पूजा सावंतमध्ये चक्क वैजयंतीमालाचा भास….
पूजा सावंत (Pooja Sawant) मध्ये “देवदास”, “नया दौर”, “अमरदीप”, “मधुमती”, ”पैगाम” या चित्रपटातील वैजयंतीमालाचा भास नक्कीच होतो, पण कधी कधी रेखाचाही भास होतो असे अगदी सुरुवातीलाच म्हटल्याने कदाचित काहीना हा ऑफ स्टंप बाहेर जाईल असा वाटलेला प्रश्न एकदम पॅडवर आल्यासारखे वाटले असेल आणि हिच तर सेलिब्रेटिजच्या गुणवत्ता आणि पर्सनालीटीचे सही मूल्यमापन करण्यातील खरी गंमत आहे.
पूजा सावंत आता “पूजा सावंत” च वाटते…
गजेन्द्र अहिरे दिग्दर्शित “नीळकंठ मास्तर” (Nilkanth Master) या चित्रपटातील लक्षात राहिलेली गोष्ट एकच. ती म्हणजे, माळरानावरचे पूजा सावंतने साकारलेले ‘अधीर मन झाले’ हे गाणे. तिचा सगळा लूक, म्हणजे असणे/पाहणे/बघणे/हसणे, अगदी ऐकणे पाहताना साठच्या दशकातील वैजयंतीमाला नक्कीच आठवते. अगदी नृत्यासह…! असे योग/योगायोग अनेक सेलिब्रेटिजबाबत येतात. खरी गरज असते ती, स्वतःची आपली एक पर्सनालिटी असणे, ती जपणे, तिचे अस्तित्व कायम ठेवणे.
हे देखील वाचा: टॅलेंट आणि ग्लॅमरच समीकरण म्हणजे सोनाली बेंद्रे…
त्यातही पूजा सावंत यशस्वी ठरतेय. आता ती वैजयंतीमाला न वाटता ‘पूजा सावंत’ वाटते. कमी अथवा मोजक्या चित्रपटात भूमिका साकारतही पूजा सावंतने मनोरंजन क्षेत्रात उत्तम जम बसवला आहे. वेग वाढवण्यावर तिचा विश्वास नसावा असे लक्षात येते आणि तेच चांगले आहे. उगाच, हा चित्रपट कर, तोही चित्रपट हवाय अशा धावपळीत लवकर दमछाक होते आणि आपल्या कामाचा आपणच आनंद घेत नाही असे काहीसं होते.
पूजा आणि रेखामध्ये असलेलं साम्य…
एव्हाना तुमच्या मनात प्रश्न असेल ते रेखाशी पूजा सावंतची तुलना करण्याचा मोह तुम्हाला झाला आहे, त्याचे हो काय? पूजा सावंतमध्ये ‘खुबसुरत’ सिनेमानंतरची रेखा दिसतेय, पण ती फोटो सेशनमध्ये…! रेखा त्या काळात ग्लॉसी पेपर्सवरील गॉसिप्स इंग्रजी मिडियात कधी पारंपरिक तर कधी वेस्टर्न स्टाईल (अथवा भारतीय रुपडं आणि मॉर्डन फॅशनेबल रुप) अशा दोन्हीत साधारण एकाच सुमारास आपल्या फॅन्ससमोर येई (पडद्यावरच्या परफार्म आणि अष्टपैलूत्वाइतकाच मिडियातील स्कोर कार्ड आपल्या सिनेमाचे विलक्षण प्रेम असलेल्या देशात महत्वाचे आहे. त्यातील मुलाखती, फोटो, कॉंट्रोव्हर्सी यातून त्या स्टारबाबत चाहत्यांच्या मनात एक इमेज घडत असते आणि असे सतत आपल्या फॅन्सशी कनेक्ट राहणे खूपच गरजेचे असते). पूजा सावंतही कधी टिपिकल मराठमोळ्या रुपात तर कधी एकदम sensuous look मध्ये सोशल मिडियात आपले फोटो शेअर करीत असतेच.
हे नक्की वाचा: चित्रपट क्षेत्रातील फोटोंचा विकसित होणारा एक अनोखा प्रवास
वेगळ्या भाषेत सांगायचे तर कधी ती गिरगाव, विलेपार्ले, डोंबिवली येथील टिपिकल मराठमोळ्या रुपात असते तर कधी एकदम कुलाबा, मलबार हिल, पेडर रोड, कार्टर रोड असा एकदम हायफाय फंडा असतो. एकूणच अशातून रेखा निश्चित जाणवते. (बघा निरखून. हवं तर पुन्हा पहा.) याचे कारण म्हणजे रेखाप्रमाणेच पूजा सावंतलाही फोटो सेशनचा अजिबात कंटाळा नाही. पूर्वीच्या पिढीतील कोणत्याही फोटोग्राफरला रेखाच्या फोटोच्या हौसेबद्दल विचारा, तो आवर्जून सांगेल की, दिवसभर फोटो सेशन करुनही संध्याकाळीही फोटोसाठी तयार होण्यात रेखा उत्साही असे. आणि रेखा ज्याप्रमाणे बरीच वर्षे ‘जशी होती तशीच दिसे’ तोच गुण पूजा सावंतलाही बराचसा साध्य झाला आहे.
अगदी झीनत अमान रेट्रो लूकच्या फोटोतही ती एकदम सही दिसली. झीनत उंच तशी पूजाही आणि झीनत अनेकदा डार्क रंगाच्या ड्रेसमध्ये आऊटडोअर्स फोटो सेशन करे. पूजानेही यलो रंगाला पसंती देत तसेच फोटो सेशन केले. ती कधी टॉप आणि जीन्समध्येही तेवढीच खुलते जेवढी गुढीपाडव्याच्या पारंपरिक रुपात छान वाटते.
एका ज्वेलर्सच्या जाहिरातीतही ती लक्ष वेधून घेते. बरं, फोटो इनडोअर्स असोत अथवा आऊटडोअर्सला बॅकग्राउंड कोणतीही असो, पूजाचा फिटनेस फंडा अथवा फिगर (शुध्द मराठीत आकर्षक शरीरसौष्ठव) आणि ग्लॅमरस लूक सारखाच इम्प्रेसिव्ह असतो. एकदा तिने आपल्या घराखाली सकाळीच सहज म्हणून फोटो काढून तो सोशल मिडियात शेअर केला तरी तो छान आला आणि तो पाहता पाहता लाईक्स वाढल्याही. फोटो कॅमेराशी दोस्ती म्हणतात ती हीच. ती नकळतपणे होते. पूजाची ती झाली आहे. मूळात ती महाराष्ट्र टाईम्सच्या श्रावण क्वीन स्पर्धेतून आली त्यात फिटनेस, लूक आणि आत्मविश्वास अथवा बौध्दिकता यांनाच महत्व होते आणि तेच ती बारा तेरा वर्षे फॉलो करतेय.
पूजा सावंतच्या पहिला मराठी सिनेमा…
पूजा सावंतशी माझी पहिली भेट “क्षणभर विश्रांती” (२००९) या चित्रपटाच्या निमित्ताने झाली आणि एक लक्षात आले की, ती स्टार म्हणूनच सगळीकडे वावरणारी नाही. जिथे त्याची गरज असते तेथे ‘आपण स्टार असल्याचे स्वतःही विसरायचे नसते आणि इतरांनाही त्याची जाणीव करून द्यायची असते’ हे तर व्यावसायिक सूत्र आहे.
पूजाने मराठी चित्रपटसृष्टीत पाऊल टाकले तेव्हापासूनच वर्षभरात शंभर सव्वाशे चित्रपट मराठीत निर्माण होऊ लागले, त्याच वेळेस मराठीत ग्लॅमरस धमाकेदार इव्हेन्टस संस्कृती वाढत होती, विशेषतः पुरस्कारांची संख्या आणि सोहळे यात वाढ होत होती, चित्रपटाप्रमाणेच खाजगी मनोरंजक उपग्रह वाहिनीवर कधी स्पर्धक तर कधी परीक्षक म्हणून सहभाग घेणे कॉमन होत चालले होते, मराठी मनोरंजन क्षेत्राच्या पार्ट्या आता जुहू, अंधेरी, सहार येथील पंचतारांकित हॉटेलमध्ये उशीरापर्यंत रंगू लागल्या होत्या, त्यात एक प्रकारचे मोकळेपण येऊ लागले होते, प्रत्येक पार्टीत नवीन फॅशनच्या ड्रेसमध्ये येणे जणू अलिखित नियम झाले, दुसरीकडे त्याच सुमारास मराठीत अमृता खानविलकर, सोनाली कुलकर्णी (छोटी), सई ताह्मणकर असा एकदम फ्रेश तडका रुजत/रुळत होता.
या अशा परिस्थितीत पूजा सावंतची बहुरंगी करियर हळूहळू आकार घेत आली. तिला यशस्वी होण्यासाठी कसलीही घाई नाही हे एकूणच तिच्या बोलण्यात/विचारात माझ्या कायमच लक्षात आले. (आमच्या जवळपास सगळ्याच भेटी कोणत्या ना कोणत्या पार्टीतच होतात, एखाद्या चित्रपटाच्या फस्ट लूकलाच होतात आणि तेव्हा जे काही थोडंफार बोलणे/ऐकणे/सांगणे होते त्यावरुन तिच्याबद्दल माझी मते होत आहेत).
आतापर्यंत फक्त एकदाच पूजाची ‘थोडक्यात’ (म्हणजे आजच्या काळानुसार म्हणा… आता पूर्वीसारख्या सेलिब्रेटिजच्या घरी ‘चहा पिता पिता’ दीर्घ मुलाखतीही होत नाहीत आणि मुलाखतीपूर्वी आणि नंतर ‘ऑफ द रेकॉर्ड’ गप्पाही होत नाहीत. खरी गंमत त्यात असते. ‘प्लीज हे छापू नकोस हं’ असे सेलिब्रेटिज विश्वासाने सांगते, त्यात खरे खमंग मटेरियल असते. पण न छापण्याचा शब्द दिलेला असतो ना…)
पुजाचं जंगली सिनेमातून बॉलीवूडमध्ये पदार्पण…
पूजाने “सतरंगी रे”, “झक्कास”, “गोंदण”, “भेटली तू पुन्हा”, “लपाछपी” (पूजा स्वतः भूताला खूप घाबरते, पण या भयपटात तिने उत्तम भूमिका साकारली), “पोस्टर बॉईज” (यात तिची अनेक एक्प्रेशन खूप बोलत होती), “दगडी चाळ” (तिला यात वाव कमी, पण तरीही तिने छान काम केले आहे), “बोनस”, “विजेता”… अशा मराठी चित्रपटात भूमिका साकारतच, महाराष्ट्र बेस्ट डान्सर, वाजले की बारा वगैरे शोमध्ये ती दिसली. पण ‘आपलं करियर, आपला वेग’ यावरची पकड तिने सोडली नाही. इव्हेन्टससाठीचा वेळ आणि धावपळ तसेच नृत्य रिहर्सल सांभाळायची तर कामाचा फापटपसारा वाढवून उपयोग नाही याचे तिला कायमच भान आहे. “जंगली” या हिंदी चित्रपटात भूमिका साकारुनही ती अगदी cool राहिली.
आपण हिंदी चित्रपट स्वीकारला तोच अनेक सेलिब्रेटिज ट्वीट करतात, मुलाखती देतात. पूजा मात्र सिनेमा पूर्ण होईपर्यंत खरोखरच गप्प राहिली. हा संयमच तिचे वैशिष्ट्य आहे. “जंगली” च्या निमित्ताने हत्तींसोबत अभयारण्यात काम करायला मिळाल्याचा तिचा आनंद खूप मोठा होता. प्राणी आणि पक्ष्यांवरचे तिचे प्रेम तिला फ्रेश ठेवतेय. कुत्रा, मांजर तर जास्तच प्रिय. त्यांच्यासोबतचे फोटो, व्हिडिओ ती कायमच सोशल मिडियात पोस्ट करते तेव्हाचा तिचा आनंद अवर्णनीय असतो. अशा छोट्या छोट्या गोष्टीतच आयुष्यातील खूप आनंद मिळत असतो आणि याच गोष्टी तिला फिल्मी होऊ देत नाहीत.
पूजा सावंत आणि स्मिता पाटील यांच्यातील नातं…
पूजा सावंत स्मिता पाटीलची अतिशय जबरदस्त चाहती आहे. स्मितावरचे पुस्तक वाचणे, तिचे जुने चित्रपट पाहणे, तिच्या फोटोतून तिला जाणून घेणे हे पूजाला आवडते. या गोष्टी पूजामधील माणूस आणि अभिनेत्री अशा दोन्ही पातळीवर वाढ करेल आणि ती जडणघडण नेमकी कशी झाली आहे याचा आणखीन काही काळाने प्रत्यय येईल. अशा गोष्टींची फळे एकदम मिळत नसतात. आणि त्याचा प्रत्यय येण्यासाठी तसा चित्रपट आणि व्यक्तिरेखा मिळायला हवी.
भविष्यात ती नक्कीच मिळेल. मराठीत काही वेगळे चित्रपट निर्माण होत आहेतच. फक्त एक योग यायला हवा. “भेटली तू पुन्हा” या चित्रपटातील अभिनयासाठी तिला राज्य चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा स्मिता पाटील पुरस्कार प्राप्त झाला तेव्हाचा तिचा आनंद हा आतापर्यंतच्या करियरचा हायपॉईंट आहे. असे मानाचे पुरस्कार टॉनिकच असतात आणि त्यात जर तो आपल्या प्रेरणा स्थानाच्या नावाने असेल तर उत्तमच.
पूजाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना…
पूजा सावंतला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देताना आज मला जाणवतयं की ती मराठी मनोरंजन क्षेत्रात व्यवस्थित मिसळली आहे, पण तरीही तिने स्वतःची एक वेगळी पर्सनालीटी अथवा ओळख निर्माण केली आहे. एकीकडे या क्षेत्रात रमायचे पण तेव्हाच आपल्या कुटुंबाला अतिशय घट्ट पकडून राहायचे हे तिचे वैशिष्ट्य आहे. गिरगाव चौपाटीवरील एका भव्य इव्हेन्टसमध्ये नेमकी तीच नृत्य करीत असतानाच स्टेजखाली लागलेली आग पटकन भडकली तेव्हा तिने पटकन स्वतःची काळजी तर घेतलीच पण पहिला फोन आपल्या वडिलांना केला. हे खूप महत्त्वाचं आहे. यात तिच्यावरचे संस्कार आणि तिची कौटुंबिक ओढ दिसतेय. ग्लॅमरच्या क्षेत्रात वावरायचे/रमायचे, पण हरवून अथवा हरपून जायचे नाही हाच तिचा महत्वाचा गुण यात सूचित होतो. पुन्हा एकदा शुभेच्छा…!