दिग्दर्शक सुभाष घई आणि गीतकार आनंद बक्षी यांचे जबरदस्त ट्युनिंग!
जेव्हा दिलीप कुमारसाठी किशोर कुमारने पार्श्वगायन केले…
हरफन मौला कलाकार किशोर कुमार (Kishore Kumar) खरंतर अतिशय श्रेष्ठ दर्जाचा गायक पण गोल्डन इरामध्ये सचिन देव बर्मन आणि देव आनंद यांच्याशिवाय त्याच्या आवाजाचे महत्त्व कोणाला कळालेच नाही. त्यामुळे या काळात किशोर कुमार गायक असण्यापेक्षा अभिनेता म्हणून जास्त लोकप्रिय होता. पण साठच्या दशकाच्या उत्तरार्धात आलेल्या ‘पडोसन’ आणि ‘आराधना’ या चित्रपटानंतर मात्र किशोर कुमार यांच्या करियरने फार मोठी झेप घेतली आणि ‘सबकुछ किशोर कुमार’ (Kishore Kumar) ही उपाधी असलेल्या या कलाकाराने सत्तरच्या दशकातील प्रत्येक अभिनेत्याला आपला आवाज दिला. सत्तरच्या दशकातील सुपरस्टार राजेश खन्ना याचे करियर बहरवण्यात किशोर कुमारच्या (Kishore Kumar) स्वराचा मोठा वाटा होता. सत्तरच्या दशकातील दुसरा सुपरस्टार अमिताभ बच्चन हा देखील किशोर कुमारच्या गाण्यांनी प्रचंड लोकप्रिय झाला होता. एकूणच सत्तर आणि ऐंशीचे दशक हे किशोर कुमारचे (Kishore Kumar) होते असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. गोल्डन इरा मधील कित्येक कलावंत आपल्यासाठी किशोर कुमारने गावे असा आग्रह निर्मात्याकडे करत होते.
सुपरस्टार दिलीप कुमार यांच्यासाठी देखील या काळात एका चित्रपटासाठी किशोर कुमारने (Kishore Kumar) पार्श्वगायन केले होते. दिलीप कुमार साठी किशोर कुमार हे कॉम्बिनेशन खूप अनपेक्षित आणि असंभव असे होते कारण कोणी कल्पना देखील केली नव्हती की, किशोर कुमार दिलीप कुमारसाठी प्लेबॅक देऊ शकतो. परंतु हे घडून आलं सत्तरच्या दशकाच्या मध्यावर. तेव्हा ख्यातनाम बंगाली दिग्दर्शक तपन सिन्हा त्यांच्याच एका चित्रपटाचा रिमेक करत होते. चित्रपट होता ‘सगीना’. या सिनेमातील गाणी मजरूह सुलतानपूरी यांनी लिहिली होती तर संगीत सचिन देव बर्मन यांचे होते. संगीत सचिनदा यांचे असल्यामुळे सहाजिकच पार्श्वगायक म्हणून तिथे किशोर कुमारची वर्णी लागली. तरी देखील दिलीप कुमार साठी किशोर कुमार हे एक वेगळच ऑड कॉम्बिनेशन होतं. तसं म्हटलं तर चाळीसच्या दशकात दिलीप कुमार आणि किशोर कुमार यांचे रूपरी पडद्यावर आगमन झाले होते. परंतु पंचवीस वर्ष एकाच क्षेत्रात असून देखील किशोर कुमार (Kishore Kumar) यांनी कधीही दिलीप कुमारसाठी पार्श्वगायन केले नव्हते. अर्थात तशी संधीच कधी निर्माण झाली नव्हती.
‘सगिना’ या चित्रपटासाठी जेव्हा दिलीप कुमारला सांगितले गेले की,” यातील तुमच्यावर चित्री होणारी गाणी किशोर कुमार गाणार आहेत!” त्यावेळी त्यांना देखील आश्चर्य वाटले. परंतु त्याकाळात किशोर कुमारचा प्रचंड मोठा बोलबाला होता. किशोर कुमारला (Kishore Kumar) देखील सुरुवातीला दडपण आले होते. किशोर कुमार दिलीप कुमार यांना जाऊन भेटला आणि पुढे दोन-तीन दिवस त्यांनी भरपूर गप्पा मारल्या. किशोर कुमारसाठी तो एक अभ्यास दौरा होता कारण कोणता अभिनेता कसा बोलतो त्याची देहबोली कशी आहे हे पाहून तो पार्श्वगायन करत असे. संपूर्ण तयारी झाल्यावर किशोर कुमार रेकॉर्डिंगला गेला आणि या चित्रपटातील पहिले गाणे रेकॉर्ड झाले. गीताचे बोल होते ‘साला मै तो साहब बन गया साहब बनके कैसा तन गया…’ खूप मस्तीमध्ये किशोर कुमारने हे गाणं गायलं होतं. हे गाणे त्या काळात खूप लोकप्रिय ठरले होते. १९७४ सालच्या बिनाका गीतमालाच्या वार्षिक कार्यक्रमात हे गाणे ३० व्या क्रमांकावर होते. या चित्रपटात एक अतिशय हळुवार असं युगलगीत त्यांनी लता मंगेशकर सोबत गायले होते. चित्रपटात हे गाणे सायरा बानो आणि दिलीप कुमार यांच्यावर चित्रीत झालं होतं. गीता चे बोल होते ‘तुमरे संग तो रैन बीतायी कहां बीताऊ दिन…’ दिलीप कुमार साठी केवळ याच एका चित्रपटात किशोर कुमारने पार्श्वगायन केले होते. दुर्दैवाने हा चित्रपट चालला नाही. त्यानंतर दिलीप कुमार चरित्र अभिनेत्याच्या भूमिकेत वळाले त्यामुळे पुन्हा कधी योग देखील जुळून आला नाही.
=====
हे देखील वाचा : पडद्यावरील आणि पडद्याबाहेरील मौसमी चटर्जी
=====
आता थोडसं ‘सगिना’ या चित्रपटाबद्दल. हा सिनेमा सगळा मुलत: १९७० साली आलेल्या बंगालीभाषेतील ‘सगिना महातो’ या चित्रपटाचा हिंदी रिमेक होता. ‘सगिना महातो’ या चित्रपटात देखील दिलीप कुमार आणि सायरा बानो हीच जोडी होती. कृष्णधवल असलेला हा चित्रपट बंगालमध्ये प्रचंड लोकप्रिय झाला होता. या सिनेमासाठी दिलीप कुमारने खूप मेहनत घेतली होती. यातील बंगाली संवाद त्याने लिलया बोलले होते. खरं तो दिलीप कुमारचा जन्म पाकिस्तानमधील पैशावरचा तो संपूर्णपणे वाढला मुंबईमध्ये आणि असं असतानाही बंगाली भाषेमध्ये त्याने सगीना महातो हा चित्रपट केला आणि स्वतःचे संवाद त्याने बेमालूम पणे उच्चारले. कौतुक करायला पाहिजे सायरा बानो हिचे. तिने देखील हे आव्हान लीलया पेलले. बंगाली कलाकार या दोघांचे डायलॉग रेकॉर्ड करून त्यांच्याकडे पाठवत असतात आणि हे रेकॉर्ड डायलॉग पाठ करून ते कॅमेरासमोर साकारत असे. ‘सगिना महातो’ या चित्रपटातील भूमिकेसाठी दिलीप कुमारला बंगाली फिल्म जंगलालिस्ट असोसिएशनच्या स्पेशल अवॉर्ड मिळाले होते. ‘सगिना महातो’ हा बंगाली भाषेतील चित्रपट आणि ‘सगिना’ हा हिंदी भाषेतील चित्रपट हे दोन्ही सिनेमे युट्युबवर उपलब्ध आहेत. मी या दोन्ही सिनेमाची लिंक खाली दिलेली आहे. आपण नक्की हे चित्रपट पाहा अतिशय अप्रतिम असा अभिनय दिलीप कुमार यांचा या चित्रपटात आहे. विजय तेंडूलकर यांनी त्यांच्या ‘रातराणी’ या पुस्तकात या सिनेमावर फार सुंदर लिहिले आहे!