद्धा कायम ठेवून ते शेवटपर्यंत काम करत राहिले.