रेहाना (Rehana) – एका अजरामर गीताच्या मेकिंगची हळवी आठवण
हिंदी चित्रपटाच्या ‘गोल्डन एरा’ मधील गाणी आज साठ-सत्तर वर्षे झाली. तरी तितकीच गोड तितकीच मनाला भिडणारी असतात. ही गाणी तुम्हाला स्मृतीगंधाचा आनंद देतात. याच नॉस्टॅल्जिक काळातील गाण्याच्या मेकिंगच्या कथा देखील तितक्याच भन्नाट आणि मनोरंजक असतात.
आज अशाच एका अतिशय अप्रतिम गीताच्या मेकिंगची कथा पाहूया. पन्नास दशकांमध्ये अभिनेत्री रेहाना (Rehana) आज पूर्णत: विस्मृतीत गेली असली तरी आजच्या भाषेत सांगायचं, तर ती ‘हॉट केक’ होती. लख्ख गोरा वर्ण आणि टंच फिगरने अतिशय ‘सेक्सी’ असा तिचा लूक होता. त्यामुळे तिच्या चित्रपटांना मोठे यश मिळत असे. त्यामुळेच अनेक निर्माते तिच्या मागे असत. तिच्या देखणेपणामुळेच तिच्यावर जान कुर्बान करणारे देखील असंख्य होते. त्यातील एक म्हणजे प्यारेलाल संतोषी अर्थात दिग्दर्शक पी एल संतोषी!
‘शिनशिना की बबला बू’ या विचित्र नावाचा हा चित्रपट १९५२ साली प्रदर्शित झाला होता. या सिनेमाचे दिग्दर्शन आणि गीतलेखन पी एल संतोषी यांनी केले होते. या चित्रपटाला सी रामचंद्र तथा अण्णा यांचे संगीत होते. त्या काळात पी एल संतोषी रेहाना करिता अक्षरशः पागल झाले होते. अर्थात त्याचे हे प्रेम एकतर्फी होते.
असे सांगतात, एकदा रेहानाला भेटण्यासाठी पी एल संतोषी रात्री तिच्या घरी गेला होता, पण रेहानाने दार उघडलेच नाही. रात्रभर हा बिचारा तिच्या दारात अश्रू गाळत बसून होता. यातूनच पुढे एक अविस्मरणीय गीत जन्माला आले. गाण्याचे बोल होते, “तुम क्या जानो तुम्हारी याद मे हम कितना रोये रैन गुजारी तारे गिन गिन चैनन से जब तुम सोये….”
पुढे हेच गीत ‘शिनशिना की बबला बू’ या चित्रपटासाठी घेण्यात आले. हे गाणे लता मंगेशकर यांनी अतिशय आर्त आणि मधाळ स्वरात गायले. आज देखील लताच्या टॉप टेन गाण्यात रसिक या गाण्याला पसंती देतात.
गाण्याचे चित्रीकरण होण्यापूर्वी हे गाणे अभिनेत्री रेहाना (Rehana) हिला पी एल संतोषी यांनी ऐकवले. हे गाणे ऐकून ती प्रचंड आनंदीत झाली. खरंतर गाण्यातील भावना तिच्याकरीताच होत्या, हे तिच्या खिजगणतीतही नव्हते. पण एक सुंदर गाणे आपल्यावर चित्रित होणार आहे, या भावनेने ती प्रचंड खूष झाली.
संगीतकार सी रामचंद्र यांचा हात हातात घेवून ती म्हणाली “मी तुमच्या या गाण्यावर इतकी खूष झाली आहे की, आज तुम्ही जी गोष्ट मागाल ती द्यायला मी तयार आहे.” सी रामचंद्र यांच्या शेजारीच गीतकार पी एल संतोषी उभे होते. रेहानाचे हे उद्गार त्यांच्या काळजात आरपार घुसले. अण्णा रेहानाकडून काय मागतात, याची चिंता त्यांना लागून राहिली. सी रामचंद्र देखील तरुण होते, हँडसम होते.
रेहाना त्यांच्यावर फिदा आहे की काय, संतोषी यांच्या मनात वेगवेगळे विचार येऊ लागले आणि त्यांना अधिक दुःख होऊ लागले. सी रामचंद्र डोळा मिचकावीत रेहानाला “मला तुझ्याकडून काय हवे हे मी उद्या सांगतो” म्हणाले. ते नेमकी कोणती मागणी तिच्या कडे करतात या काळजीत बिच्चारा प्यारेलाल संतोषी रात्रभर तळमळत राहिला. झोपलाच नाही.
=====
हे देखील वाचा: अमिताभ बच्चन -अमजद खान यांच्या मैत्रीची ‘अधुरी एक कहाणी’
=====
सकाळी उठून लवकर सेटवर गेल्यानंतर रेहाना आली व सी रामचंद्र यांच्याकडे गेली आणि ओठाचा चंबू करीत लाडिक स्वरात म्हणाली “तुम्हाला काय हवे आहे, मी काय देवू?” आता संतोषी याचे प्राण कंठाशी आले होते.
सी रामचंद्र संतोषी यांचे मित्रच होते. त्यांना आपल्या मित्राच्या रेहाना (Rehana) बाबतच्या भावना माहिती होत्या. त्यांनी रेहानाच्या मागणीला उत्तर देत, “मला काही नको मला तुला फक्त एक टपली मारायची आहे आहे.” असे सांगितले आणि पी एल संतोषी यांचा जीव भांड्यात पडला.
रसिक मित्रांनो, या अशा सदाबहार आठवणींनी भारतीय चित्रपट संगीत आणखी रंगतदार झाले आहे. आता ऐकूयात हेच गाणे ‘तुम क्या जानू तुम्हारी याद मे हम कितना रोये…’
जाता जाता एक सांगायला हवं. रेहाना (Rehana) या अभिनेत्रीला पुढे सिनेमात फारसं यश मिळालं नाही. १९५६ साली ती पाकिस्तानात निघून गेली. तिकडे तिने दोन तीन घरोबे केले, पण तिथेही तिला अभिनेत्री म्हणून फारसं यश मिळालं नाही. २०१३ साली तिचे पाकिस्तानात निधन झाले.