दिग्दर्शक सुभाष घई आणि गीतकार आनंद बक्षी यांचे जबरदस्त ट्युनिंग!
गोष्ट अमिताभ बच्चन यांच्या कधीही न बनलेल्या ऐतिहासिक चित्रपटाची!
बिग बी अमिताभ बच्चन यांनी आपल्या संपूर्ण कला जीवनामध्ये कधीही ऐतिहासिक चित्रपटात काम केले नाही. त्यांनी काही पोशाखी चित्रपटात जसे खुदा गवाह (१९९२) ठग्स ऑफ हिंदुस्तान(२०१७) अशा चित्रपटातून कामे केली; पण ऐतिहासिक चित्रपट कधीच केले नाहीत. मात्र तसा योग आला होता.
१९७५ साली त्यांना एका ऐतिहासिक चित्रपटासाठी विचारणा झाली होती. गंमत पहा, त्यावेळी अमिताभच्या कारकिर्दीला चांगली सुरुवात झाली होती. प्रकाश मेहरा यांचा ‘जंजीर’ हा चित्रपट १९७३ साली प्रदर्शित होऊन प्रचंड लोकप्रिय झाला होता. अमिताभच्या ‘अँग्री यंग मॅन’ इमेजला रसिकांची मोठी पसंती मिळत होती.
ऋषिकेश मुखर्जी चा ‘नमक हराम’ याच वर्षी आला होता आणि यातून देखील अमिताभच्या अभिनयाचा स्पार्क स्पष्टपणे दिसला होता. सुपरस्टार राजेश खन्नाचे पद डळमळीत करण्याची ताकत या भूमिकेत होती. १९७५ हे साल अमिताभसाठी फार महत्त्वाचं वर्ष होतं. कारण या वर्षी त्याचे दोन चित्रपट सुपर-डुपर हिट ठरले होते. पैकी एक होता यश चोप्रा यांचा ‘दिवार’ आणि दुसरा होता रमेश सिप्पी यांचा ‘शोले’. या शिवाय या वर्षी त्याचे ‘मिली’,’ चुपके चुपके’ हे चित्रपट देखील प्रदर्शित झाले होते. परंतु, या दोन्ही चित्रपटात अमिताभने ‘अँग्री यंग मॅन’ ची भूमिका न करता लाइट मूडच्या भूमिका केल्या होत्या. एकूणच अमिताभच्या करियरला आकार येत असताना एक ‘ऐतिहासिक’ भूमिका त्याची वाट पाहत होती.
हा चित्रपट होता दिग्दर्शक चेतन आनंद यांचा ‘सलीम-अनारकली’. या चित्रपटात अमिताभ शहजादा सलीम यांची भूमिका करणार होता, तर अनारकलीच्या भूमिकेत चेतन आनंद यांची फेवरेट हिरोईन प्रिया राजवंश करणार होती. या चित्रपटाला संगीत मदन मोहन यांचे असणार होते. या ऐतिहासिक चित्रपटाचे आर्ट डायरेक्टर सुधेन्द्र रॉय होते.
चेतन आनंद यांचे यापूर्वीचे दोन चित्रपट चांगले चालले होते. १९७३ साली त्यांचा ‘हसते जखम’ हा चित्रपट त्यातील संगीतामुळे रसिकांच्या लक्षात राहिला होता. तुम जो मिल गये हो, आज सोचा तो आंसू भर आये ही अप्रतिम गाणी यामध्ये होती. तसेच, ‘हिंदुस्तान की कसम’ हा देशभक्तीपर चित्रपट रसिकांच्या पसंतीला उतरला होता.
चेतन आनंद यांना आता एक वेगळा प्रयोग त्यांना करायचा होता. १९७० साली त्यांनी राजकुमार आणि प्रिया राजवंश यांना घेऊन ‘हिर-रांजा’ हा ऐतिहासिक चित्रपट बनवला होता. याच वेळी त्यांनी सलीम-अनारकली हा विषय घेऊन चित्रपट बनवायचा ठरवले होते.
====
हे देखील वाचा: अमिताभ बच्चन -अमजद खान यांच्या मैत्रीची ‘अधुरी एक कहाणी’
====
१९५३ साली आलेला ‘अनारकली’ (सं- री रामचंद्र) आणि १९६० साली आलेला ‘मुगल- ए- आजम’ (सं- नौशाद) हे चित्रपट त्यावेळी भारतभर ‘रिपीट रन’ला प्रदर्शित होवून तुफान व्यवसाय करत होते. तरीही चेतन आंनद यांना नवीन स्टार कास्ट घेऊन चित्रपट बनवायचा होता. यासाठी त्यांनी स्क्रिप्टवर काम देखील सुरू केले. अमिताभ बच्चन यांची लोकप्रियता पाहून त्याला त्यांनी या चित्रपटासाठी साइन करायचे ठरले. सर्व काही प्लानिंग सुरु असतानाच दुर्देवाने मदन मोहन यांचे १९७५ साली निधन झाले आणि चेतन आनंद यांचा या सिनेमाचा इंटरेस्ट संपला.
अमिताभ बच्चनला इमोशनल रोमँटिक इमेजमध्ये प्रेक्षक स्वीकारतील का, याबद्दल शंका होतीच. तसेच अमिताभ बच्चन आणि प्रिया राजवंश या जोडीचे स्वागत प्रेक्षक कसे करतील, असा प्रश्न काही फायनान्सर आणि मित्रांनी त्यांना विचारला. त्यामुळे हा चित्रपट सुरू होण्याच्या आधीच बंद पडला.
जुलै १९७५ मध्ये इंडियन एक्सप्रेसच्या ‘स्क्रीन’ या चित्रपट विषयक साप्ताहिकामध्ये या ‘सलीम अनारकली’ ची मोठी जाहिरात प्रसिद्ध झाली होती. या न बनलेल्या चित्रपटाची हीच एकमेव आठवण आहे. या जाहिरातीमध्ये कुठल्याही कलावंतांचे चेहरे दिसत नव्हते. फक्त एक जळती मेणबत्ती, शहेनशहाचा जिरेटोप आणि मोरपिसाची लेखणी दिसत होती. मोठं काव्यात्मक असं हे पोस्टर बनवलं होतं. यावरून चेतन आनंद त्यावेळी हा चित्रपट बनवण्यासाठी किती गंभीर आहेत ते लक्षात आलं होतं. पण दुर्दैवाने हा चित्रपट काही बनला नाही आणि अमिताभ बच्चन काही ऐतिहासिक सिनेमांमध्ये दिसला नाही.
====
हे देखील वाचा: ब्लॉग: असं काय घडलं की, अमिताभ बच्चन यांच्या ‘शहेनशहा’ चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलावी लागली
====
पुढे काही वर्षांनी याच स्क्रिप्टवर चेतन आनंद यांना ऋषी कपूर आणि पद्मिनी कोल्हापुरी यांना घेऊन चित्रपट बनवण्याचे डोक्यात आले होते. पण ऋषी कपूरने प्रचंड बिझी असल्यामुळे आणि ‘दीदार- ए – यार’ या चित्रपटाच्या अपयशाने कदाचित या प्रोजेक्टला नकार दिला असावा. चेतन आनंद मात्र ही स्क्रिप्ट विसरले नव्हते.
नव्वदच्या दशकामध्ये शाहरुख खान आणि माधुरी दीक्षित यांना घेऊन त्यांना पुन्हा एकदा या विषयावर त्याना चित्रपट बनवायचा होता पण यावेळी त्यांनी त्या चित्रपटाचे नाव बदलून ‘मलिका –ए- हिंद’ असे केले पण या चित्रपटालाही खूप अडथळे येत गेले आणि हा प्रोजेक्ट राहूनच गेला. पुढे १९९७ साली चेतन आनंद यांचे निधन झाले आणि २००० साली प्रिया राजवंश यांचा खून झाला आणि या कधी ही न बनलेल्या चित्रपटावर कायमचा पडदा पडला.