
जेव्हा गीतकार शैलेंद्र यांची प्रतिभा रुसते!
कलावंताची प्रतिमा कधी रुसेल याचा काही नेम नसतो! बऱ्याच कलाकारांची प्रतिभा ऐन मोक्याच्या वेळेला धोका देते. कित्येक वेळा हे कलाकार अगदी ब्लॅन्क होऊन जातात. याची अनेक उदाहरणे कलाक्षेत्रात नेहमी चर्चिले जातात. यातून अनेक गमतीजमती देखील घडतात.
रुसलेली प्रतिभा पुन्हा कधी चटकन जागृत होते हे त्या कलाकाराला देखील कळत नाही. गीतकार शैलेंद्र यांच्या एका गाजलेल्या गीता बाबतीतला हा किस्सा असाच आहे. त्यावेळी म्हणजे १९५८ साली दिग्दर्शक बिमल रॉय ‘मधुमती’ हा महत्त्वाकांक्षी चित्रपट बनवत होते. पुनर्जन्मावर आधारित या चित्रपटात दिलीपकुमार आणि वैजयंतीमाला यांच्या प्रमुख भूमिका होत्या.
संगीतकार सलिल चौधरी यांचा सर्वात गाजलेला चित्रपट म्हणून ‘मधुमती’चा उल्लेख केला जातो. आजा रे परदेसी मै तो कबसे खडी, घडी घडी मेरा दिल धडके, टूटे हुए ख्वाबो ने हमको ये सिखाया है,जुल्मी संग आंख लडी, दैय्या रे दैय्या रे चढ गयो पापी बिचुवा, ही अप्रतिम गाणी या चित्रपटात होती. या चित्रपटात विनोदी कलाकार जॉनी वॉकर याची देखील महत्त्वाची भूमिका होती.
पन्नास दशकांमध्ये जॉनी वॉकर सिनेमात असणे म्हणजे सिनेमा यशस्वी होण्याची खात्री असायची. जॉनी वॉकरला चित्रपटात एखादं तरी गाणे नक्कीच असायचं. त्यामुळे बिमल रॉय यांनी ‘मधुमती’ या चित्रपटात जॉनी वॉकरसाठी एका गाण्याची सिच्युएशन निर्माण केली. त्यानंतर त्यांनी गीतकार शैलेंद्र ,संगीतकार सलील चौधरी यांना बोलावून या गाण्याबाबत सांगितले.
हे गाणं जॉनी वॉकर यांच्यावर चित्रित असल्यामुळे सहाजिकच थोडसं विनोदी ढंगाचे आणि त्याच्या स्टाईलचे असावे असं ठरलं. हे गाणं जॉनी वॉकर चित्रपटात मद्यप्राशन करून म्हणतो. त्यामुळे गाण्याचा जॉनर कसा असावा, हे ही ठरलं. सलिल चौधरी यांनी धून तयार केली. ती शैलेंद्रला ऐकवली. आता फक्त शैलेंद्र यांना त्याला साजेसे शब्द त्यात घालायचे होते. शैलेंद्र यांना ताबडतोब तिथल्या तिथे गाण्याची पहिली ओळ सुचली. ‘जंगल मे मोर नाचा किसी ने न देखा…’ सर्वाना ती ओपनिंग लाईन खूपच आवडली.
पहिली लाईन तर सुचली पण त्याला साजेशी दुसरी लाईन काही केला सुचेना. सर्वांच्या गप्पांमधून अनेक शब्द अनेक ओळी येत होत्या. काही शब्द बरे होते, पण मीटरमध्ये बसत नव्हते. शैलेंद्र यांना काही केल्या सुचेना. त्यांची प्रतिभा जणू रुसून बसली होती. चहा कॉफीची अनेक आवर्तने झाली. गप्पांच्या अनेक मैफिली झाल्या, पण गाणं काही पुढे सरकेना. शेवटी बिमल दा आणि सलील चौधरी कंटाळून निघून गेले.
शैलेंद्र मात्र आता जाम वैतागले. एका बैठकीत मोठी मोठी गाणी लिहिणारे गीतकार शैलेंद्र आज मात्र काही केल्या एका ओळीने पुढे सरकतच नव्हते. वैतागून त्यांनी ड्रायव्हरला त्यांचा आवडीचा ब्रँड आणायला सांगितलं. कदाचित मद्याचे काही घोट गेल्यानंतर गाणं सुचेल, असं त्यांना वाटलं. पण व्यर्थ! हा उपाय देखील कामी आला नाही.
भरपूर मद्यप्राशन झाल्यानंतर ते गाडीत जाऊन बसले आणि ड्रायव्हरला गाडी घरी घेऊन जायला सांगितलं. डोक्यात सतत गाण्याचाच विचार होता. बंगल्यापाशी नोकराने अदबीने पुढे येऊन गाडीचे दार उघडले. शैलेन्द्रच्या डोक्यात दारूचा अंमल होताच शिवाय डोक्यात गाण्याचा गुंता देखील चालू होता. अडखळत अडखळत ते घराकडे चालू लागले आणि पडले. पुन्हा सावरले, उठून उभे राहिले, पुन्हा पडले! शेवटी नोकर त्यांना आधार देऊन घरात घेवून गेला. पण या दरम्यान एक महत्वाची घटना घडली.
खारला शैलेंद्र यांच्या घराशेजारी संगीतकार हेमंत कुमार यांचा ‘गीतांजली’ हा बंगला होता. हेमंत कुमार यांच्या बंगल्यात त्यावेळी त्यांच्या पाच-सहा तरुण मेव्हण्या तिथे राहत होत्या. त्या कायम बंगल्याच्या आवारात नाचत खेळत बागडत असायच्या. त्यांनी शैलेंद्रला ‘पडताना’ पाहिले आणि त्या फिदीफिदी हसल्या.
शैलेंद्रला त्या चांगल्या ओळखत होत्या. परंतु, शैलेंद्रच्या दारू पिऊन पडल्यामुळे त्या हसल्या. कवी मनाच्या शैलेंद्रने ते ‘हसणं’ पाहिलं. तसेच घरात गेले आणि काय आश्चर्य! त्यांची रुसलेली प्रतिमा पुन्हा जागी झाली. नुकत्याच घडलेल्या प्रसंगातून त्यांना गाण्याची पुढची ओळ मिळाली “जंगल में मोर नाचा किसी ने ना देखा, हम जो थोडी सी पी के जरा झुमे, हाय रे सबने देखा….” पुढचे अंतरे त्यानी काही क्षणात लिहून काढले. ज्या ओळीसाठी ते दिवसभर जंग जंग पछाडत होते, ती एका छोट्याशा घटनेने लगेच मिळाली.
हे ही वाचा: पंचमच्या ‘पार्श्वगायना’चे अज्ञात पैलू
टीकाकार परवडले, ट्रोल धाड नकोत….
दुसऱ्या दिवशी परत सगळेजण नटराज स्टुडीओत जमले. शैलेन्द्रनी हे पूर्ण झालेले गीत वाचून दाखवलं. सगळ्यांनाच ते आवडल्यामुळे सर्वांनी टाळ्या वाजवून या गीताची पसंती दर्शवली. हे गाणं रफीच्या स्वरात रेकॉर्ड झालं. रफी जॉनी करता खास त्याच्या व्यक्तीमत्वाला साजेसा स्वर वापरत असे. हे गाणं तुफान हिट झालं. चित्रपटात तर जॉनीने धमाल केली. जॉनीला या चित्रपटासाठी फिल्मफेयर अवॉर्ड मिळाले. ‘मधुमती’ या चित्रपटाला फिल्मफेयरची बारा नामांकने आणि नऊ पुरस्कार मिळाले, हा विक्रम आहे. शैलेंद्रलाही त्यावर्षी फिल्मफेयर अवॉर्ड मिळाले, पण ‘यहुदी’ या चित्रपटासाठी!