Raj Thackeray : राज-शर्मिला ठाकरेंच्या लव्हस्टोरीशी वंदना गुप्तेंचं कनेक्शन काय?

बालनाट्य: छोट्या प्रेक्षकांचा कमबॅकही गरजेचा
गेल्या दोन वर्षांपासून लागलेला कोरोनाचा विळखा सुटला आणि आता शाळा सुरू होऊन सुट्ट्यांचा हंगाम सुरू होत आहे. नशिबाने पुन्हा सगळं पूर्ववत होतंय. मनोरंजनसृष्टीबद्दल बोलायचं तर पुन्हा एकदा सिनेमे थिएटरवर धडकू लागले आहेत. नाटकं थिएटरमध्ये लागताहेत. त्याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे प्रेक्षकही या सर्व कलाकृतींना दाद देऊ लागले आहेत.
गेल्या काही दिवसांत जर थिएटरवर नजर टाकली, तर लक्षात येतं की ‘पावनखिंड’, ‘झुंड’, ‘शेर शिवराज’, ‘झिम्मा’, ‘पुष्पा’ असे सिनेमे चालतायत. अलिकडे आलेले ‘आरआरआर’, ‘केजीएफ’ही चालले. ही चांगली नांदी आहे. लोकांना मनोरंजन हवं होतं आणि ते आता त्यांना पुन्हा एकदा मिळू लागलं आहे. उरला प्रश्न घरातल्या रंजनाचा तर टीव्हीवर मालिकाही चालू आहेत. त्यातही नव्या मालिका येऊ लागल्या आहेत.
लोकांची अभिरूची काहीशी बदलल्याने टीआरपीच्या स्पर्धेत नवी चॅनल्स आघाडीवर असल्याचं दिसू लागलं आहे. हे सगळं एका बाजूला. यात गेल्या काही काळापासून बच्चेकंपनीकडे मात्र आपलं थोडं दुर्लक्ष होऊ लागलं आहे.

बच्चे कंपनी म्हणजे फार लहान नाही. पण निदान आठ वर्षापासून पुढे १४ वर्षांपर्यंतच्या मुला-मुलींसाठी काही नव्यानं घडताना दिसत नाही. गेली दोन वर्षे तर या मुलांनी फार हालाखीत काढली. त्यातल्या त्यात समजत्या-कळत्या वयातल्या मुलांना काय झालंय ते कळत होतं. पण पाच ते १२ वर्षांच्या मुलांचे तसे फार हाल झाले. हे हाल बौद्धिक जास्त होते. कारण बाहेर काय चाललंय ते समजण्याचं त्यांचं वय नव्हतं आणि खरंतर जे खेळण्या-बागण्याचं त्यांचं वय आहे ते त्यांना काही करता येत नव्हतं. अशा मुलांच्या हाती मोबाईलही कमी दिला जात असल्यामुळे केवळ गेम खेळूनही ही मुलं पिसाटून गेली होती.
आता त्यांच्यासाठीही जमेची बाजू म्हणजे, शाळा सुरू झाल्या आहेत. त्यांना नवे मित्र मिळू लागले आहेत. सोशली ही मुलं पुन्हा एकदा घराबाहेर पडू लागली आहेत. अशात त्यांच्या रंजनाची जबाबदारी कुणी घेताना दिसत नाही. नाही म्हणायला, ऐतिहासिक चित्रपटांची मेजवानी त्यांना मिळते आहे. पण त्या पलिकडे फार काही होताना दिसत नाही. खरंतर त्यांची रुची विकसित करण्याचं काम होतं ते नाटकामुळे.
आपल्यासमोर जिवंत कुणीतरी उभं राहून आपल्यासाठी काहीतरी सादर करतो आहे ही कल्पनाच त्यांनी कधी केलेली नसते. कारण, त्यांनी आजवर जे काही पाहिलेलं असतं ते केवळ मोबाईलच्या किंवा टीव्हीच्या किंवा थिएटरच्या स्क्रीनवर. नाटक म्हणूनच महत्वाचं असतं. शाळेतल्या गॅदरिंगपासून बिल्डिंगमधल्या गेटटुगेदरपर्यंत सगळीकडे त्यांना याच मंचावर कधीतरी उभं रहायचं असतं. पण त्याचं बाळकडू देणार कोण? म्हणून आता येणारी बालनाट्य महत्त्वाची ठरतायत.

आज मराठी व्यावसायिक रंगभूमीवर चालू असलेल्या नाटकांवर नजर टाकली, तर सध्या सकारात्मक चित्र आहे. नवी नाटकं येताना दिसतायत. शिवाय लहान मुलांसाठीही नाटकं (बालनाट्य) आली आहेत. यात सगळ्यात अव्वल बालनाट्य ठरलं आहे ते रत्नाकर मतकरी लिखित चिन्मय मांडलेकर दिग्दर्शित ‘अलबत्या गलबत्या’. वैभव मांगले यांनी साकारलेली चिंची चेटकिण इथे भाव खाऊन जाते आहे. लॉकडाऊन लागण्यापूर्वीही हे बालनाट्य बच्चेकंपनीमध्ये तुफान लोकप्रिय झाल होतं. आता दोन वर्षांच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा या नाटकाचे जोरदार प्रयोग होताना दिसू लागले आहेत.
सर्वसाधारणपणे नाटकांसाठी थिएटर्स खुली झाल्यानंतर नाटकांना प्रेक्षक येतो की नाही हे प्रशांत दामले यांच्या नाटकावरून ठरवलं जातं, तसं अलबत्या गलबत्याबाबत झालं. बच्चेकंपनी पुन्हा एकदा या नाटकांना गर्दी करू लागल्यावर याच बच्चेकंपनीसाठी आणखी एक बालनाट्य मंचावर आलं ते म्हणजे अतुल परचुरे यांची मुख्य भूमिका असलेलं ‘कापूस कोंड्याची गोष्ट’. या नाटकाचे प्रयोगही आता मुंबई-पुण्यात होऊ लागले आहेत. या नाटकालाही प्रतिसाद मिळतो आहे. आणि आता आणखी एक बालनाट्य रंगभूमीवर येतंय. हे बालनाट्यही रत्नाकर मतकरी यांनी लिहिलं आहे. यामध्ये मुख्य भूमिकेत आहे अभिनेता संजय नार्वेकर. आणि नाटकाचं नाव आहे ‘चमत्कार’.

मराठी बालरंगभूमीसाठी ही फार महत्वाची गोष्ट घडते आहे. मराठी मनोरंजनविश्वात लोकप्रियतेच्या शिखरावर असलेले तीन महत्त्वाचे कलाकार छोट्या दोस्तांसाठी नाटक घेऊन येतायत. या नाटकांमध्ये व्यावसायिक दृष्टिकोन असणार आहेच. तो असायलाच हवा. कारण, गेली दोन वर्षं आपल्या सगळ्यांनाच फार बरी गेली नाहीयेत. तशीच ती नाट्यसृष्टीलाही चांगली गेली नाहीयेत. त्यातून उभारी घेण्यासाठी जो तो प्रयत्न करणार आहे. पण त्यासाठी या नाट्यसंस्थांनी बालनाट्य निवडलं ही एक जमेची बाजू म्हणावी लागेल.
याचं कारण म्हणजे या नाटकांमुळे नवी कोवळी पिढी नाट्यगृहात दाखल होणार आहे. त्यांना नाटक म्हणजे काय असतं, ते कसं करायचं असतं, जिवंत कला कशी असते या सगळ्या प्रश्नाची उत्तरं मिळणार आहे. इतकंच नव्हे, तर नाटक पाहताना साधं खोकलं किंवा शिंकलं तरी कसा इतरांंना त्रास होतो…नाटक करणाऱ्यांना कशा गोष्टींची अडचण होते… प्रेक्षागृहात फोन वाजला की नाटकाचा रसभंग कसा होतो; या सगळ्या गोष्टी फार लहान वयात कळतील ज्याचा त्यंच्या मोठेपणी त्यांना फायदा होणार आहे.
आपल्याला नाट्यसृष्टी चालवायची आहेच. पण त्यासोबत नवा प्रेक्षकही तयार करायचा आहे. कारण, तो आता आपला पुढचा प्रेक्षक असणार आहे. आणि आता या लहानग्यांच्या मानसिकतेकडे पाहण्याचीही गरज आहे. त्यांनाही त्यांच्या वयाचं रंजन हवं आहे. आपण त्यात कमी पडतो आहोत. नाही म्हणायला, पुण्यातही असं महत्त्वाचं पाऊल उचललं जातं आहे.

पुण्यात येत्या काही दिवसांत ग्रिप्स थिएटरच्या महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. ही फार मोठी चळवळ श्रीरंग गोडबोले, विभावरी देशपांडे, राधिका इंगळे आदी मंडळी आपआपल्या परीने पुढे नेत आहेत. यातूनच नवे कलाकार घडतील. यातूनच नवे लेखक, दिग्दर्शक जन्माला येतील. पण ते येण्यासाठी मुळात नाटक म्हणजे काय आणि त्यात सादरीकरणाचा थरार नेमका कसा असतो हे या मुलांना कळणं गरजेचं आहे.
=====
हे देखील वाचा – मालगुडी डेज: मालिकेची आठवण म्हणून चक्क रेल्वे स्टेशन बदललं म्युझिअममध्ये!
=====
गेली दोन वर्षं शाळा बंद असल्यामुळे अनेक शाळांनी ब्रिज कोर्स तयार केले आहेत. त्यामुळे अनेक मुलांच्या शाळा मे महिन्याच्या मध्यापर्यंत असणार आहेत. त्यामुळे काही मुलांसाठी सुट्ट्यांचा हा हंगाम छोटा असणार आहे. पण अशातही ही नाटकं महत्त्वाची ठरतील. आता लॉकडाऊन नंतर प्रेक्षक पुन्हा थिएटरकडे वळले आहेत. अशात या छोट्या प्रेक्षकांचं ही कमबॅक होणं महत्वाचं आहे. ते झालं तरच रंगभूमीला नवा प्रेक्षक मिळणार आहे. तो लगेच मिळत नाही, तर तो तयार करावा लागतो. लॉकडाऊनंतर येणारी छोट्या दोस्तांची नाटकं ती जबाबदारी निभावतील अशी आशा आहे.