ऋतुजा बागवेला मिळाला मानाचा उस्ताद बिस्मिल्लाह खाँ युवा पुरस्कार
‘या’ कारणासाठी किरण रावने आमिर खानला चक्क तीन आठवडे ठेवले कोंडून
बॉलीवूडमध्ये आमिर खान यांची ओळख मिस्टर परफेक्शनिस्ट अशी आहे. मोजकेच चित्रपट करून आमिर खान यांनी आपली स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. व्यावसायिक चित्रपट करताना त्यांनी ‘पिपली लाईव्ह’ सारखा कलात्मक चित्रपट देखील बनवला. व्यावसायिक चित्रपटातूनही चांगल्या पध्दतीने सामाजिक संदेश देता येतो हे देखील त्यांनी त्यांच्या अनेक चित्रपटातून दाखवून दिले आहे. (Untold story of Kiran Rao and Aamir Khan)
२०११ साली आमिर खान यांनी ‘धोबी घाट’ हा वेगळ्या जॉनरचा चित्रपट निर्माण केला होता. हा चित्रपट त्यांच्या पत्नी किरण राव यांनी दिग्दर्शित केला होता. किरण राव यांनी दिग्दर्शित केलेला हा पहिलाच चित्रपट होता. या चित्रपटाने समीक्षकांचे चांगलेच लक्ष वेधून घेतले. या चित्रपटाचे वैशिष्ट्य म्हणजे याचे चित्रीकरण कुठेही स्टुडिओत न होता थेट लोकेशनवर जाऊन केले होते. (Untold story of Kiran Rao and Aamir Khan)
मुंबईमध्ये महालक्ष्मी जवळचा धोबीघाट, वरळी, चौपाटी, मोहम्मद अली रोड या भागात या चित्रपटाचे शूटिंग झाले. या सिनेमासाठी कोणतेही सेट्स उभारले नाहीत. मध्यांतर न घेता सलग १०० मिनिटांचा हा चित्रपट चित्रपटगृहात दाखवला गेला. असा पॅटर्न असलेला हा भारतातील पहिलाच चित्रपट होता. किरण राव यांनी हा चित्रपट ‘guerilla’ टेक्निकने बनवला. ज्यात मर्यादित साधनांचा वापर करीत वास्तव चित्रीकरण थेट लोकेशन्सवर जाऊन केले जाते. यातील मॉब सीन्स कुणाला डिस्टर्ब न करता (किंवा कल्पना न देता) थेट चित्रित केले जातात.
या सिनेमाला संगीत दिले होते ॲकॅडमी ॲवॉर्ड विनर Gustavo Santaolalla यांनी. तसेच या सिनेमात बेगम अख्तर यांनी तिलक कमोद रागात गायलेली ‘अब के सावन घर आजा’ ही ठुमरी आणि ‘मधुमती’ चित्रपटातील ‘दिल तडप तडप के कह रहा है…’ ही गाणी सिनेमाच्या बॅक ड्रॉपला घेतली होती. (Untold story of Kiran Rao and Aamir Khan)
२६/११ च्या बॉम्बस्फोटाने या सिनेमाच्या चित्रीकरणाला खिळ बसली. किरण राव यांना रेल्वे स्टेशनवर चित्रीकरणाला बंदी घातली. हा चित्रपट इंग्रजी आणि हिंदी या दोन भाषांत बनला. यात प्रतिक बब्बर, मोनिका डोग्रा, क्रीती मल्होत्रा, आमिर खान आणि किटू गिडवानी यांच्या प्रमुख भूमिका होत्या. दिग्दर्शक किरण राव यांच्या मते ‘मुंबई’ हेच या सिनेमाचे प्रमुख पात्र होते. कलात्मक चित्रपट असूनही या सिनेमाने बऱ्यापैकी व्यावसायिक यश मिळविले. (Untold story of Kiran Rao and Aamir Khan)
‘धोबी घाट’ चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यानचा एक किस्सा मोठा रंजक आहे. हा किस्सा आमिर खान यांच्या ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ या विशेषणाला आणखी बळकटी देणारा आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण मोहम्मद अली रोड परिसरात होणार होते. हा रस्ता अत्यंत गजबजाट असलेला गर्दीचा असतो. तिथे आमिर खान सारख्या बड्या स्टारला येऊन चित्रीकरण करणे मोठे जिकिरीचे झाले असते. त्यामुळे या चित्रपटाच्या दिग्दर्शिका आणि आमिर खान यांच्या पत्नी किरण राव यांनी एक आयडिया केली.
किरण राव पहाटे तीन वाजता आमिर खानसह इथल्या वस्तीत आल्या. या वस्तीतील एका छोट्या फ्लॅटमध्ये आमिरसोबत गेल्या आणि “पुढचे तीन आठवडे तुम्हाला याच खोलीमध्ये राहायचे आहे”, असे सांगितले. आमिर सारख्या प्रोफेशनल कलाकाराने दिग्दर्शकाचा निर्णय तंतोतंत पाळला. पुढचे तीन आठवडे त्या छोट्याशा खोलीमध्ये राहिला आणि इथेच त्याच्यावरील चित्रीकरण पूर्ण झाले. (Untold story of Kiran Rao and Aamir Khan)
या चित्रीकरणाच्या दरम्यानच आमिर खान यांच्या ‘थ्री इडियट्स’ या चित्रपटाच्या मीटिंग देखील चालू होत्या. त्यामुळे दिग्दर्शक विधू विनोद चोप्रा आमिर खानला भेटण्यासाठी त्या छोट्याशा खोलीत येत. या फ्लॅटमध्ये चित्रीकरणाची इतर साहित्य , कॅमेरे वगैरे या सामानाची गर्दी असल्यामुळे विधू विनोद चोप्राला एकदा तर आमिर खान सोबत चक्क त्या फ्लॅटमधील बाथरूम मध्ये बसून मीटिंग घ्यावी लागली होती.
=========
हे देखील वाचा- परपुरुषाचा स्पर्श नको म्हणून ‘या’ अभिनेत्रीने नाकारली चक्क नायिकेची भूमिका…
=========
या चित्रपटात आमिर खानला सुरुवातीला घेतले नव्हते पण आमिर खानने त्यातील एक व्यक्तिरेखा साकारण्यासाठी किरण रावला विनंती केली. किरण रावने त्याची प्रॉपर स्क्रीन टेस्ट घेतली. ही स्क्रीन टेस्ट पास झाल्यानंतरच त्याला या चित्रपटातील भूमिक मिळाली. ‘गजनी’ या चित्रपटाच्या सेटवरही आमिर खानची स्क्रीन टेस्ट झाली होती. आमिरला उगाच मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणत नाहीत.