ऋतुजा बागवेला मिळाला मानाचा उस्ताद बिस्मिल्लाह खाँ युवा पुरस्कार
सिकंदराची एक्झीट…
काही कलाकार केवळ त्यांच्या उपस्थितीने आसपासचं वातावरण भारुन टाकतात. असं उमदं व्यक्तीमत्व म्हणजे श्रीकांत मोघे. त्यांची “एक्झीट” सिने-नाट्य रसिकांना चटका लावून गेली…या राजबिंड्या कलाकाराच्या आठवणी देखील तितक्याच उमद्या आहेत. (Veteran Marathi actor Shrikant Moghe passes away)
राम गणेश मोघे या कीर्तनकार पित्याच्या पोटी जन्माला आलेल्या श्रीकांत यांचं सगळं बालपण किर्लोस्करवाडी येथे गेलं. शिक्षणानिमित्त ते पुण्यात आले. महाविद्यालयीन स्पर्धांमध्ये भाग घेताना त्यांना अभिनय आणि गाण्याची आवड निर्माण झाली. प्रत्यक्ष अभिनयक्षेत्राकडे वळण्यापूर्वी विविध क्षेत्रात मोघे यांनी स्वच्छंद मुशाफिरी करत जो अनुभव गोळा केला, त्याने त्यांचा अभिनय अधिक संपन्न झाला.
मॅकेनिकल इंजिनीअरिंग करणा-या श्रीकांतजींनी प्रत्यक्षात पहिली नोकरी दिल्ली आकाशवाणी केंद्रावर वृत्तनिवेदक म्हणून केली. १९६१ साली त्यांची मुंबईत बदली झाली. विविध नाटकांतून स्वत:ला आजमावताना श्रीकांत यांनी आकाशवाणीची नोकरी सोडून चक्क जे जे स्कूल आर्टच्या अप्लाईड आर्कीटेक्चरला प्रवेश घेतला. या दरम्यान तुज आहे तुजपाशी, सुंदर मी होणार या त्यांच्या नाटकांची चर्चा होती.
पण श्रीकांत मोघे (Shrikant Moghe) यांना कलाकार म्हणून ख-या अर्थाने प्रस्थापित करणारं नाटक म्हणजे पु.लं देशपांडे लिखित “वा-यावरची वरात”. या नाटकात ते तीन विविध भूमिका रंगवत. त्यातही चाचाचा डान्स करणारा त्यांचा धमाल तरुण आजही अनेकांच्या स्मरणात आहे. त्यानंतर श्रीकांत यांची अनेक नाटकं प्रेक्षक पसंतीस उतरली. आंधळ्यांची शाळा,सीमेवरुन परत जा, लेकुरे उदंड झाली, अजून यौवनात मी, गारंबीचा बापू, गरुडझेप, मृत्युंजय, संकेत मिलनाचा ही त्यापैकी काही.
‘सीमेवरुन परत जा’ नाटकात राजबिंडा सिकंदर प्रेक्षकांना अनुभवता यावा यासाठी श्रीकांत प्रयोगाआधी चेस्ट एक्सपांडरच्या सहाय्याने वॉर्म अप करुन रंगमंचावर प्रवेश करत. त्यामुळे स्नायु अधिक पिळदार दिसून बांधा सिकंदराप्रमाणे देखणा दिसत असे. भूमिकेसाठी घेतलेल्या मेहनतीचे चीज होई.
कोणत्याही विशिष्ट अभिनय शैलीचा शिक्का श्रीकांत यांनी स्वतः वर बसू दिला नाही. लेकुरे मधला खेळकर विनोदी नायक, वरात मधला गावरान शिरपा, गरूडझेप मधील छत्रपती शिवाजी महाराज, सीमेवरुन परत जा मधला सिकंदर, दुर्योधन, अशी पाखरे येती मधला अरुण सरनाईक या आणि अशा विविध नाटकातील त्यांच्या भूमिकांना वेगवेगळ्या छटा होत्या.
चित्रपटात श्रीकांत यांचा प्रवेश अगदी अपघाताने झाला. १९६० साली मुंबई आकाशवाणीत काम करत असताना एका अपरिहार्य कारणास्तव श्रीकांतजींना ग.दि.माडगुळकरांकडे जाण्याचा योग आला. तिथे गोविंद घाणेकर हे प्रपंच चित्रपटाचे दिग्दर्शक बसले होते.त्यांनी सहज विचारणा केली. आणि प्रपंच चित्रपटातून नायक म्हणून श्रीकांतजी चित्रपटात आले.पुढे नंदिनी, निवृत्ती ज्ञानदेव, शेवटचा मालुसरा, आम्ही जातो आमुच्या गावा, अनोळखी, दोन्ही घरचा पाहुणा, उंबरठा, सिंहासन, नवरी मिळे नव-याला, गंमत जंमत, वासुदेव बळवंत फडके, सावर रे अशा अनेक चित्रपटातील अभिनयाने श्रीकांतजींनी प्रेक्षकांना आपलसं केलं.
हे देखील वाचा: मराठी रंगभूमी, चित्रपट आणि मालिका या तिन्ही क्षेत्रात अतिशय सहजपणे वावरणाऱ्या श्रीकांत मोघे यांची कारकीर्द
टेलीव्हिजनच्या युगात या माध्यमाशी जुळवून घेत त्यांनी साकारलेल्या भूमिका चिरकाल स्मरणात राहील्या. स्वामी मधले राघोबा दादा, अवंतिका, अजून चांदरात आहे, उंच माझा झोका या सगळ्या मालिकांतून छोट्या पडद्यावर देखील त्यांनी स्वतःचं स्थान निर्माण केलं.
सांगली इथं २०१२ मध्ये झालेल्या नाट्यसंमेलनाचं अध्यक्षपद, महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक पुरस्कार, केशवराव दाते स्मृती पुरस्कार, ग.दि.माडगुळकर पुरस्कार, प्रभाकर पणशीकर स्मृती जीवनगौरव पुरस्कार, झी मराठी जीवनगौरव असे अनेक सन्मान त्यांच्या वाट्याला आले.
अतिशय उमदं देखणं व्यक्तीमत्व असूनही प्रेक्षकांना आपल्या खेळकर अभिनयाने आपलसं करणारा हा कलाकार आज आयुष्याच्या रंगमंचावरून एक्झीट घेऊन गेला तरी मनाच्या पडद्यावर आपल्या भूमिकांनी सदैव जिवंत राहील. कलाकृती परीवाराकडून श्रीकांतजींना भावपूर्ण श्रद्धांजली.