Prajakta Mali मुंबई सोडून चालली? अभिनेत्रीच्या पोस्टने चाहत्यांना बसला धक्का !

Rajesh Khanna यांच्या सुपरस्टारडम काळात त्यांचा सिनेमा फ्लॉप करण्याचे कुटील कारस्थान कोणी रचले?
सत्तरच्या दशकाच्या सुरुवातीला जेव्हा सुपरस्टार राजेश खन्ना यांचा स्टारडम अगदी पीक वर होता. त्याचा हर एक सिनेमा त्या काळात बॉक्स ऑफिस वर चमत्कार करत होता. राजेश खन्ना आणि धवल यश हे दोन समानार्थी शब्द बनले होते.पण त्या काळात त्यांच्या एका चित्रपटाला फ्लॉप करण्याचा प्रयत्न एका मोठ्या अभिनेत्याकडून झाला होता. त्यामुळे राजेश खन्नाच्या इतर चित्रपटांप्रमाणे फर्स्ट रनला हा चित्रपट तितका चालला नाही! चक्क एव्हरेज हिट म्हणून त्याची नोंद झाली. पण नंतर चित्रपटातील संगीत आणि गाण्यांमुळे हा चित्रपट धो धो चालला हा भाग वेगळा. परंतु राजेश खन्नाच्या वाढत्या लोकप्रियतेला अतिशय वाईट पद्धतीने नख लावण्याचे काम या अभिनेत्याकडून झालं होतं हे नक्की. आणि या सर्व प्रकरणाचा भांडाफोड त्या सिनेमाच्या निर्मात्याने आपल्या पुस्तकात केला आहे! कोण होता तो अभिनेता आणि नेमकं त्याने काय केलं होतं ज्यामुळे हा चित्रपट सुरुवातीला एव्हरेज हिट म्हणून घोषित करण्यात आला?

राजेश खन्नाचा झंजावात 1969 सालच्या ‘आराधना’ पासून सुरू झाला त्यानंतर पुढची तीन वर्ष राजेश खन्नाने सलग सतरा सुपरहिट सिनेमांची रांग उभी केली. हा विक्रम आज देखील बाधित आहे. त्या काळात राजेश खन्ना म्हणजे यशाचे दुसरे नाव असं समजलं जातं असे. ‘उपर आका और नीचे काका’ असं त्या काळात कौतुकाने म्हटलं जायचं. १९७१ साली राजेश खन्नाचा ‘हाथी मेरे साथी’ हा चित्रपट प्रचंड लोकप्रिय झाला होता. यानंतर अभिनेत्री तनुजा सोबतच त्याने दुसरा एक चित्रपट साइन केला. हा चित्रपट होता ‘मेरे जीवन साथी’ या सिनेमाचे दिग्दर्शन रवी नगाईच करणार होते. (त्यांनीच राजेश खन्नाचा ‘द ट्रेन’ हा चित्रपट दिग्दर्शित केला होता.) या सिनेमाचे निर्माते होते हरीश शहा आणि विनोद शाह.

राजेश खन्नाच्या चित्रपटाला हवा असलेला संपूर्ण मसाला या चित्रपटात ठासून भरला होता. चित्रपटाची गाणी मजरूह सुलतानपुरी यांनी लिहिली होती तर संगीत आर डी बर्मन यांचे होते. यात किशोर कुमारची पाच सोलो गाणी होती. चला जाता हूँ किसी की धून में, ओ मेरे दिल की चैन, दिवाना लेके आया है दिल का करार, कितने सपने कितने अरमान ,आओ कहानी मेरे धाम… एक लता सोबत युगलगीत होतं ‘दिवाना करके छोडोगे लगता है’..एक आशा भोसलेच्या आवाजातील एक फडकतो गाणं होतं ‘आओ ना गले लगाओ ना…’, आर डी बर्मन यांनी देखील एक गाणं होते!

राजेश खन्नाच्या प्रेक्षकांना आवडणाऱ्या सर्व लकबी, त्याची गातानाची स्टाईल, त्याची त्या काळातील सर्व आयुध खचाखच या सिनेमात भरली होती. सिनेमा हिट होणार याची सर्वांना खात्री होती. राजेश आपल्या प्रोजेक्ट वर खूष होता. पण त्याच वेळी दुसरीकडे हा सिनेमा फ्लॉप व्हावा व्हावा याचं व्यवस्थित कुटील कारस्थान रचलं जात होतं. हा चित्रपट पूर्ण झाला आणि 22 सप्टेंबर 1972 या दिवशी हा सिनेमा प्रदर्शित होणार होता. त्याच दिवशी मनोज कुमार यांचा ‘शोर’ हा चित्रपट देखील प्रदर्शित होणार होता. मनोज कुमार यांनी चित्रपटाची निर्माते हरिश शहा यांना भेटून, ”तुमच्या चित्रपटाचे प्रदर्शन एक आठवडा उशिरा ठेवा.” अशी विनंती केली.
मनोज कुमार राजेश खन्नाच्या स्टारडमला पुरतं ओळखून होता. राजेशच्या सिनेमाची काय हवा असते त्याला माहित होत. तो कुठलीही रिस्क घ्यायला तयार नव्हता. ‘मेरे जीवन साथी’ या चित्रपटातील गाणी जी किशोर कुमारने गायली होती आधीच लोकप्रिय झाली होती. त्यामुळे या सिनेमाला जर आपल्या ‘शोर’ सिनेमा सोबत रिलीज केलं तर ‘शोर’ हा सिनेमा सुपरफ्लॉप होईल याची त्याला जाणीव होती. म्हणून त्याने ‘मेरे जीवन साथी’ या चित्रपटाचे निर्माते हरीश शहा यांची भेट घेऊन त्यांना विनंती केली. व्यावसायिक स्पर्धेत दोन्ही सिनेमाचे नुकसान नको साळसूद पर्याय ठेवला.

हरीश शहा यांना त्यात काही वावगं वाटलं नाही. त्यांनी त्यांच्या डिस्ट्रीब्यूटरची चर्चा केली आणि चित्रपटाचे प्रदर्शन 22 सप्टेंबर 1972 च्या ऐवजी 29 सप्टेंबर 1972 या दिवशी ठेवले. सप्टेबर शोर 22 तारखेला प्रदर्शित झाला. यानंतर एक आठवड्याने मुंबईतील प्रतिष्ठित अप्सरा थिएटरमध्ये 29 सप्टेंबर 1972 या दिवशी मेरे जीवन साथी या प्रदर्शित झाला. पुढच्या आठवड्यात जेव्हा हरिश शहा आपल्या सिनेमातला प्रेक्षक कसा रिस्पॉन्स देतात हे पाहण्यासाठी थेटर गेल्यानंतर त्यांना धक्काच बसला. कारण सिनेमाची सर्व तिकीट विकली गेली होती पण थिएटरमध्ये फार कमी लोक उपस्थित होते.
ब्लॅक मार्केटमध्ये देखील सिनेमाची तिकिटे विकली जात नव्हती. याचा अर्थ कुणीतरी तिकीट विकत घेत होतं आणि फाडून टाकत होतं! आणि सिनेमा फ्लॉप झाला अशी आवई त्या काळात उठली होती. हरीश शहा यांना आश्चर्य वाटले त्यांनी थोडीशी चौकशी केल्यानंतर आणि तिथल्या काही लोकांशी बोलल्यावर असे लक्षात आले की सिनेमाच्या दुनियेतील एक मोठी असामी त्यांना हे काम करण्यासाठी पैसे देऊन हे काम करून घेत आहे! हरीश शहा यांना हा दस नंबरी कलाकार कोण आहे हे लक्षात आलं पण काही करता येत नव्हतं. पहिले एक दोन आठवडे हा सिनेमा असाच चालला पण त्यानंतर या सिनेमाच्या गाण्यांनी रेडिओवर प्रचंड लोकप्रियता मिळवल्यामुळे हळूहळू लोक थिएटरकडे येऊ लागले आणि सिनेमा हिट होऊ लागला.
================================
हे देखील वाचा : Amol Palekar यांनी राजेश खन्ना यांना नरभक्षक अभिनेता का म्हटलं?
=================================
राजेश खन्नाचे त्या काळातले चित्रपट किमान सिल्वर ज्युबिली तरी होत असत पण ‘मेरे जीवन साथी’ पहिला रनला अवघ्या बारा आठवड्यानंतर थेटर मधून उतरवावा लागला! हा सर्व किस्सा चित्रपटाचे निर्माते हरीश शहा यांनी त्यांच्या पुस्तकांमध्ये ज्या पुस्तकाचं नाव आहे TRYST WITH FILMS मध्ये विस्ताराने लिहिला आहे. जेव्हा निर्माता स्वतः लिखित स्वरूपात काही डॉक्युमेंट देतो तेव्हा त्यावर विश्वास ठेवावा लागतो. अर्थात पहिल्या रनला जरी ‘मेरे जीवन साथी’ सो कॉल्ड फ्लॉप झाला असला तरी नंतर मात्र या सिनेमाची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत गेली. पुढचे पंधरा वर्षे हा सिनेमा दरवर्षी पुन्हा नव्याने रिलीज होत होता आणि कॉलेज तरुण या सिनेमाला प्रचंड गर्दी करत होते. ‘चला जाता हू किसी की धुन मे, ओ मेरे दील के चैन…’ ही किशोर कुमारची गाणी चित्रपटाला यशस्वी करण्यासाठी कारणीभूत ठरली. आज इतक्या पन्नास वर्षानंतर लक्षात येते ‘शोर’ केवळ एका गाण्यासाठी आठवला जातो पण ‘मेरे जीवन साथी’ आजही आवडीने पहिला जातो!