दिग्दर्शक सुभाष घई आणि गीतकार आनंद बक्षी यांचे जबरदस्त ट्युनिंग!
वरुन कडक शिस्तीचा वाटणा-या या माणसात एक हळवं मूलही होतं…..
खर्जातला दमदार आवाज, संवाद फेकीची जबरदस्त लकब आणि आपल्या केवळ अस्तित्वाने आसमंत भारून टाकणारं वादळी व्यक्तिमत्त्व म्हणजे विनय आपटे. रंगभूमी, चित्रपट, टेलिव्हिजन या तिन्ही क्षेत्रात सहजपणे वावरलेल्या ह्या अफाट व्यक्तिमत्वाचा आज वाढदिवस.
या जगातून एक्झीट घेतल्यावरही असे फार कमी कलाकार आहेत जे आठवत रहातात. विनय आपटे हे त्यापैकी एक. अभिनेता, नाट्य दिग्दर्शक, नाट्यनिर्माता म्हणून त्यांची कारकीर्द कायम लक्षात राहील अशीच आहे. अफलातून, अभिनेत्री, कुसुम मनोहर लेले, मित्राची गोष्ट, कबड्डी कबड्डी आणि सगळ्यात वादळी ठरलेलं मी नथुराम गोडसे बोलतोय त्यांच्या या आणि अशा अनेक नाटकांनी मराठी रंगभूमीला समृद्ध केलं. ‘नाट्यगुरु’ अशी बिरुदावली न मिरवताही अनेक गुणी कलावंतांना पैलू पाडण्याचं काम त्यांनी खुबीने केलं.
आर्मीसाठी सिलेक्शन झालं असताना कलाक्षेत्राकडे अपघाताने वळलेला हा अवलिया इथे केवळ रमलाच नाही तर आपलं सर्वोत्तम योगदान देऊन गेला. अनेक कलावंतांची कारकीर्द त्यांच्यामुळे घडली.
‘मी नथुराम गोडसे बोलतोय’ सारखं नाटक रंगभूमीवर आणणं प्रचंड धाडसाचं होतं. त्यातल्या कलाकारांची निवड जरा देखील फसली असती तर नाटक आपटलं असतं. सगळे नवखे कलाकार होते. वास्तविक अभिनेता शरद पोंक्षे पोलीसाच्या भूमिकेसाठी वाचन करायला आले होते. पण त्यांच्यातील गुणवत्ता हेरुन त्यांना आवर्जून नथुरामचा भाग विनय आपटे यांनी वाचायला दिला आणि त्यानंतर ही ऐतिहासिक भूमिका शरद पोंक्षे यांनी साकारली. पुढचा इतिहास आपण जाणतोच. अनेक वेळा या नाटकातील कलाकार आणि दिग्दर्शक म्हणून विनय आपटे यांच्यावर हल्ले झाले पण हे नाटक थांबलं नाही. कलाकारांवर विलक्षण विश्वास दाखवणारा हा दिग्दर्शक होता. नाटकाच्या तालमीत सतत लुडबुड करण्यापेक्षा एखादा भाग बसवून झाल्यावर त्याची तालीम ते कलाकारांना करायला सांगायचे आणि सहज बाहेर फेरी मारुन एखाद काम आटपून यायचे. आपण बसवून दिलेला भाग कलाकार सांगितला तसाच करणार हा विश्वास त्यांना होता. परत आल्यावर झालेला भाग पाहून पुढची तालीम सुरू व्हायची. हा विश्वास कलाकारांसाठी अतिशय महत्त्वाचा असतो.
‘अरुणाची गोष्ट’ नाटक करताना चिन्मयी सुमित यांना इतकी महत्त्वपूर्ण भूमिका करण्याचं दडपण वाटत होतं. पण विनय आपटे दिग्दर्शक म्हणून ठाम होते. मी ही भूमिका तुला काही विचार करुन दिलीय तर तू ती उत्तम करणारच असं त्यांनी आत्मविश्वासाने चिन्मयी सुमित यांना सांगितलं.
वरुन कडक शिस्तीचा वाटणा-या या माणसात एक हळवं मूलही होतं. कबड्डी कबड्डी नाटकात अभिनेत्री मुक्ता बर्वे हिच्या तोंडचा एक संवाद विनय यांना विशिष्ट पद्धतीने हवा होता. तो तसा म्हणण्याविषयी त्यांनी मुक्ताला सांगितलं. मुक्ताने ते मान्यही केलं आणि प्रत्यक्ष नाटकात आपण तो बदल करू असं सांगितल्यावर विनय स्वत: विंगेत तो संवाद ऐकायला उभे राहिले आणि मुक्ताने तो संवाद त्यांना हवा अगदी तसा म्हटल्यावर एखाद्या लहान मुलाच्या उत्साहाने ते आनंदी झाले.
अनेक नवोदित कलाकारांच्या पालकांना आपला मुलगा वा मुलगी या क्षेत्रात काही बरं करताहेत का हे जाणून घेण्यासाठी विनय आपटे हे हक्काचं आणि खात्रीचं ठिकाण वाटायचं. या क्षेत्रात अगदी नवे असताना अभिनेता सुनील बर्वे यांनी विनय आपटेंच्या ‘अफलातून’ नाटकात काम केलं होतं. आपल्या मुलाचं बरं चाललंय ना ह्या काळजीत असणा-या सुनील यांच्या बाबांनी विनय आपटे यांना फोन करुन चौकशी केली. तेव्हा विनय आपटेनी त्यांना धीर देताना म्हटलं, “तो माझ्यासोबत उत्तम आहे. आता फक्त माझ्या रेशनकार्डवर त्याचं नाव यायचं बाकीय”. आपला मुलगा वा मुलगी कलाक्षेत्रात विनय आपटेंसोबत आहे म्हणजे चिंता नाही हा निर्माण झालेला विश्वास विनय आपटे या व्यक्तीमत्वाबद्दल खूप काही सांगून जातो. अशी अनेक कलाकार मंडळी विनय यांच्या रेशनकार्डवर होती.
स्वत: एक उत्तम कलाकार असणं आणि दुस-या कलाकारातील सर्वोत्तम ते बाहेर काढून त्याला कलाकार म्हणून घडवणं या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. विनय आपटे या दोन्ही बाबतीत आदर्श ठरावेत.
अशा कलाकारांना पुन्हा पुन्हा आठवलं जातं आणि त्यामुळे ते आपल्यात नसले तरी आपल्यात रहातात. विनय आपटे नावाच्या अवलिया सारखे!
रश्मी वारंग