चित्रीकरणाच्या वेळी जेव्हा प्रेम चोप्रा यांना कोणीच ओळखले नाही तेव्हा घडलं असं काही…
आज काल माध्यमाची दुनिया खूप विस्तारित झाली आहे. वर्तमानपत्र, मासिके, सोशल मीडिया, टीव्ही वरील चित्रपट वाहिन्या, ओटीटी…. या सर्वांमधून कलावंत ठळकपणे प्रेक्षकांपर्यंत पोहोचत आहेत. पण एकेकाळी मीडिया मर्यादित असल्यामुळे कलाकारांना चटकन ओळखणं कठीण जात होतं. त्याचाच हा किस्सा आहे. (Untold story of First Autograph of Prem Chopra)
१९६७ साली ‘आमने सामने’ या नावाचा एक चित्रपट आला होता. या चित्रपटाचे दिग्दर्शक होते सुरज प्रकाश, तर संगीतकार होते कल्याणजी-आनंदजी. या चित्रपटात शशी कपूर, शर्मिला टागोर, प्रेम चोप्रा यांच्या प्रमुख भूमिका होत्या.
या चित्रपटाचे चित्रीकरण पहेलगाम इथे चालू होते. शशि कपूर आणि शर्मिला टागोर या दोघांचेही अनेक चित्रपट प्रदर्शित झाले असल्यामुळे प्रेक्षक त्यांना चांगलेच ओळखत होते. अनेक सिनेमासिकावर या दोघांची छायाचित्र प्रकाशित होत होती. थोडक्यात हे दोघे लोकप्रिय कलावंत होते. त्यामुळे या दोघांना पाहायला आणि त्यांचे ऑटोग्राफ घ्यायला चित्रीकरणाच्या ठिकाणी लोकांनी मोठी गर्दी केली होती. (Untold story of First Autograph of Prem Chopra)
चित्रीकरणादरम्यान ‘ब्रेक’ झाला की, चाहते आपले ऑटोग्राफ बुक घेऊन यायचे आणि या दोघांच्या सह्या घ्यायचे. हे सर्व प्रेम चोप्रा मोठ्या कुतूहलाने पाहायचे. खरंतर त्यांचेदेखील तोवर आठ चित्रपट रिलीज झाले होते. पण त्यांना कोणीच ओळखत नव्हते. त्यामुळे त्यांचा ऑटोग्राफ घ्यायला कोणीही येत नव्हते. पण त्यांना मनोमन वाटत होते; माझासुद्धा कोणीतरी ऑटोग्राफ घ्यावा. एकदा मात्र नवल घडले.
एका व्यक्तीने शशि कपूर आणि शर्मिलाचा ऑटोग्राफ घेतल्यावर त्याने आपले बुक प्रेम चोप्रा यांच्याकडे दिले. त्यांना प्रचंड आनंद झाला पण लवकरच या आनंदावर विरजण पडले. शशि कपूर यांनी प्रेम चोप्रा यांना चिडवण्यासाठी ऑटोग्राफ बुक आपल्याकडे घेतले आणि त्या व्यक्तीला विचारले “तू आता ज्यांची सही घेत आहेस तो कलाकार कोण आहे तुला माहित आहे का?” (Untold story of First Autograph of Prem Chopra)
त्यावर ती व्यक्ती विचार करून म्हणाली, “हो माहिती आहे नं, हे सुनील दत्त आहेत!”. त्यावर शशी त्या व्यक्तीला म्हणाला “जा बेटा आणखी थोडा अभ्यास करून ये….” थोड्या वेळाने आणखी एक चहाता आला. त्याने शशि कपूर आणि शर्मिला टागोर या दोघांची सही घेतल्यानंतर प्रेम चोप्रा यांच्याकडे बुक दिले. त्याला पुन्हा शशि कपूरने बुक हातात घेऊन विचारलं “तू ज्याचा ऑटोग्राफ घेत आहेस, तो कोण कलाकार आहे ते माहित आहे का?” यावर तो चाहता विचार करून म्हणाला, “हो, ‘मेहमूद!”
शशि कपूर यांनी त्यालाही परत पाठवले. इकडे प्रेम चोप्रा खूपच नाराज झाले. आपल्याला कुणीच ओळखत नाही ही खंत त्यांच्या चेहऱ्यावर दिसू लागली. तितक्यात एक रसिक आला. शशी कपूरने बुक हाती घेईपर्यंत त्याने त्याच्या हातातून बुक घेतले आणि आयुष्यातील पहिला ऑटोग्राफ दिला आणि त्यावर लिहिले “विथ लव्ह फ्रॉम प्रेम चोप्रा…..” (Untold story of First Autograph of Prem Chopra)
===========
हे देखील वाचा – जेव्हा किशोर कुमार यांच्या मागे सलील चौधरी छडी घेवून धावले…
===========
अर्थात नंतर मात्र प्रेम चोप्रा आणि त्यांचा डायलॉग “प्रेम नाम है मेरा… प्रेम चोप्रा” प्रचंड लोकप्रिय झाला आणि आता तर त्यांना संपूर्ण भारतात एक उत्तम खलनायक म्हणून ओळखतात.