जेव्हा अभिनेत्री ‘नर्गिस’वर आला होता चोरीचा आरोप!
कधीकधी माणसाच्या हातून झालेली छोटीशी चूकही मोठ्या संकटाला आमंत्रित करते. अशा अनावधानाने झालेल्या चूकीपासून सेलिब्रिटिजना तर खूपच त्रास होतो. तसं बघायला गेलं तर, लाईम लाईट मधील व्यक्तींचे जीवन कधी वैयक्तिक रहातच नाही. त्यामुळे त्यांना आयुष्य जगताना डोळ्यात तेल घालून राहावं लागतं कारण प्रश्न ‘इमेजचा’ असतो. पण तरीही कधी कळत नकळतपणे अशा चुका घडतातच.
अशीच एक चूक अभिनेत्री नर्गिस हिच्याकडून झाली होती. ती सुध्दा आपल्या देशात नाही, तर परदेशात! पण त्यावेळी भारतीय वकीलातीतील राजदूतांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने मोठ्या संकटातून नर्गिस वाचली होती.
हा किस्सा साठच्या दशकातील आहे. त्यावेळी अभिनेत्री नर्गिस लंडनला गेली होती. तिथे शॉपिंगसाठी ती एका डिपार्टमेंटल स्टोअर मध्ये गेली. सर्व खरेदी झाली. बिल देखील चुकते झाले आणि ती सर्व सामान घेऊन बाहेर पडली. गाडीत बसताना तिच्या असे लक्षात आले की, आपण सॉक्स घ्यायचे विसरलो आहोत.
ती पुन्हा डिपार्टमेंटल स्टोअर मध्ये गेली आणि सॉक्स घेतले. तिला वाटले या सॉक्सचे पैसे आपण यापूर्वीच दिले आहेत आणि बिनधास्तपणे ती स्टोअर मधून बाहेर पडू लागली. सिक्युरिटीने तिची तपासणी केली असता, असे लक्षात आले की, तिने सॉक्सचे बिल दिले नव्हते.
याचाच दुसरा अर्थ म्हणजे नर्गिस चक्क ते सॉक्स चोरून डिपार्टमेंटल स्टोअर मधून बाहेर चालली होती! सिक्युरिटीजने ताबडतोब पोलिसांना पाचारण केले. नर्गिस प्रचंड घाबरली होती आणि तिने भीत भीत अनावधाने चूक झाली, असे सांगितले. पण इंग्लंडमधील कायदे खूप कडक! पोलिसांनी सांगितले “तुम्हाला उद्या कोर्टामध्ये येऊन चूक कबूल करावी लागेल आणि दंड भरावा लागेल.”
नर्गिस प्रचंड घाबरली होती. तिचं सिनेमातील करियर त्यावेळी बहरात होतं. जर ही बातमी इंग्लंड मधील मीडियामध्ये आली तर ती लगेच भारतातील मीडियात देखील आली असती आणि तिची (नाहक) प्रचंड बदनामी होणार होती! यामुळे ती खूप घाबरली. ती चक्क रडकुंडीला आली.
====
हे ही वाचा: ‘मी वसंतराव’ पहिली झलक प्रेक्षकांच्या भेटीला…
====
खरं तर नर्गिसकडून अनावधानाने ही कृती घडली होती. पण आता मोठ्या संकटाला तिला सामोरं जावं लागणार होतं. बदनामीच्या भीतीने तिला रडायला यायला लागलं. तिने भारतीय वकिलातीतील अधिकारी के नटवर सिंग यांना फोन केला आणि सर्व परिस्थिती खरी खरी सांगितली.
नर्गिस यांचे भारतीय सिनेमातील स्थान, नेहरू घराण्याची तिचे असलेले त्यांचे संबंध या गोष्टी लक्षात घेऊन त्यांनी ब्रिटिश पोलिसातील आपल्या मित्रांना तत्काळ याबाबत सांगितले. पोलिसांनी नटवर सिंग यांना असे सांगितले “काळजी करू नका. उद्या फक्त कोर्टात जाऊन गुन्हा कबूल करा दंड भरुन सुटका करून घ्या” नर्गिस मात्र या प्रकारात आणखी खूप घाबरली होती. तिला वाटले कोर्टात आपल्या नावाचा उच्चार होणार मग बदनामी नक्की होणार !
नटवर सिंग यांनी तिचा पासपोर्ट मागून घेतला आणि सुटकेचा निश्वास सोडला कारण पासपोर्टवर तिचे नाव फातिमा रशीद असे होते. पासपोर्टवर नर्गिस नावाचा कुठेही उल्लेख नव्हता. त्यामुळे नटवर सिंग यांनी नर्गीसला सांगितले “उद्या तू साधे कपडे आणि डोळ्यावर काळा गॉगल घालून भारतीय स्त्रीप्रमाणे कोर्टात जा. तिथे गुन्हा कबूल करून टाक. तुझे पासपोर्टवर जे नाव आहे (फातिमा रशीद) तेच सांग आणि दंड भरून लगेच निघून ये.”
त्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी नर्गिसने कोर्टात गुन्हा कबूल केला आणि दंड भरून बाहेर पडली आणि मोठ्या संकटातून सहीसलामतरित्या बाहेर पडली. फातिमा रशीद म्हणजेच नर्गीस कुणाच्या लक्षात पण आले नाही.
====
हे ही वाचा: ‘द कश्मीर फाइल्स’चे निर्माते काश्मीर नरसंहाराच्या कहाणीला मोठ्या पडद्यावर आणण्यासाठी सज्ज!
====
पुढे हेच के नटवर सिंग सरकारी नोकरीतून स्वेच्छानिवृत्ती घेऊन राजकारणात आले आणि भारताचे परराष्ट्रमंत्री बनले. त्यांनी त्यांच्या राजकीय आणि प्रशासकीय कारकीर्दीवर तब्बल १३ पुस्तके लिहिली. त्यांनी १९९७ साली ‘Profiles & Letters या नावाचे एक पुस्तक लिहिले. या पुस्तकात त्यांनी हा प्रसंग नमूद करून ठेवला आहे.