‘तु मला सगळं काही दिलंस..!’ विशाखा सुभेदाराची ‘ती’ पोस्ट व्हायरल
जेव्हा अकरा वर्षानंतर यश जोहर यांनी अभिनेता प्राण यांचे मानधन दिले तेव्हा ते म्हणाले…
हिंदी सिनेमाच्या सुवर्णकाळातील अत्यंत प्रतिभावान आणि दादासाहेब फाळके पुरस्कार विजेते कलावंत प्राण यांच्या पडद्यावरील आणि पडद्यामागील कर्तृत्वाची कायम चर्चा होता असते. प्राण यांनी त्यांच्या कारकिर्दीत सुरुवातीची अनेक वर्ष रुपेरी पडद्यावर खलनायक रंगवला. त्यांनी पडद्यावर साकारलेला खलनायक इतका भीतीदायक असायचा की, त्याची अदाकारी पाहून त्याला मारण्यासाठी प्रेक्षकांच्या मुठी वळवळायच्या! प्राण यांच्या अभिनयाला मिळालेली पसंतीची पावती होती. (Untold story of Pran & Yash Johar)
वैयक्तिक आयुष्यामध्ये मात्र प्राण सर्वांना कायम उपयोग पडत. ऋषिकेश मुखर्जी यांच्या ‘गुड्डी’ या चित्रपटात एका प्रसंगात तसे दाखवले देखील आहे. प्राण कायम जुनिअर आर्टिस्टच्या पाठीशी ठामपणे उभे असायचे. नवीन कलावंतांना कायम प्रोत्साहन द्यायचे. पडद्यावर रंगवल्या जाणाऱ्या व्यक्तिरेखेच्या अगदी विरुद्ध असं त्यांचं प्रत्यक्ष आयुष्यातील व्यक्तिमत्व होतं. आजच्या युवा पिढीचे लाडके करण जोहरचे वडील यश जोहर यांच्याबाबतचा एक किस्सा अभिनेता प्राण यांचे मोठेपण अधोरेखित करणार आहे.
निर्माता यश जोहर हे जुन्या काळातील कॉमेडियन आय एस जोहर यांचे धाकटे बंधू. साठच्या दशकामध्ये ते चित्रपटसृष्टीत आले. सुरुवातीला काही वर्ष सुनील दत्त यांच्यासोबत प्रोडक्शनमध्ये काम केल्यानंतर ‘नवकेतन पिक्चर्स’ मध्ये प्रोडक्शन सांभाळू लागले. गाईड, ज्वेल थीफ,प्रेम पुजारी, तेरे मेरे सपने, हरे रामा हरे कृष्णा या चित्रपटाच्या वेळी ते देव आनंद यांच्या सोबत होते.
१९७६ साली त्यांनी ‘धर्मा प्रोडक्शन’ या स्वतःच्या बॅनरची स्थापना केली. या संस्थेचा पहिला चित्रपट होता, अमिताभ बच्चन आणि शत्रुघन सिन्हा यांचा ‘दोस्ताना’. राज खोसला दिग्दर्शित या चित्रपटाला चांगले यश मिळाले होते. यानंतर १९८३ साली यश जोहर यांनी ‘दुनिया’ या चित्रपटाची निर्मिती केली. रमेश तलवार दिग्दर्शित या सिनेमात दिलीप कुमार, अशोक कुमार, ऋषी कपूर,अमृता सिंग, सायरा बानो अशी मोठी ‘स्टारकास्ट’ असून देखील या सिनेमाला अपयशाचा सामना करावा लागला.
त्यानंतर १९८७ साली त्यांनी ‘मुकद्दर का फैसला’ या चित्रपटाची निर्मिती सुरू केली. या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रकाश मेहरा यांच्याकडे दिले. या सिनेमात राजकुमार, राखी, राज बब्बर, मीनाक्षी अशी मेगा स्टार कास्ट होती. या सर्वांचे मानधन देखील भरपूर होते. या सिनेमात अभिनेता प्राण यांनी एक भूमिका करावी असे जोहर यांना वाटत होते. सर्व कलाकारांचे मानधन देता देता यश जोहर यांच्याकडील पैसे संपत आले होते; तरी या चित्रपटात अभिनेता प्राण यांनी ती भूमिका करावी असे त्यांना कायम वाटत होते.
एक दिवस धाडस करून ते प्राण यांच्या घरी गेले. त्यांना सिनेमाचे कथानक ऐकवले आणि चित्रपटात काम करण्याची विनंती केली. त्याचवेळी त्यांनी सांगितले ,”माझ्याकडे सध्या आपल्याला द्यायला पैसे नाहीत, पण ही भूमिका आपण करा. मी नंतर आपले पैसे नक्की देईन.”
यश जोहर यांच्या डोळ्यातील तळमळ, प्रामाणिकपणा पाहून प्राण यांनी त्यांच्या पाठीवर थाप देऊन सांगितले ,”तुम्ही चित्रीकरण सुरू करा. माझ्या पैशाची काळजी करू नका. तुमच्याकडे ज्यावेळेला पैसे येतील त्यावेळेला तुम्ही मला पैसे द्या.” प्राण यांचे आश्वासक शब्द ऐकून यश जोहर यांना हुरूप आला आणि त्यांनी चित्रपटाचे काम सुरू केले. (Untold story of Pran & Yash Johar)
चित्रपट तयार झाला. प्रदर्शित झाला. पण दुर्दैवाने सुपर फ्लॉप झाला. होते नव्हते ते सर्व पैसे संपून गेले. प्राण यांना एकही पैसा देता आला नाही. त्यावेळी प्राण एका सिनेमाचे वीस लाख रुपये घेत असंत. प्राण साहेबांचे पैसे द्यायचे राहिले आहेत ही चुटपुट जोहर यांना लागून राहिली होती.
त्यानंतर यश जोहर यांनी अमिताभ बच्चन, मिथुन चक्रवर्ती,रोहिणी हट्टंगडी, माधवी, डॅनी यांना घेऊन ‘अग्निपथ’ या चित्रपटाची निर्मिती केली. या सिनेमाचे दिग्दर्शन मुकुंद आनंद यांनी केले होते. यात एक वेगळा प्रयोग करण्यात आला होता. अमिताभ बच्चन यांनी या सिनेमात आपला नेहमीच आवाज बदलून वेगळ्या आवाजात ‘डायलॉग डिलिव्हरी’ केली होती. (मार्लिन ब्रांडो यांनी ‘गॉडफादर’ या सिनेमात असा प्रकार केला होता) पण भारतीय प्रेक्षकांना हा प्रकार काही फारसा रुचला नाही. वेगळे कथानक असून देखील ‘अग्नीपथ’ या सिनेमाला माफक यश मिळाले. (Untold story of Pran & Yash Johar)
पुढे १९९३ साली श्रीदेवी, संजय दत्त, अनुपम खेर यांना घेऊन ‘गुमराह’ या चित्रपटाची निर्मिती केली. महेश भट या चित्रपटाचे दिग्दर्शक होते. पण हा चित्रपटही आपटला. पुढे १९९६ साली शाहरुख खानला घेऊन ‘डुप्लिकेट’ हा चित्रपट बनवला. पुन्हा दिग्दर्शक महेश भट. मनोरंजनाने ठासून भरलेल्या या चित्रपटाकडेही प्रेक्षकांनी पाठ फिरवाली. अपयश काही त्यांची पाठ सोडत नव्हते. १९८० साली आलेल्या ‘दोस्ताना’ या चित्रपटानंतर यश जोहर यांच्या कुठल्या चित्रपटाला ‘यश’ मिळाले नव्हते.
यानंतर यश जोहर यांचे चिरंजीव करण जोहर यांनी १९९८ साली ‘कुछ कुछ होता है’ हा चित्रपट दिग्दर्शित केला आणि चमत्कार घडला. या सिनेमाला अफाट यश मिळाले. मागच्या अपयशाचा सगळा ‘बॅकलॉग’ या चित्रपटाच्या यशाने भरून काढला. त्यावेळी यश जोहर यांना आपल्याला प्राण साहेबांचे वीस लाख रुपये द्यायचे आहेत याची आठवण झाली. त्यानंतर एक दिवस ते वीस लाख रुपयाचा चेक घेऊन प्राण साहेबांकडे गेले. (Untold story of Pran & Yash Johar)
==============
हे ही वाचा: असं काय घडलं की, न्यूरोसर्जन व्हायचं स्वप्न बघणारे डॉ. अमोल कोल्हे कलाक्षेत्राकडे वळले..
‘तो’ चित्रपट सुरेश वाडकर यांच्या आयुष्यामधली खूप मोठी चूक होती
===============
सुरुवातीला त्यांनी अकरा वर्ष मी तुमचे पैसे देऊ शकलो नाही याबद्दल त्यांनी प्राण साहेबांची माफी मागितली आणि मोठ्या विनयशीलतेने तो चेक प्राण यांना सुपूर्त केला. जोहर यांच्या डोळ्यात पाणी होते. प्राण यांनी यश जोहर यांना जवळ घेतले आणि समजावून सांगितले, “पैसे आयुष्यात महत्त्वाचे जरी असले तरी सर्वस्व नसतात. नाती महत्वाची असतात. आज तुमच्या मुलाने जे यश मिळवले आहे यात तुमचे देखील समर्पण आहे.” यश जोहर यांना प्राण यांच्या स्वभावातील माणुसकीचे दर्शन पुन्हा एकदा घडले. ते एका मुलाखतीत म्हणाले होते, “अकरा वर्षांत प्राण यांनी एकदाही मला पैशाची आठवण करून दिली नाही. पण मी मात्र प्रत्येक रात्री आपण प्राण यांचे कर्जदार आहे असंच मनाला सांगत होतो.”