
डॅनीने पहिलेच गीत गायले होते Lata Mangeshkar यांच्यासोबत!
बॉक्स ऑफिसवर फारश्या यशस्वी न झालेल्या सिनेमात देखील आपल्याला अनेक महत्त्वपूर्ण गोष्टींची नोंद झालेली दिसते. जी भारतीय सिनेमाच्या इतिहासासाठी गरजेचे असते. इतिहास हा जसा यशस्वी चित्रपटांचा असतो तसाच अयशस्वी सिनेमांचा देखील असतो. अशाच एका चांगल्या परंतु दुर्दैवाने बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झालेल्या सिनेमात काही विशेष उल्लेखनीय गोष्टी आहेत. हा चित्रपट २६ जानेवारी १९७३ रोजी रिलीज झाला होता. चित्रपटाचं नाव होतं ‘ये गुलिस्ता हमारा’ .देवआनंद, शर्मिला टागोर, प्राण यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट गुरुदत्त फिल्म्स या चित्रपट संस्थेद्वारे बनवला होता. या सिनेमाचे दिग्दर्शन गुरुदत्त यांचे बंधू आत्माराम यांनी केलं होतं. या चित्रपटाच्या निमित्ताने अनेक गोष्टी जुळून आल्या होत्या.

काही काही गोष्टी तर फक्त याच सिनेमासाठी जुळून आलेल्या दिसतात. संगीतकार सचिन देव बर्मन आणि संगीतकार आर डी बर्मन या दोघांनी एकत्र गायलेलं एकमेव गीत या चित्रपटात होतं. हा खूप दुर्मिळ योगायोग आहे. सी.आय.डी (१९५६) नंतर प्रथमच गुरुदत्त फिल्म्समध्ये देव काम करत होता. या सिनेमाची गाणी आनंद बक्षी यांनी लिहिली होती तर संगीत सचिन देव बर्मन यांचे होते. गुरुदत्त यांच्या पश्चात सचिन देव बर्मन यांनी या चित्रपटाला संगीत दिले होते. यापूर्वी ‘कागज के फूल’ (१९५९) या चित्रपटाला त्यांचे संगीत होते. देव आनंद आणि शर्मिला टागोर यांचा हा पहिलाच आणि एकमेव चित्रपट होता. चित्रपटाचे कथानक थोडेसे अपडेटेड होते काळाच्या पुढचे होते.

भारत चीन सीमेवर भारत सरकारला एक पूल बांधायचा असतो. त्यासाठी चित्रपटाचा नायक देव आनंदला जो इंजिनियर असतो तिकडे पाठवले जाते. तिथे त्याचा मुकाबला तिकडच्या बॉर्डर स्टेटमधील आदिवासी लोकांशी येतो. त्यांचा या पुलाला विरोध असतो. हा सर्व चित्रपट अरुणाचल प्रदेश, नागालँड या भागात चित्रित केला होता. त्यामुळे तिकडची भाषा तिकडचं लोक संगीत या चित्रपटात वापरलं होतं. सचिन देव बर्मन यांनी या चित्रपटाची गाणी बनवताना सिनेमाचा फ्लेवर लक्षात घेऊन चित्रपटाला संगीत दिले होते.
================================
हे देखील वाचा: danny denzongpa : डॅनीला हा आयकॉनिक रोल कसा मिळाला?
=================================
या चित्रपटात किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांच्या आवाजातील ‘गोरी गोरी प्यार की गोरी रे…’ हे खूप सॉफ्ट आणि रोमँटिक गाणं होतं. त्याला पूर्वांचल प्रदेशातील लोकगीताची फ्लेवर होता. या सिनेमात लता मंगेशकर यांच्या स्वरात दोन आणि किशोरच्या स्वरात क सोलो गीत होते. लता मंगेशकर यांच्या स्वरातील ‘ओ तुशिमा रे तुशिमा..’ हे खास पूर्वांचल फोक ट्यून वर आधारीत गाणे होते. या सिनेमात संगीतकार लता मंगेशकर, सचिन देव बर्मन आणि संगीतकार राहुल देव बर्मन या तिघांनी गायलेलं एक दुर्मिळ कॉम्बिनेशन या सिनेमात एका गाण्यासाठी एकत्र आले होते. गाण्याचे बोल होते ‘रैन सोयी सोयी नैन जागे जागे …’ या सिनेमातील एक गाणे प्रचंड गाजले होते हे गाणं गायलं होतं लता मंगेशकर यांच्यासोबत अभिनेता डॅनी डेन्झाप्पाने.

खरंतर डॅनी या चित्रपटात आधी काम करणार होता. त्याची भूमिका एका नागालँड बंडखोरांची होती. पण नंतर ही भूमिका सुजित तुम्हाला देण्यात आली. आणि डॅनी ला या चित्रपटात एका नोकराची भूमिका देण्यात आली. डॅनी नाराज झाला. पण तो नवीन होता त्यामुळे त्याच्याकडे पर्याय नव्हता. पण नंतर जॉनी वॉकर या सिनेमात आला आणि डॅनी ची नोकराची भूमिका त्याला ऑफर झाली. आता डॅनीच्या हातात काही च राहिलं नाही.
पण सचिन देव बर्मन यांना डॅनीची काळजी होती. त्यांनी त्याला कबूल केल्याप्रमाणे त्याच्याकडून या सिनेमातील गाणे गाऊन घ्यायचे होते. परंतु आता डॅनीची भूमिका सिनेमातून काढल्यामुळे हे गाणे मन्ना डे गाणार होते! पण ही बातमी जेव्हा सचिन देव बर्मन यांना कळाली; त्यावेळेला त्यांनी दिग्दर्शक आत्माराम यांना सांगितले,” हे गाणं कुठल्याही परिस्थितीत डॅनीच गाणार आणि डॅनी जर गाणार नसेल तर या सिनेमाची रेकॉर्ड केलेले सर्व गाणे मी माझ्याकडे परत घेऊन टाका.” आत्माराम यांना त्यांनी असेही विचारले ,” आता काय तुम्ही ठरवणार काय? सिनेमातले गाणे कोण गाणार ते?” दिग्दर्शक आत्माराम ने माघार घेतली आणि हे गाणं डॅनी आणि लता मंगेशकर यांच्या आवाजात रेकॉर्ड झाले.

गाण्याचे बोल होते ‘मेरे पास आओ मेरा नाम आओ..’ या गाण्याबद्दल थोडीशी कॉन्ट्रोव्हर्सी निर्माण झाली होती. कारण नाम आवो’ ही एक जमात नागालँडला होती. त्यामुळे गाण्याचे बोल थोडेसे बदलले. डॅनी हा काही प्रोफेशनल गायक नव्हता. पण त्याला पहिलेच गाणे लता मंगेशकर सोबत गायला मिळाले. डॅनी भाग्यवान कारण बर्मन पिता पुत्राकडे त्याला गायला मिळाले. या चित्रपटात तो सचिन देव बर्मन कडे गायला. तर 1975 साली तो राहुल देव बर्मन यांच्याकडे ‘सून सून कसम से लागू तेरे कसम से…’ (काला सोना) हे गाणं आशा भोसले सोबत गायले.
================================
हे देखील वाचा: ….. आणि Yash Chopra यांच्या आग्रहाने जावेद अख्तर गीतकार बनले!
=================================
‘ये गुलिस्ता हमारा’ सिनेमातील डॅनीने गायलेलं गाणे सिनेमात जॉनी वॉकर आणि जयश्री टी वर चित्रित झाले होते. चित्रपट चांगला बनला होता पण पब्लिकला अजिबात काहीच आवडला नाही त्यामुळे सिनेमा सुपरफ्लॉप झाला. पण या चित्रपटाच्या निमित्ताने काही दुर्मिळ योग आणि योगायोग जुळून आले होते त्याची सिनेमाच्या इतिहासात नोंद घेतली गेली. विशेषत: सचिनदा आणि पंचम ने एकत्र गायलेलं गीत आणि डॅनी व लताचे पहिले गीत!