दिग्दर्शक सुभाष घई आणि गीतकार आनंद बक्षी यांचे जबरदस्त ट्युनिंग!
‘या’ सिनेमाचा फक्त क्लायमॅक्स शोमन सुभाष घई यांनी का केला शूट?
माणूस किती जरी मोठा झाला, किती जरी उंचीवर पोहोचला तरी त्याने पायरीचा दगड विसरू नये असं म्हणतात. कारण याच ‘स्टेपिंग स्टोन’वरून त्याचा उंचीचा प्रवास सुरू झालेला असतो. समाजात आणि सिनेमाच्या दुनियेत दोन्ही प्रकारची माणसं तुम्हाला पाहायला मिळतील. काहीकडे कृतज्ञतेची भावना असते तर, काही जण कमालीचे कृतघ्नदेखील असतात. दिग्दर्शक सुभाष घई यांनी मात्र आपल्या संघर्षाच्या काळात साथ दिलेल्या मित्र मंडळींना कधीच विसरले नाहीत. त्यांच्याबाबत ते कायमच कृतज्ञ राहिले. त्याचाच हा किस्सा! (Subhash Ghai and N N Sippy)
सुभाष घई हिंदी सिनेमाच्या दुनियेत साठच्या दशकाच्या उत्तरार्धात आले. एफ टी आय पुण्यातून त्यांनी आपला अभ्यासक्रम पूर्ण केला. राजेश खन्नाच्या ‘आराधना’ चित्रपटात त्यांना एक छोटी भूमिका मिळाली होती. पुढे काही चित्रपटातून ते नायक (उमंग , गुमराह) म्हणून देखील सिनेमात आले, पण यशस्वी होऊ शकले नाहीत. नंतर त्यांनी कथा लेखन सुरू केले. अनेक निर्मात्यांना ते आपल्या कथा ऐकवू लागले.
एकदा एन एन सिप्पी यांना त्यांनी एक कथा ऐकवली. सिप्पी यांना कथा खूपच आवडली आणि त्यांनी त्या कथेवर चित्रपट बनवायचे ठरवले. त्यावेळी सुभाष घई यांनी घाबरत घाबरतच सिप्पीना या चित्रपटाचे दिग्दर्शन करायची परवानगी मागितली. सिप्पी यांनी सुभाष घई यांना हा चित्रपट दिग्दर्शित करण्याची परवानगी दिली. सुभाष घई यांच्या आयुष्याला नवी दिशा देणारी ही घटना होती. हा चित्रपट होता १९७६ साली प्रदर्शित झालेला ‘कालीचरण’.
सिनेमा बम्पर हिट ठरला. या चित्रपटातील शत्रुघ्न सिन्हा, रीना रॉय, प्रेमनाथ, अजित यांच्यासोबतच नाव झाले सुभाष घई यांचे. यातील LION आणि NO17 हा अफलातून प्रकार प्रेक्षकांना सर्वस्वी नवीन होता. देशभर सिनेमा प्रचंड हिट झाला. आता सुभाष घई यांच्याकडे प्रेक्षक आणि चित्रपटसृष्टी आशेने बघू लागली. त्यानंतर विश्वनाथ, गौतम गोविंदा, कर्ज, हिरो, विधाता, मेरी जंग अशा हिट चित्रपटांची मालिकाच सुभाष घई यांनी दिली. नव्वदच्या दशकात तर त्यांना ‘शोमन’ ही उपाधी मिळाली. (Subhash Ghai and N N Sippy)
ऐंशीच्या दशकाच्या अखेरीस एन एन सिप्पी यांचे चिरंजीव प्रवेश सिप्पी यांनी एक चित्रपट बनवायला सुरुवात केली होती. या सिनेमाचे नाव होते, ‘आग से खेलेंगे’. जितेंद्र, अनिल कपूर, मीनाक्षी शेषाद्री, किमी काटकर यांच्या या चित्रपटात प्रमुख भूमिका होत्या. या चित्रपटाचे दिग्दर्शन भास्कर शेट्टी यांना देण्यात आले होते. हा सिनेमा निर्मिती अवस्थेत जास्त काळ राहिला.
या चित्रपटाच्या दरम्यान अनिल कपूरचे ‘तेजाब’ आणि ‘राम लखन’ हे चित्रपट प्रदर्शित झाले आणि सुपरहिट ठरले. त्याचा भाव वधारला. त्यामुळे साहजिकच त्याचे ‘आग से खेलेंगे’ या चित्रपटाकडे दुर्लक्ष झाले. चित्रपटाच्या शूटिंगला यायचे तो टाळू लागला. याचे आणखी एक कारण होते. ते म्हणजे या चित्रपटात मुख्य भूमिकेत जितेंद्र होते, तर अनिल कपूर यांना सहनायकाची भूमिका ऑफर झाली होती. आता मार्केटमध्ये अनिल कपूरचा भाव वधारला होता. त्याला अशी सेकंड लीडची भूमिका नको वाटत होती. या चित्रपटाचा क्लायमॅक्स शूट होणे बाकी होते. याच काळात आणखी एक घटना घडली. या चित्रपटाचे दिग्दर्शक भास्कर शेट्टी यांचे दुर्दैवाने अपघाती निधन झाले झाले. (Subhash Ghai and N N Sippy)
अनिल कपूरचे चित्रपटाकडे होणारे दुर्लक्ष आणि दिग्दर्शकाचा मृत्यू यामुळे सिप्पी चांगलेच अडचणीत आले. सिनेमात खूप पैसा अडकला होता आणि सिनेमा अर्धवट राहतो की काय ही काळजी त्यांना वाटू लागली. त्यावेळी त्यांना आठवण झाली सुभाष घई यांची. त्यांनी सुभाष घई यांना फोन करून आपली अडचण सांगितली.
सुभाष घई यांना दिग्दर्शक म्हणून पहिला ब्रेक देणारे सिप्पी स्वतःहून फोन करून अडचण सांगतात हे पाहून घई यांनी त्यांना सर्वतोपरी मदत करण्याचे ठरवले. त्यांनी अनिल कपूर यांची ‘समजूत’ काढली. त्याला शूटिंगसाठी तयार केले. चित्रपटाची उरलेले शूट तसेच क्लायमॅक्स सुभाष घई यांनी शूट केला. दुसऱ्याचा अर्धवट सिनेमा शूट करायला ते खरंतर अजिबात बांधील नव्हते, पण त्यांनी एन एन सिप्पी यांनी करिअरच्या सुरुवातीला आपल्यावर केलेल्या उपकाराची जाणीव ठेवली. (Subhash Ghai and N N Sippy)
=======
हे देखील वाचा – ‘या’ कारणासाठी बॉलिवूडच्या यशस्वी दिग्दर्शकाने गोळ्या झाडून कुटुंबाला आणि स्वतःला देखील संपवलं….
=======
सिनेमा पूर्ण झाला आणि १५ सप्टेंबर १९८९ या दिवशी रिलीज झाला. सिनेमा राखडल्यामुळे त्याला अपेक्षित यश मिळू शकले नाही. पण सिप्प्पी यांच्यावर आलेले आर्थिक संकट काही प्रमाणात नक्की कमी झाले ते केवळ सुभाष घई यांच्या मुळेच. अशाप्रकारे सुभाष घई यांनी आपल्यावर केलेल्या उपकरांची जाणीव ठेवली. (Subhash Ghai and N N Sippy)