किशोर कुमारच्या ‘या’ गाण्यातील अश्लील ओळींमुळे बप्पी दाच्या डोक्याला झाला ताप
सिनेमा तयार होण्याच्या प्रक्रियेत कधीकधी गमतीशीर गोष्टी घडत असतात. ऐन वेळेला काही बदल करावे लागतात. ते बदल करताना जुन्या गोष्टींमध्ये फार बदल न बदल करावे लागतात. एकदा असाच प्रसंग संगीतकार बप्पी लहरी यांच्या वाट्याला आला होता.
१९८५ साली दिग्दर्शक के बापय्या यांनी ‘आज का दौर’ नावाच्या एका सिनेमाची निर्मिती केली. मूलतः हा सिनेमा एका दाक्षिणात्य सिनेमाचा रिमेक होता. आधी १९८१ साली तमिळमध्ये (कुदुमबम ओरु कदमबम) मग १९८३ साली कन्नडमध्ये (आनंद सागरा) आणि नंतर १९८४ साली तेलगूमध्ये (मनिशिको चरीतरा) असा प्रवास होत हा सिनेमा १९८५ साली हिंदी भाषेत तयार झाला. (Kishor Kumar)
या सिनेमाचे टायटल दुसऱ्या एका निर्मात्याने आधीच बुक करून ठेवले होते. त्याच्याकडून निर्मात्याने ३०००० रु देऊन हे टायटल स्वत:कडे घेतले. त्या काळात ही रक्कम तशी खूप मोठी होती. या सिनेमात जॅकी श्रॉफ, पद्मिनी कोल्हापुरे, राजकिरण, कादर खान यांच्या प्रमुख भूमिका होत्या. या सिनेमातील गाणी इंदीवर यांनी लिहिली होती, तर संगीत बप्पी लहरी यांचे होते.
या सिनेमाचा नायक जॅकी श्रॉफ एका पेट्रोल पंपावर सेल्समनचे काम करत असतो. सिनेमात एक युगलगीत होते, किशोर कुमार आणि अलका याज्ञिक यांच्या आवाजात. एका गाण्यात शब्द होते, “पेट्रोल भरो जल्दी करो मेरी गाडी कबसे खडी है”. या सिनेमात सात आठ मुली पेट्रोल पंपावर येऊन जॅकी श्रॉफ भोवती पिंगा घालत हे गाणं म्हणतात, अशी सिच्युएशन होती. त्यावर जॅकी श्रॉफचे उत्तर असते, “पानी भी देंगे, तेल भी देंगे, ढक्कन खोल के रखना, लाईन बहुत बडी है”. (Kishor Kumar)
किशोर कुमार आणि अलका याज्ञिक यांच्या स्वरात हे गाणे रेकॉर्ड करून सिनेमा पूर्ण झाला आणि सेन्सॉरकडे दाखल झाला. सेन्सॉरने या गाण्यावर आक्षेप घेतला. जॅकी श्रॉफच्या तोंडी असलेल्या ओळी त्यांना अश्लील वाटल्या त्यामुळे या ओळी बदलण्यासाठी सांगितले.
सेन्सॉर बोर्डाचे म्हणणे असे होते की, “तुम्ही पुन्हा रिशूट करू नका फक्त या ओळी बदला. आम्हाला काहीही हरकत नाही.” आता गीतकाराला बोलावून त्या लीपसिंक नुसार काही नवीन ओळी टाकाव्या लागणार होत्या. इंदीवर यांना लगेच पाचारण करण्यात आले व त्यांनी ताबडतोब त्या ओळी बदलल्या. (Kishor Kumar)
आता बप्पी लहरी यांनी किशोर कुमार यांना फोन करून सर्व किस्सा सांगितला आणि त्यांना सांगितले ‘दादा आप जब भी मुंबई आओगे तब वो बदली हुई चार लाईन आपको फिर से गाना है” त्यावेळी किशोर कुमार कोलकाताला शो करत होता. त्याने तिथूनच बप्पी लहरी उत्तर दिले, “अरे बप्पी तू भांजा है ना मेरा, तू ही वो लाईन गा देना!”
यावर बप्पी लहरी यांनी किशोर कुमारला सांगितले, “दादा वो आपका गाना है मै कैसे गा सकता हूं?” त्यावर किशोरचे उत्तर होते “अरे बप्पी मै कहता हू ना तू गा ले. मेरे पास टाइम नही है. कल से मै विदेश जा रहा हूं!” (Kishor Kumar)
आता पंचाईत निर्माण झाली. कारण सिनेमा पूर्ण तयार झाला होता. रिलीजसाठी तारखा डिक्लेअर झाल्या होत्या. त्या आक्षेपार्ह चार ओळी बदलल्याशिवाय सेन्सॉर सिनेमाला पास करत नव्हते. किशोर कुमारने या गाण्याच्या चार ओळी नव्याने रेकॉर्ड करण्यात असमर्थता दाखवली होती. आता करायचे काय? मग बप्पीने दिग्दर्शकाला सर्व प्रकार सांगितला. दिग्दर्शकाने देखील किशोरच्या मताची री ओढली आणि या चार ओळी तुमच्या आवाजातच रेकॉर्ड करा, असे सांगितले.
=========
हे देखील वाचा – या सुपरहिट सिनेमांमधील नायकाच्या भूमिकेसाठी राजेश खन्ना First Choice नव्हता!
=========
बप्पी लहरी यांनी दुसऱ्या दिवशी रेकॉर्डिंग स्टुडिओमध्ये जाऊन किशोरसारखा आवाज काढत त्या ओळी रेकॉर्ड केल्या. आता या गाण्याच्या ‘पानी भी देंगे, तेल भी देंगे, ढक्कन खोल के रखना, लाईन बहुत बडी है’ या ओळींऐवजी नवीन ओळी होत्या “जैसा कहेंगे ,वैसा करेंगे, धीरज दिल में रखना, लाईन बहुत बडी है” या ओळी बप्पी लाहिरी यांनी किशोरचा आवाज काढण्याचा आटोकाट प्रयत्न केला आणि गाण्यात त्या चार ओळी जिथे जिथे येतात तिथे तिथे त्या रीइम्पोज केल्या. (Kishor Kumar)
९०% प्रेक्षकांच्या आणि श्रोत्यांच्या हा बदल लक्षात देखील आला नाही. आता तुम्ही जेव्हा हे गाणं पुन्हा ऐकाल तेव्हा बारकाईने ऐका. तुम्हाला त्या ओळीत बप्पी लहरीच्या आवाजात ऐकू येतील. बप्पीचा हा ‘जुगाड’ मोठा इंटरेस्टिंग ठरला.