नवं वर्ष ब्लॉकबस्टर चित्रपटांचं….अडसर फक्त कोरोनाचा….(Blockbuster Movies in 2022)
नवीन वर्ष कसं असेल याची प्रत्येकाला उत्सुकता असते. मात्र चित्रपट चाहत्यांसाठी हे नवं वर्ष ‘एक से बढकर एक’ चित्रपटांचे असणार आहे (Blockbuster movies in 2022). आरआरआर, ब्रह्मास्त्र, राध्ये-श्याम, गंगूबाई काठियावाडी, लाल सिंह चड्ढा, पठाण, केजीएफ चैप्टर 2, पृथ्वीराज, रामसेतू, लायनर अशा अनेक बिगबजेट चित्रपटांची रांग या नव्या वर्षात प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. त्यापैकी अनेक चित्रपट सरत्या २०२१ मध्ये कोरोनाचा फटका बसल्यामुळे लटकलेले आहेत.
या वर्षात सर्व काही असबेल राहीलं, तर यासह अन्यही चित्रपटांची मेजवानी चाहत्यांना मिळणार आहे. असं असलं तरी हिंदी चित्रपटांना दाक्षिणात्य चित्रपटांबरोबर मोठी स्पर्धा करावी लागणार आहे.
गेलं वर्ष खऱ्या अर्थानं ओटीटी माध्यमाचे वर्ष राहीले. अनेक उत्तम चित्रपट याद्वारे घराघरात पोहचले. पण बीगबजेट चित्रपटांनी मात्र या माध्यमाकडे पाठ फिरवली आणि चित्रपटगृह पुन्हा चालू होण्याची वाट पाहिली. चित्रपटगृह पूर्ण क्षमतेनं चालू झाल्यावर ‘सूर्यवंशी’ रिलीज झाला आणि इतर सर्व चित्रपटांसाठी गुड न्यूज घेऊन आला.
अल्लू अर्जूनचा पुष्पाही रिलीज झाला आणि त्याची छप्परतोड कमाई बघत हिंदी चित्रपट निर्मातेही आपल्या चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी तयारी करु लागले. नव्या वर्षाच्या पहिल्या आठवड्यातच पुन्हा कोरोना आणि ओमायक्रोनचा धोका वाढत आहे. त्याचा पहिला फटका ‘आरआरआर’ला बसला. या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे करण्यात आली आहे. त्यामुळे आता बाकीच्या चित्रपटांचे प्रदर्शन कधी आणि कुठे होणार याकडे चित्रपट रसिकांचे लक्ष लागले आहे.
नववर्षातील बिग बजेट चित्रपट (Blockbuster movies in 2022)
आरआरआर
बाहुबली चित्रपटाचे दिग्दर्शक राजामौली यांचा बहुचर्चित आरआरआर येत्या ७ जानेवारी रोजी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार होता. त्याचे प्रमोशनही जोरात सुरु झाले. मात्र ओमायक्रॉन आणि कोरोनाचे वाढते रुग्ण बघता आरआरआरचे प्रदर्शन लांबले आहे. या चित्रपटात ज्युनिअर एनटीआर, रामचरण, आलिया भट, अजय देवगण यांच्या प्रमुख भुमिका आहेत.
या चित्रपटाचं बजेट आहे तब्बल ४०० करोड! बाहुबलीनंतरचा राजामौली यांचा आरआरआर हा एक भव्यदिव्य चित्रपट असून त्याच्या टिझर आणि ट्रेलरनंही रेकॉर्ड केला. बॉक्स ऑफीसवर हा चित्रपट छप्परफाड कमाई करणार असा अंदाज असतानाच कोरोनानं पुन्हा डोकं वर काढल्यानं रसिकांची निराशा झाली आहे.
राधे-श्याम
प्रभास आणि पुजा हेगडेची प्रमुख भूमिका असलेला ‘राध्ये- श्याम’ हा चित्रपट १४ जानेवारीला मोठ्या पडद्यावर येतोय. जुलैपासून राध्ये-श्याम चित्रपट कोरोनामुळे रखडला आहे. हा चित्रपटही बिगबजेट असून, यामधील VFX इफेक्टची खूप चर्चा आहे. राध्ये-श्याम रोमँटिक-ड्रामा चित्रपट असून, तेलगू आणि हिंदी भाषेमध्ये चित्रपट प्रदर्शित होईल.
हैदराबाद, इटली आणि जॉर्जिया येथे या चित्रपटाचे चित्रीकरण झाले आहे. बाहुबलीनंतर यामध्ये प्रभासचा लूक एकदम बदललेला आहे. त्यामुळे त्याचे चाहते चित्रपटाची आतुरतेने प्रतीक्षा करत आहेत.
अटॅक
जॉन अब्राहम, जॅकलीन फर्नांडीस आणि रकुल प्रीत सिंह यांची प्रमुख भूमिका असलेला ‘अटॅक’ हा चित्रपटही मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होत आहे. राज आनंद दिग्दर्शित या चित्रपटानंही मोठ्या पडद्यासाठी खूप प्रतीक्षा केली आहे. सायन्स फिक्शन ॲक्शन थ्रिलर ‘अटॅक’ हा एका ओलीस घटनेवर आधारीत आहे.
गंगूबाई काठियावाडी
संजय लीला भंसाळी दिग्दर्शित ‘गंगूबाई काठियावाडी’ अखेर फेब्रुवारी महिन्यात प्रदर्शित होणार असल्याची माहिती आहे. भंसाळी यांनी चित्रपटाची घोषणा केल्यापासूनच चित्रपटामागे लागलेली नकारघंटा अद्यापही चालूच आहे. आत्ता फेब्रुवारीची घोषणा झाल्यावर पुन्हा कोरोनाचा विळखा वाढू लागल्यानं, चित्रपटगृह बंद होणार का, अशी चर्चा चालू झाली आहे.
हे ही वाचा: काय म्हणतेय ‘गंगुबाई काठियावाडी’? आलिया भटची विशेष मुलाखत…
गंगूबाई काठियावाडी ओटीटी प्लॅटफॉर्मवर आणण्यासाठी अनेकांनी भन्साळीना करोडाच्या ऑफर दिल्या आहेत. मात्र ते मोठ्या पडद्यासाठी ठाम आहेत. आलिया भट, विजय राज, इंदिरा तिवारी, अजय देवगण, इमरान हाश्मी, सीमा पाहवा अशी तगडी स्टारकास्ट असलेला हा चित्रपट जुलै पासून प्रदर्शनाच्या प्रतिक्षेत आहे. मात्र त्यापूर्वी हा चित्रपट वादातच अधिक अडकला.
आलियाच्या कारकिर्दीमधील एक महत्त्वपूर्ण चित्रपट म्हणून गंगूबाई काठियावाडीकडे बघता येईल. चित्रपटाचे चित्रीकरण काही दिवसांचे बाकी असतानाच तिला कोरोनाची लागण झाली. त्यानंतर कामाठीपुरा भागातील नागरिकांनी या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी केली.
चित्रपटाच्या माध्यमातून कामाठीपुराबाबत चुकीची माहिती पसरवली जात असल्याचा आरोप त्यांनी केला. कामाठीपुरा येथे काम करणाऱ्या एका सामाजिक संस्थेनं या चित्रपटाविरोधात कोर्टात याचिका दाखल केली आहे. याशिवाय गंगूबाईंच्या कुटुंबीयांनी या चित्रपटावर आक्षेप घेतला. शिवाय संजय लीला भन्साळी, आलिया भट्ट आणि हुसेन झैदी यांच्या विरोधात गुन्हा देखील दाखल केला.
लाल सिंह चड्ढा
आमिर खान आणि करीना कपूर यांच्या बहुचर्चित लाल सिंह चड्ढा चित्रपटालाही ओटीटी प्लॅटफॉर्मवर मोठी मागणी आहे. पण अमिर खान मात्र मोठ्या पडद्यासाठी ठाम असून आता फेब्रवारी महिन्याचा मुहूर्त प्रदर्शनासाठी काढण्यात आला आहे.
अमिर खान प्रॉडक्शनचा हा चित्रपट अमेरिकन चित्रपट ‘फॉरेस्ट गम्प’चा रिमेक आहे. ऑपरेशन ब्लू स्टार आणि बाबरी मशिदीच्या घटनेचाही चित्रपटात काही अंशी समावेश असल्याने या चित्रपटाविरोधात प्रदर्शनाआधीच सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त होत आहे.
केजीएफ चॅप्टर 2
साऊथ सुपरस्टार यशचा २०१८ मध्ये आलेला ‘केजीएफ चॅप्टर 1’ रेकॉर्डतोड कमाईचा ठरला. तेलगू, तमिळ, मल्याळम आणि हिंदी भाषेमध्ये आलेल्या या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची तेव्हापासूनच चर्चा सुरु झाली. ही चर्चा अधिक रंगात आली जेव्हा यामध्ये संजय दत्तचा समावेश झाला. मात्र हा चित्रपटही प्रतीक्षेच्या यादीत लांबला गेला.
संजय दत्त याची तब्बेत अचानक बिघडल्यामुळे चित्रपटाचे चित्रीकरण लांबले. त्यात कोरोनाचा फटका केजीएफ चॅप्टर 2 ला बसला. दिग्दर्शक प्रशांत नील यांनीही ओटीटी माध्यमाला ठाम नकार दिला आहे. सन १९६० मधील सोन्याच्या खाणीतील संघर्ष हा या चित्रपटाचा मूळ गाभा आहे.
चित्रपटांच्या या मांदियाळीमध्ये अक्षय कुमारच्या चित्रपटांचाही समावेश आहे. जेव्हा सर्व चित्रपटसृष्टी कोरोनामुळे अडचणीत सापडली होती, तेव्हाही अक्षयनं समयसूचकता दाखवत आपले चित्रपट ओटीटी माध्यमावर आणले आणि बक्कळ कमाई केली. या नव्या वर्षातही अक्षयचे (Blockbuster movies in 2022) चित्रपट प्रदर्शनाच्या रांगेत आहेत.
पृथ्वीराज
चंद्रप्रकाश द्विवेदी दिग्दर्शित पृथ्वीराज हा चित्रपट महान योध्ये पृथ्वीराज चौहान यांच्यावर आधारीत आहे. अक्षय कुमार सोबत या चित्रपटात विश्वसुंदरी मानुषी छिल्लर बॉलीवूडमध्ये डेब्यू करीत आहे. याशिवाय सोनू सूद आणि मानव विज यांच्याही पृथ्वीराजमध्ये भूमिका आहेत. अक्षयनं २०१९ मध्येच या चित्रपटाची घोषणा केली होती. जानेवारीमध्ये पृथ्वीराजचे मोठ्या पडद्यावर प्रदर्शन होईल अशी आशा आहे.
बच्चन पांडे
अक्षय कुमार आणि कृती सेनन यांचा कॉमेडी-ॲक्शन चित्रपट बच्चन पांडे महाशिवरात्रीचा मुहूर्त साधून ४ मार्च २०२२ रोजी प्रदर्शित होणार आहे. यात अक्षय एका गॅंगस्टरची भूमिका करीत आहे. कृती सेनन पत्रकाराच्या भूमिकेत आहे. यातील अक्षयच्या हटके लूकचे काही फोटो सोशल मिडायावर खूप चर्चेत आहेत.
रक्षाबंधन
आनंद एल रॉय दिग्दर्शित ‘रक्षाबंधन’ चित्रपटात अभिनेता अक्षय कुमार आणि भूमी पेडणेकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. अक्षयनं आपली बहिण ‘अलका भाटिया’ हिला हा चित्रपट समर्पित केला आहे. यात भूमी त्याच्या बहिणीच्या भूमिकेत आहे. हा चित्रपट मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी मात्र ऑगस्टपर्यंत वाट बघावी लागणार आहे.
राम- सेतू
अभिषेक शर्मा दिग्दर्शित राम-सेतू चित्रपटाची घोषणा झाली तेव्हापासूनच प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढली. यात अक्षय कुमार आर्कियलॉजिस्टची भूमिका साकारत आहे. अक्षयसोबत यामध्ये जॅकलीन फर्नांडीस आणि नुसरत भरूचा यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. चित्रपटाचा मुहूर्त अयोध्येमध्ये झाला. त्यानंतर अक्षयला कोरोनाचा संसर्ग झाला. तरीही अक्षयनं चित्रपटाचं शूट वेळेत पूर्ण केले असून आता पोस्ट प्रॉडक्शनचं काम चालू आहे. यावर्षी २१ ऑक्टोबरला राम -सेतू मोठ्या पडद्यावर झळकेल अशी घोषणा अक्षयनं केली आहे.
अक्षयकुमारचे चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज होत असताना अन्य काही चित्रपट मात्र अडचणींचा सामना करत आहेत. यामधील प्रमुख चित्रपट म्हणजे शाहरुख खानचा पठाण. कोरोना एवढाच पठाणला आर्यन खानच्या अटकसत्राचा फटका बसला. त्या सर्वातून मोकळं होत शाहरुखने डिसेंबर महिन्यापासून पुन्हा शुटींगला सुरुवात केली.
पठाणच्या काही भागांचं शुटींग स्पेनमध्ये होणार आहे. पण आता तिथे ओमायक्रॉनचा धोका वाढल्यानं शुटींग लांबलं आहे. परिणामी पुन्हा पठाणच्या प्रदर्शनाची तारीख लांबली आहे.
हे ही वाचा: अंदाज अपना अपना.. फ्लॉप का हिट
चरित्र अभिनेत्यांच्या मांदियाळीतला कोहिनूर: रेहमान
कटरीनानंही लग्नाच्या सुट्टीनंतर पुन्हा शुटींगला सुरुवात केली असली तरी तिच्या ‘मेरी क्रिसमस’ चित्रपटाला वाढत्या कोरोनाचा फटका बसणार आहे. चित्रपटात लाईव्ह लोकेशनवर रात्री शूट करण्याचा प्लॅन होता. परंतु, मुंबईमध्ये नाईट कर्फ्यू लागल्यामुळे सध्यातरी शुटींग थांबवण्यात आले आहे. याशिवाय स्टुडीओमध्येही ठराविक वेळेनंतर शुटींग करण्यास बंदी असल्यामुळे मेरी क्रिसमला सध्या ब्रेक लागला आहे. परिणामी या चित्रपटाचे प्रदर्शन लांबणार असल्याची चर्चा आहे.
हे देखील वाचा: ब्लॉग: सेलिब्रेटिजच्या लग्नाचा इव्हेन्टस विकणे आहे…..
ही चित्रपटांची (Blockbuster movies in 2022) यादी अशीच मोठी आहे. अनेक चांगले चित्रपट तयार होऊन प्रदर्शनाच्या रांगेत आहेत. त्यांना ओटीटीवर मागणी असूनही दिग्दर्शक मोठ्या पडद्यासाठी आग्रही आहेत आणि त्यासाठी नुकसान सोसूनही ते कोरोनाचं सावट दूर होण्याची वाट पहात आहेत. एकूण आगामी वर्षही कोरोना आणि ओमायक्रॉनच्या सावटाखाली असेल असेच सध्याचे चित्र आहे.
– सई बने