Jaran Marathi Movie Motion Picture: विवाहिता आणि बाहुली, काय आहे

या विविधतेच ‘राज’ काय?
दिग्दर्शक एकच. पण थीममध्ये विविधता. क्राईम (सी. आय डी, काला पानी, शरीफ बदमाश), सस्पेन्स थ्रीलर (मेरा साया, वो कौन थी), सामाजिक (सोलवा साल, बम्बई का बाबू), गूढ (अनिता), कौटुंबिक नाट्य (दो रास्ते), डाकूपट (मेरा गाव मेरा देश, कच्चे धागे), प्रेम त्रिकोण (प्रेम कहानी), नाट्यमय (मै तुलसी तेरे आंगन की), ॲक्शनपॅक्ड (नेहले पे देहला, दोस्ताना) वगैरे अनेक चित्रपट आणि हे सगळे पडद्यावर साकारणारा दिग्दर्शक एकच, तो म्हणजे राज खोसला. (जन्म ३१ मे १९२५. लुथियाना, पंजाब) आणि याच पायर्यांवर त्यांच्याकडे सहाय्यक दिग्दर्शक असलेले प्रमोद चक्रवर्ती, बप्पी सोनी कालांतराने स्वतंत्र दिग्दर्शक म्हणून कार्यरत झाले. एकाद्याचे प्रगती पुस्तक अनेक गुणांनी भरलेले असावे तर हे असे. याचा अर्थ त्यांना लाल मार्क पडलाच नाही असे अजिबात नाही. (Themes Variety)
‘चिराग’ फसला म्हणून पब्लिकने नाकारला. यानंतरच्या निर्माते प्रेमजी यांच्या कार्यालयातील मिटींगमध्ये अपयशाची स्थिती बघून आपल्या मानधनातील अर्धा वाटा सुनील दत्तने परत केला (हा फक्त किस्सा नाही, असे जंटलमन चित्रपटसृष्टीत होते), राज खोसलाने या फ्लाॅपमधून बाहेर पडण्यासाठी अल्पावधीत एक चित्रपट करायचे ठरवले. राजेश खन्ना अजून स्टार झाला नव्हता आणि मुमताजने ज्युनियर डान्सरपासून सहनायिका, नायिका असा प्रवास सुरु केला होता. प्रेम चोप्राला मोठा ब्रेक हवा होता, बिंदूचीही हीच गरज होती. राज खोसलानी यांना घेऊन बनवलेला ‘दो रास्ते’ सुपर हिट ठरल्यावर ते पुन्हा फाॅर्मात आले. कालांतराने त्यांचे दो प्रेमी, दासी, तेरी मांग सितारो से भर दू, मांटी मांगे खून, सनी, मेरा दोस्त मेरा दुश्मन, नकाब हे सगळेच चित्रपट फ्लाॅप. राज खोसलासारख्या कल्पक दिग्दर्शकाचा फाॅर्म असा अचानक जावा? चित्रपटाच्या जगात काहीही घडू शकते हेच खरे.(Themes Variety)

‘नकाब ‘साठी त्यांनी विनोद खन्नाला निवडला आणि मेहबूब स्टुडिओतील सेटवर शूटिंग रिपोर्टींगसाठी आम्हा सिनेपत्रकारांना आमंत्रित केले. विनोद खन्नाची ही सेकंड इनिंग होती आणि त्याने अनेक चित्रपट साईन केले. आता धावपळ होतेय म्हणून काही चित्रपट सोडलेही. त्यात ‘नकाब’ सोडल्याने ऋषि कपूर आला. मग फराहच्या बेभरंवशाच्या वागण्याचे किस्से गाजले. चित्रपट पूर्ण होताच पाली हिलवरील राज खोसलांच्या घरी जाऊन अगदी सविस्तर मुलाखत घेतली. लहानपणापासून आपण ज्यांचे चित्रपट कुठे गल्लीत, कुठे सिंगल स्क्रीन थिएटर्समध्ये, कधी मॅटीनी शोला, कधी दूरदर्शनवर पिक्चर एन्जाॅय केले अशा दिग्दर्शकाशी संवाद करताना त्यांच्या चित्रपटांच्या थीममधील विविधता आणि गाण्यांचे अप्रतिम टेकिंग यावर बरीच माहिती मिळाली. आपल्याला खरं तर गायकच बनायचे होते. त्यानुसार शिक्षणही घेतले. पण तशी संधी मिळाली नाही. देव आनंदशी भेट झाल्याने गुरुदत्त यांच्याकडे सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम सुरु केले आणि मग गुरुदत्त फिल्म्सच्या ‘मिलाप’ (१९५५) पासून स्वतंत्रपणे दिग्दर्शन सुरु केल्यावर गीत संगीत व नृत्य याला कायमच पसंदी दिली असे अतिशय मोकळेपणाने राज खोसला यांनी सांगितले.(Themes Variety)
गाण्यांच्या टेकिंगसाठी त्यांचे अनेक चित्रपट मी पुन्हा पुन्हा पाहिल्याचे सांगताच ते खुलले. हम बेखुदी मे तुमको, अच्छा जी मै हारी, नजर ना लागे (काला पानी), साथी ना कोई मंझिल, दीवाना मस्ताना हुआ दिल, देखने मे भोला है ( बम्बई का बाबू), लग जा गले फिरसे, जो हमने दास्ता अपनी सुनाई, नैना बरसे रिमझिम रिमझिम, शोख नजर की बिजलीया ( वह कौन थी), आप के पहलू मे आकर, नैनो मे बदरा छाये, तू जहा जहा चलेगा (मेरा साया), तुम बिन जीवन कैसे बिता (अनिता), तेरी ऑखे के सिवा (चिराग), यह रेश्मी झुल्फे, बिंदीया चमकेगी, खिजा के फूल (दो रास्ते), मार दिया जाए, (मेरा गाव मेरा देश), प्रेम कहानी मे एक लडका होता है, फूल आहिस्ता फेको, चल दरिया मे डूब जाए (प्रेम कहानी). गीत संगीताचा जबरदस्त खजिना.(Themes Variety)
=======
हे देखील वाचा : यह जीवन है, इस जीवन का…
=======
प्रत्येक गाण्याचे रुपेरी पडद्यावरील सादरीकरण डोळ्यासमोर येते हे राज खोसलांचे मोठेच यश. पटकथेला पुढे नेणारी अशी गाण्याची जागा ही राज खोसला यांची खासियत. ग. रा. कामत हे त्यांचे हुकमी पटकथाकार. ‘दोस्ताना’ सलिम जावेद लिखित होता. तर दो रास्ते आणि मै तुलसी तेरे आंगन की हे चित्रपट चंद्रकांत काकोडकर यांच्या मराठीतील कादंबरीवर आधारीत. त्यामुळेच कथानाट्य अस्सल व प्रभावी. कालांतराने राज खोसला यांचे सगळेच गणित बिघडले तरी ‘सनी’मधील गाण्यात खोसला टच दिसला. ‘जाने क्या बात है’ असा गाण्याचा मुखडा परफेक्ट ठरला.
अशा राज खोसला यांच्या निधनाचे वृत्त (९ जून १९९१) पीटीआयने दिले तेव्हा मी नवशक्तीच्या कार्यालयात होतो आणि संपूर्ण मुंबई, ठाणे जिल्ह्यात अक्षरश: मुसळधार पाऊस पडत होता. आणि त्याच्या बातम्यांना बरीच स्पेस मिळणार हे स्पष्ट होते. पण राज खोसलाचे चित्रपटसृष्टीसाठीचे काॅन्ट्रीब्यूशन पाहता ही पहिल्या पानावरची बातमी होती. राज खोसला म्हणताच त्यांच्या दिग्दर्शनातील विविधता आणि लोकप्रिय गाणी आठवायला हवीतच.