तात्या सरपंचांच्या वस्त्रहरणाची गोष्ट
मालवणी भाषेला या नाटकाने जगभरात पोहचवलं. “अस्सल देशी वाणाचा भरजरी फार्स” असं या नाटकाचं पुलंनी वर्णन केलं होतं. या नाटकाबाबतचा एक किस्सा खुद्द मच्छिंद्र कांबळी यांनी दूरदर्शनवरच्या एका मुलाखतीत सांगीतला होता. नाटक थेट सादर होत असताना त्याक्षणाला काय घडेल हे कधीच सांगता येत नाही. वस्त्रहरण तेव्हा तुफान गर्दीत चालू होतं.असाच कुठल्याशा नाट्यगृहात रंगलेला प्रयोग. तात्या सरपंच आणि तालीम मास्तर यांची रंगलेली जुगलबंदी प्रेक्षकांना हसून गडाबडा लोळवत होती. आणि एका प्रसंगात खुर्चीवर बसलेले तात्या उठतात आणि तावातावाने समोर बसलेल्या तालीम मास्तरांकडे जातात असा प्रसंग. मच्छिंद्र कांबळी यांची या भूमिकेवर इतकी हुकुमत होती की ते अभिनय करत आहेत असं न वाटता त्यांचं रंगमंचावरचं वावरणं अतिशय सहज असायचं. तितक्याच सहजपणे ते उभे राहिले आणि चालत समोर गेले बस्स…….. इतकीच कृती आणि प्रेक्षकांतून कडाडून टाळ्या आणि हास्याचा नायगारा कोसळला. वास्तविक अतिशय साध्या अशा त्या कृतीत हसण्याजोगं काहीच नसल्याने मच्छिंद्र कांबळी दोन क्षण गोंधळले. लोकं का टाळ्या वाजवत आहेत, हसत आहेत त्यांना कळेना.ते आजुबाजूला पाहतात तर स्टेजवरच्या सगळ्यांचं लक्ष मच्छिंद्रजींच्या पाठीमागे होतं. मच्छिंद्रजींनी मागे पाहिलं आणि त्यांना उलगडा झाला. झालं होतं असं की, ते ज्या खुर्चीवर बसले होते तिथून एक बारकासा खिळा वर आला आला होता आणि त्याने आपली करामत दाखवली होती. तात्या सरपंचांचं धोतर त्या खिळ्यात अडकलं होतं आणि ते तरातरा चालल्याबरोबर खिळ्यात अडकलेलं धोतर टारकन् फाटून तात्या सरपंच ते खुर्ची असा एक पडदाच तयार झाला होता. त्या कृतीवर लोकं मरमुराद हसत होते. त्यांना तो नाटकातलाच प्रसंग वाटला होता. अर्थात इतका आणीबाणीचा प्रसंग असुनही मच्छिंद्र कांबळींनी तिथं अॅडीशन घेतली. “मास्तरानु द्रौपदीचा वस्त्रहरण -हवला बाजूक हय माझाच वस्त्रहरण होऊची वेळ इली” असं काही तरी म्हणत त्यांनी तो प्रसंग इतका बेमालूमपणे सांभाळला की रंगमंचावरील सगळ्यांच्याच तोंडून दाद निघाली असेल, क्या बात है! प्रेक्षकांना कळलंही नाही की स्टेजवर जे घडलं ती आयत्यावेळची अडचण होती.
आणि म्हणूनच नाटकात एक गंमत आहे. तालमी होतात, सराव होतो पण प्रत्यक्ष प्रयोगात काय होईल हे नटेश्वरालाही ठाऊक नसतं. सच्चा नाट्यकलावंत या अनपेक्षिततेत रमतो आणि चेह-याला रंग लावून पुन्हा पुन्हा नाटकातील ही गंमत, ही मौज अनुभवत रहातो.
– रश्मी वारंग