Jaran Marathi Movie Motion Picture: विवाहिता आणि बाहुली, काय आहे

मजरूह सुलतानपुरी यांनी फैज यांच्या नज्म मधील एक ओळ घेऊन बनवले ‘हे’ अजरामर गीत!
भारतीय सिनेमाच्या इतिहासात गीतकारांचे फार मोठे योगदान आहे. कारण संपूर्ण जगात भारतीय सिनेमाची ओळख ही संगीतमय सिनेमा अशीच होती. या ‘गोल्डन इरा’ मधील संगीतमय चित्रपटात गीतकारांनी आपल्या लेखणीने उत्तमोत्तम गाणी देऊन चित्रपट संगीताचे दालन समृद्ध केले आहे.
या काळातील गीतकारांची जेव्हा आपण माहिती घेऊ लागतो तेव्हा अनेक गीतकार हे मूलतः शायर असलेले दिसतात. आपल्याकडे शेरो शायरी पेश करण्याची अर्थात कविसंमेलनाची मोठी परंपरा आहे. विशेषतः उत्तरेकडे हिंदी भाषिक प्रदेशांमध्ये असा शेरो शायरीचा मुकाबला, काव्य संमेलन खूप जुन्या काळापासून चालू असलेली दिसतात.
या कविसंमेलनातून विविध साहित्यिकांनी एकत्रित आल्याने साहित्य/कला विषयक विचारांचे आदान-प्रदान घडू लागले. जुन्या काळी राजघराण्यात देखील कवीला आणि त्याच्या रचनांना मोठा सन्मान मिळत असे. या अशा साहित्य यात्रेतून प्रत्येकाची काव्यप्रतिभा ही फुलत जात होती.
उर्दूमध्ये बऱ्याचदा शायर एकमेकांच्या शायरी/गजल/नज्म मधील आवडणाऱ्या ओळी स्वतःकडे घेऊन त्या वेगळ्या पद्धतीने फुलवीत. यात त्यांना गैर असे काही वाटत नसायचे. ‘मौसम’ (१९७५) या चित्रपटातील भूपेंद्र आणि लता मंगेशकर यांच्या स्वरातील ‘दिल ढूंढता है फिर वही फुरसत के रात दिन’ या लोकप्रिय गाण्यातील पहिली ओळ मिर्झा गालिबची आहे. पण गुलजार यांनी ती ओळ घेऊन तिला आपल्या पद्धतीने फुलवून रसिकांपुढे आणले आहे. अशी अनेक उदाहरणे सांगता येतील.
असाच काहीसा प्रकार गीतकार मजरूह सुलतानपुरी यांच्या बाबतीत देखील झाला होता. १९६८ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘चिराग’ या चित्रपटातील एका प्रसंगाच्या वेळी त्यांनी पाकिस्तानचे थोर शायर फैज अहमद फैज यांच्या रचनेतील एक ओळ आठवली होती. फैज अहमद फैज यांची ही रचना पाकिस्तानात आणि पर्यायाने संपूर्ण जगभरात खूप लोकप्रिय झाली होती.
साठच्या दशकाच्या आरंभी ही रचना मालिका-ए- तरन्नुम नूरजहान यांनी गाऊन तिला अधिकाधिक लोकांपर्यंत पोचवले होते. ही नज्म होती ‘मुझसे पहिली सी मोहब्बत मेरे मेहबूब न मांग….’ याच नज्म मधील एक ओळ मजरूह सुलतानपुरी यांना जबरदस्त आवडली आणि त्यांनी चक्क पाकिस्तानला फैज अहमद फैज पत्र लिहून ही ओळ मी माझ्या नव्या गीतासाठी वापरू का? अशी विनंती केली. फैज दिलदार होते त्यांनी मोठ्या मनाने मजरूह सुलतानपुरी यांना परवानगी दिली. यांची मूळ रचना अशी होती.
मुझ से पहली सी मोहब्बत मेरी महबूब न माँग, मैं ने समझा था कि तू है तो दरख़्शाँ है हयात
तेरा ग़म है तो ग़म-ए-दहर का झगड़ा क्या है , तेरी सूरत से है आलम में बहारों को सबात
तेरी आँखों के सिवा दुनिया में रक्खा क्या है …

यातील ‘तेरी आँखों के सिवा दुनिया मे रखा क्या है….’ ही ओळ मजरूह यांनी घेवून त्यावर स्वतंत्र गाणे लिहिले. हे गाणे लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांनी स्वतंत्ररित्या गाऊन अजरामर केले. या गाण्याला संगीत संगीतकार मदन मोहन यांनी दिले होते आणि मदन मोहन यांच्या टॉप टेन गाण्यांमध्ये या गाण्याचा समावेश होतो. दुर्दैवाने हा ‘चिराग’ चित्रपट मात्र अजिबात चालला नाही.
====
हे देखील वाचा: महेंद्र कपूर आणि आशा भोसले यांचं पहिलं गाणं…
====
आता थोडाशी आपण फैज यांच्याबद्दल माहिती घेऊयात. फैज अहमद फैज हे ‘तरक्की पसंत’ क्रांतिकारी, डाव्या विचारांचे शायर होते. त्यांनी कायम आपल्या लेखणीतून शोषितांच्या विरुद्ध होणाऱ्या अन्यायाचा जाब विचारला. आपल्याकडे साहिर लुधियानवी अशाच प्रकारची शायरी करीत होते.
गीतकार मजरूह सुलतानपुरी हे देखील विचाराने लेफ्टीस्ट होते साम्यवादी होते. सरकार विरुद्ध लिखाण केल्याबद्दल त्याना ब्रिटिश सरकारने तुरुंगात टाकले होते. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर त्यांची मुक्तता करण्यात आली. परंतु, नंतर पुन्हा कामगारांच्या बाजूने लिहिल्याबद्दल राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करून सरकारने त्यांना कारावासाची शिक्षा ठोठावली होती. स्वातंत्र्यानंतर एक वर्ष ते तुरुंगात होते. मजरूह यांनी त्यानंतर स्वतःला पूर्णतः सिनेमासाठी वाहून घेतले.
फाळणीनंतर फैज यांनी पाकिस्तानात राहण्याचा निर्णय घेतला. तिथे देखील त्यांनी अन्यायाविरुद्ध आपल्या लेखणीतून प्रहार करणे चालू ठेवले. सत्तरच्या दशकातील पाकिस्तानातील झिया उल हक यांच्या राजवटीच्या विरुद्ध त्यांनी ‘हम देखेंगे …..’ ही गाजलेली रचना लिहिली.
====
हे देखील वाचा: चित्रपटसृष्टीला व्यापून राहिलेला कवी…साहिर लुधियानवी!
====
ही रचना त्याकाळी आणि आजही साम्यवादी विचारांच्या लोकांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहे. झिया-उल्-हक देखील फैज त्यांच्यावर प्रचंड नाराज झाले होते. या देशात आपली खैर नाही ही याची जाणीव होतात फैज यांनी पुढे काही वर्षे लेबेनॉन मध्ये आश्रय घेतला होता.
– धनंजय कुलकर्णी