‘आई तुळजाभवानी’च्या पौराणिक गाथेत उलगडणार एक नवा अध्याय; चिंतामणी पाषाणाचा
विजय थलापतीचा “मास्टर” ओटीटीवर…..
साऊथस्टार विजय थलापतीचा (Vijay Thalapathy) मास्टर हा चित्रपट लवकरच घरबसल्या बघता येणार आहे. मास्टर पोंगलच्या मुहूर्तावर चित्रपट गृहात प्रदर्शित झाला. अनेक दिवस प्रतीक्षेत असलेल्या विजयच्या चाहत्यांनी या चित्रपटला अक्षरशः डोक्यावर घेतलं. कोरोनाकाळानंतर चित्रपट गृहात करोडोंची कमाई करणारा चित्रपट म्हणून मास्टरची नोंद झाली.
साऊथस्टाईल जबरदस्त दे मार असलेल्या या मास्टरचा हिंदी डबही दुस-याच दिवशी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. अजूनही चित्रपटगृहात मास्टर बघण्यासाठी मोठी गर्दी होत आहे. असे असले तरी या चित्रपटाच्या निर्मात्यांनी 29 जानेवारीला हा चित्रपट ॲमेझॉन प्राईम या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्याचे जाहीर केले आहे. विजय थलापतीचा नवीन चित्रपट थेट घरी बसून बघता येणार असल्यामुळे त्याच्या चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. त्यामुळे मास्टर चित्रपट ओटीटीवरही विक्रमी ओपनिंग देईल अशी चर्चा आहे.
हे नक्की वाचा: विजय थलापतीची विजयी गाथा…
याशिवाय कबीर सिंग चित्रपटाचे निर्माते मुराद खेतानी यांनी मास्टरचे हक्क विकत घेतले आहेत. मास्टर चित्रपट प्रदर्शित होऊन महिनाही झाला नसला तरी हा चित्रपट कमाईच्या बाबत खूप मोठे विक्रम करत आहे. चित्रपट मोठ्या पडद्यावर सुपरहीट असतांना ओटीटी माध्यमावर प्रदर्शित करण्याचे धाडसही निर्मात्यांनी दाखवले आहे. चित्रपट क्षेत्रात या नवीन ट्रेंडबाबत मोठी उत्सुकता आहे.
13 जानेवारी रोजी पोंगलच्या मुहूर्तावर मास्टर प्रदर्शित झाला. 14 जानेवारी रोजी हिंदी डब केलेला मास्टर प्रदर्शित झाला. पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफीसवर मास्टरनं 35.50 करोड रुपयांचे कलेक्शन केले. तीन दिवसातच या चित्रपटानं 100 करोडचा टप्पा पार पाडला. आत्तापर्यंत जगभरात 220 करोड रुपयांचे रेकॉर्डतोड कलेक्शन या चित्रपटानं केलं आहे. न्युझिलंड, ऑस्ट्रेलिया सारख्या देशात अद्यापही हा चित्रपट हाऊसफूल लेबलखाली चालू आहे.
तामिळ स्टार विजय याचा मोठा चाहता वर्ग आहे. त्याच्या चाहत्यांनी मास्टर रिलीज होण्यापूर्वी मास्टर चित्रपटाच्या पोस्टरना दूध काय पण दारुनंही आंघोळ घातली होती. मास्टरमध्ये विजयसह विजय सेतुपती आणि मालविका मोहनन यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन लोकेश कनगराजने केले आहे. आता चित्रपटाचे हक्क मुराद खेतानी यांनी घेतल्यामुळे हिंदीमधील रिमेकसाठी बॉलिवूडमधील कोणत्या दोन स्टारची निवड होतेय याकडे लक्ष लागले आहे.
मास्टर ही एका प्रोफेसरची स्टोरी आहे. प्रोफेसर जॉन दुराईराज हा दारुच्या आहारी गेलेला आहे. तरीही जॉन त्याच्या विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय आहे. या जॉनच्या व्यसनामुळे त्याची नियुक्ती दुस-या ठिकाणी होते. तिथे भवानीचे राज्य आहे. जॉन आणि भवानी यांच्यातील वाद कुठल्या टप्प्यावर पोहचतो…
दारुच्या आहारी गेलेला जॉन स्वतःला सुधारुन विद्यार्थ्यांना कसा सुधारतो आणि भवानीसोबत कसा लढतो हे बघण्यासाठी मास्टर नक्की पहावा असाच आहे. दे मार असलेल्या मास्टरमधील फाईट सीन जबरदस्त आहेत. चित्रपटाला अनिरुद्ध रविचंदर यांनी सांगितलं आहे. आत्तापर्यंत मास्टर देशभरात 3800 ठिकाणी प्रदर्शित झाला आहे. आता 29 रोजी ओटीटी माध्यमावर मास्टरला किती मोठी ओपनींग मिळते याकडे लक्ष लागले आहे.