Nilu Phule : हॉलिवूड चित्रपटांची आवड ते लोकनाट्य, निळू फुलेंच्या

देव आनंदच्या ‘त्या’ आश्वासक शब्दांनी सचिनदा मरणाच्या दारातून परत आले
हिंदी चित्रपट संगीताच्या इतिहासात ‘नवकेतन’ या देवानंद यांच्या चित्रपट संस्थेचे आणि सचिन देव बर्मन यांचे अतिशय गहिरे नाते होते. नवकेतनच्या सर्व संगीत प्रधान चित्रपटांना सचिनदांच्या संगीताने जान आणली होती. त्यामुळे देव आनंद (Dev Anand) हा कायम सचिन देव बर्मन यांचा ऋणी होता. साठच्या दशकाच्या मध्यावर ज्यावेळी देव आनंद यांनी आपल्या नवकेतन चित्र संस्थेच्या वतीने आर के नारायण यांच्या ‘गाईड’ या साहित्य अकादमी विजेत्या कलाकृतीवर चित्रपट बनवण्याचे ठरवले त्यावेळी त्यांच्यासमोर आलेले पहिले नाव होते सचिन देव बर्मन यांचे.
खरंतर १९६१ सालच्या ‘हम दोनो’ या चित्रपटाला जयदेव यांनी सांगितले होते. हे संगीत देखील नवकेतन यांच्या संगीत परंपरेला साजेसं असं परिपूर्ण संगीत होतं. त्यामुळे यापुढे जयदेव यांना नवकेतनच्या आगामी चित्रपटाला संगीत देता येईल अशी अपेक्षा निर्माण झाली होती. तसे संकेत देखील त्यांना मिळाले होते. एक चित्रपट सचिन देव बर्मन आणि चित्रपट जयदेव असे ठरल्याच्या चर्चा त्या काळात रंगल्या होत्या. यातील खरे खोटे किती हे माहिती नाही, पण असं त्या काळात बोललं जात होतं. त्यामुळे ‘हम दोनो’ नंतरचा ‘तेरे घर के सामने’ हा चित्रपट सचिनदांकडे गेला. त्यानंतर गाईड या चित्रपटाची निर्मिती सुरू झाली.
गाईड चित्रपटाला जयदेव यांची संगीत असेल असे सर्वांना वाटत होते. पण देव आनंद यांनी सचिन देव बर्मन यांच नाव फायनल केले. सचिनदांनी त्याच्या संगीतावर काम देखील सुरू केले. एका गाण्याची धून तयार झाली. परंतु त्याच वेळी सचिन देव बर्मन यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांना रुग्णालयात दाखल व्हावे लागले.

या काळात देव आनंद (Dev Anand) अमेरिकेत होता. जेव्हा त्याला सचिनदाच्या हार्ट अटॅकची बातमी कळली तो ताबडतोब अमेरिकेतून भारतात परतला आणि सचिनदांना भेटायला रुग्णालयात गेला. सचिन देव बर्मन अशा आहे अवस्थेत रुग्णालयात पडून होते, हे पाहून त्याला खूप वाईट वाटले. सचिनदा यांना देखील देव आनंदला पाहून खूप बरे वाटले. दोघांच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या. (Untold story of Dev Anand and S D Burman)
देव आनंदने त्यांना, “दादा, तुम्ही लवकरच बरे व्हाल..” असा विश्वास दिला. त्यावर सचिनदा म्हणाले, “मला माहित नाही, पण एका गोष्टीचं नक्कीच वाईट वाटतंय, ते म्हणजे तुझ्या ‘गाईड’ला मी संगीत देऊ शकणार नाही. तू दुसरा कुठला तरी संगीतकार या चित्रपटासाठी पहा. माझ्याकडून हे काम पूर्ण होईल असे मला वाटत नाही.”
त्यावर देव आनंद (Dev Anand) त्यांना म्हणाले, “दादा तुम्ही असे का म्हणता? तुम्हाला काहीही होणार नाही. मी संगीतकार बदलणार नाही.” सचिनदा खचले होते. पैलतीर त्याना दिसत होता. ते खिन्नपणे म्हणाले, “आणि खरोखरच यातून मी बराच झालो नाही तर?” यावर देव आनंदचे शब्द होते, “… तर सचिनदा मी शब्द देतो तुम्हाला ‘गाईड’ चित्रपटात फक्त एकच गाणे असेल ज्याची धून तुम्ही आत्ता बनवली आहे. हा चित्रपट तुमचा होता, तुमचा आहे आणि तुमचाच राहील. तुम्ही स्वस्थ रहा, लवकर बरे व्हा आणि लवकरच आपण पुन्हा काम सुरू करू.”

देव आनंद यांच्या तोंडातून कदाचित देवच बोलत होता. त्या शब्दांनी जादू केली. सचिनदा लवकरच आजारातून बरे झाले आणि पुन्हा नव्या उत्साहाने कामाला लागले. ‘गाइड’ची उरलेली सगळी गाणी त्यांनी रेकॉर्ड केली. आज पन्नास वर्षाचा कालखंड उलटून गेला असला तरी गाईड चित्रपटातील गाण्यांची गोडी अद्यापही तशीच आहे. (Untold story of Dev Anand and S D Burman)
पिया तोसे नैना लागे रे, क्या से क्या हो गया बेवफा, मोसे छल किये जाय सैया बेईमान, गाता रहे मेरा दिल, आज फिर जीने की तमन्ना है, तेरे मेरे सपने अब एक रंग है, दिन ढल जाये हाय रात ना जाये, वहा कौन है तेरा मुसाफिर जायेगा कहा, अल्ला मेघ दे पानी दे…. ही लता मंगेशकर, मोहम्मद रफी, किशोर कुमार आणि सचिन देव बर्मन यांच्या स्वरातील गाणी आजही रसिक मोठ्या आवडीने ऐकत असतात.
=======
हे देखील वाचा – जेव्हा पाच अभिनेत्रींनी यश चोप्रांच्या चित्रपटात काम करायला नकार दिला..
=======
चित्रपट सुपरहिट ठरला. सचिनदा यांच संगीत प्रचंड गाजलं. ‘गाईड’ चित्रपटाच्या वेळी हार्ट अटॅकने खचलेले सचिनदा देव आनंदच्या त्या आश्वासनाने पुन्हा उभे राहिले आणि पुढची दहा वर्षे त्यांची गाणी आणि संगीत हिंदी सिनेमात गाजत राहिले, वाजत राहिले. ज्वेल थीफ, आराधना, तलाश, तेरे मेरे सपने, अभिमान…. अशी यशाची नवी इनिंग ते खेळले.