अवधूत गुप्ते यांनी ज्ञानेश्वर मेश्राम यांना काय वचन दिलं ?
एखादे गीत जसे संगीतकाराच्या किंवा गीतकाराच्या जीवनात यशाचं वेगळं वळण घेऊन येतं, तसेच एखादे गीत एखाद्या गायकाचेही नशीब घडवू शकते. जेव्हा ‘झेंडा’ चित्रपटाच्या शीर्षकगीताचा किस्सा समजेल, तेव्हा हे नक्कीच कळेल.
‘सा रे ग म प’ या झी मराठीवरील २००६-०७ मधील पर्वातून आपल्या लक्षात राहणारा गायक म्हणजे आळंदीचा ज्ञानेश्वर मेश्राम. आळंदीच्या वातावरणातील संस्कारातून घडलेले ज्ञानेश्वर मेश्राम आपल्या चांगलेच लक्षात राहतात. एकदा त्यांनी ‘सोनियाचा दिवस आजी अमृते पाहिला’ ही रचना ‘सा रे ग म प’ मध्ये सादर केलं होतं. परीक्षक असणाऱ्या सुप्रसिद्ध गायिका देवकी पंडित आणि सुप्रसिद्ध गायक, संगीतकार अवधूत गुप्ते यांनी मेश्राम यांचे खूप कौतुक केलं होतं. अवधूत गुप्ते यांनी ज्ञानेश्वर मेश्राम यांना मिठी मारली आणि त्यांना वचन दिलं, “मी यांच्यासाठी नक्कीच काहीतरी काम करणार.”
२०१० सालची गोष्ट असेल. एक दिवस ज्ञानेश्वर मेश्राम यांना फोन आला आणि तो फोन होता गायक, संगीतकार, दिग्दर्शक, निर्माता अवधूत गुप्ते यांचा. ते म्हणाले की ते ‘झेंडा’ नावाचा एक चित्रपट करत आहे आणि त्याचे शीर्षकगीत मेश्राम यांनाच गायचे आहे. अवधूतने गाण्याचं स्क्रॅच रेकॉर्डिंग करून पाठवलं. जेव्हा अवधूतचा फोन आला, तेव्हा प्रथम ज्ञानेश्वर मेश्राम यांचा विश्वासच बसला नव्हता. कारण मध्ये काही वर्षांचा काळ गेला होता. ज्ञानेश्वर मुंबईत आले, स्टुडिओत गेले. पण त्या आधुनिक स्टुडिओत सुरुवातीला मेश्राम थोडेसे गोंधळून गेले. त्या सगळ्या अत्याधुनिक यंत्र सामुग्री सोबत गीत गाणे त्यांना जमत नव्हते. थोडे रिटेक झाले आणि मेश्राम अवधूतना म्हणाले, “मला नाही जमणार हे.” त्यावेळी अवधूत गुप्ते ज्ञानेश्वर मेश्राम यांना म्हणाले, “विठ्ठला, कोणता झेंडा घेऊ हाती? हे गीत तुमच्यासाठीच जन्माला आले आहे आणि माऊली, ते तुम्हालाच गायचे आहे. विठ्ठलाला साद घालणारा तो आर्ततेचा आवाज, तो पवित्र आवाज हा आळंदीच्या मातीतील संस्कार झालेल्या ज्ञानेश्वर मेश्राम अर्थात तुमचा आहे.” अवधूत गुप्ते यांनी दाखवलेला हा विश्वास मेश्राम यांच्यासाठी खूप महत्वाचा होता. ज्ञानेश्वर माईकसमोर उभे राहिले. त्यांनी डोळे बंद केले, विठ्ठलाचे रूप डोळ्यांसमोर आणले, पांडुरंगाचे स्मरण केले आणि मग गाणे रेकॉर्ड झाले. तो दिवस सुद्धा एकादशीचा होता, हा एक महत्वाचा योगायोग ठरला.
ते शब्द अरविंद जगताप यांचे होते, तर संगीत अर्थातच अवधूत गुप्ते यांचे होते.
“जगण्याच्या वारीत, मिळेना वाट ही, साचले मोहाचे धुके घनदाट;
आपली माणसं, आपलीच नाती, तरी कळपाची मेंढरास भीती;
विठ्ठला…. कोणता झेंडा घेऊ हाती ?”
हे शीर्षकगीत तुफान गाजले. अवधूत गुप्ते यांनी ज्ञानेश्वर मेश्राम यांना दिलेले वचन पाळले होते. या गीतासाठी सर्वोत्कृष्ट गायकाचा म टा सन्मान, तसेच महाराष्ट्र राज्य शासनाचा पुरस्कार आणि इंटरनॅशनल इंडियन म्युझिक अवॉर्ड असे अनेक पुरस्कार ज्ञानेश्वर मेश्राम यांना मिळाले. झी गौरव साठी सुद्धा त्यांना या गीतासाठी नामांकन मिळाले होते. या गाण्यामुळे आळंदीचे ज्ञानेश्वर मेश्राम यांना ठिकठिकाणी गायनासाठी आमंत्रणे आली. या गाण्याने त्यांना इतके यश दिले, की त्यांचे नवीन घर सुद्धा याच गाण्यामुळे आणि पांडुरंगाच्या कृपेमुळे साकार झाले.