जेव्हा गीतकार शैलेंद्र आणि संगीतकार शंकर एकमेकांच्या अंगावर धावून गेले!
राज कपूर हा खऱ्या अर्थाने शोमॅन होता. त्याने अनेक गुणवंतांना आपल्या टीममध्ये सामावून घेतले होते. १९४९ साली आलेल्या ‘बरसात’पासून आर.केची टीम जबरदस्त हंगामा करत होती. या टीममध्ये राजकपूर, लता मंगेशकर, मुकेश, हसरत जयपुरी, शैलेंद्र, शंकर-जयकिशन, के.ए.अब्बास, वसंत साठे या हिऱ्यांची खाण होती.
या सर्वांमध्ये एक जबरदस्त असं ट्युनिंग होतं. त्यामुळे एक दुसऱ्याला फारसं काही समजावून सांगाव लागायचं नाही. समोरचा पटकन आपल्याला काय म्हणायचे ते समजून घेत होता. राज कपूरच्या चित्रपटांमध्ये जो ‘एकजिनसीपणा’ दिसतो त्याचे कारण हे होते. अर्थात प्रत्येक वेळेला सर्व काही सुरळीत, गोडी-गुलाबीने होत होतं अशातला भाग नाही. त्यांच्यात देखील छोट्या-मोठ्या तक्रारी, भांडणे, कुरबुरी, धुसफूस होत होतीच. अर्थात हे सर्व चांगल्यासाठीच होत होतं. मतभेद जरी होत असले तरी त्यातून चांगलंच बाहेर येत होतं. (lyricist Shailendra and musician Shankar fight)
एकदा मात्र गीतकार शैलेंद्र आणि संगीतकार शंकर यांच्यामध्ये खूपच जुंपली होती. अगदी हे दोघे हमरातुमरीवर येऊन भांडत होते. शाब्दिक भांडण कमी की काय म्हणून आपला मुद्दा रेटून ठेवण्यासाठी हे दोघे एकमेकांच्या अंगावर धावून देखील जाऊ लागेल. आता मात्र वातावरण चांगलेच तंग झाले होते. काय होता हा किस्सा पाहूया.
त्यावेळी आर के. चा ‘श्री ४२०’ हा चित्रपट फ्लोअरवर होता. त्याची निर्मिती चालू होती. यातील एका गाण्याच्या सिटिंगसाठी गीतकार शैलेंद्र आणि संगीतकार शंकर जयकिशन बसले होते. आर के च्या टीम मधील गीतकार हसरत जयपुरी यांचे संगीतकार जयकिशन सोबत, तर गीतकार शैलेंद्र यांचे संगीतकार शंकर सोबत जास्त जुळायचे. त्यामुळे हे गीत शैलेंद्र लिहिणार होता आणि शंकरला त्याची चाल लावायची होती.
शंकरने वेगवेगळ्या प्रकारच्या धुन शैलेंद्र यांना ऐकवल्या. गाणं होतं, “प्यार हुआ इकरार हुआ है प्यार से फिर क्यूं डरता है दिल”, गाण्याचा मुखडा तयार झाला होता. आता कडव्यासाठी शब्दांची जुळवाजुळव चालू होती. पहिले कडवे तयार झाले. (lyricist Shailendra and musician Shankar fight)
कहो की अपनी प्रीत का मीत ना बदलेगा कभी
तुम भी कहो इस राह का मीत न बदलेगा कभी
प्यार जो टूटा, साथ जो छूटा
चाँद न चमकेगा कभी
प्यार हुआ इकरार हुआ…
आता प्रेमातील उदात्तता दाखवण्यासाठी राज कपूरने दुसऱ्या कडव्यात त्यात विशिष्ट शब्द टाकायला सांगितले. नायक-नायिकेच्या प्रेमाची परिपूर्ती या गीतात होताना दाखवायची होती. रसिकांना आठवत असेल या दुसऱ्या कडव्याच्या वेळेला पावसात राज – नर्गिस एका छत्रीत जात असतात आणि समोरून रेनकोट घालून तीन छोटी मुले जात असतात. ही तीन छोटी मुले म्हणजे राज कपूर यांची अपत्य रणधीर कपूर, ऋषी कपूर आणि रितू नंदा होती. प्रेमाची उदात्तता आणण्यासाठी शैलेंद्र यांनी,
रातें दसों दिशाओं से कहेंगी अपनी कहानियाँ
प्रीत हमारे प्यार के दोहराएंगी जवानियाँ
मैं न रहूँगी, तुम न रहोगे
फिर भी रहेंगी निशानियाँ
प्यार हुआ इक़रार हुआ…
या ओळी सुचविल्या. गीतकार शैलेंद्र आणि संगीतकार शंकर यांच्यात भांडणाची ठिणगी तिथेच पडली. संगीतकार शंकर शैलेंद्रला म्हणाले, “अबे गधे, दिशा सिर्फ चार होती हैं और यहां तुने दस दिशा कहांसे उठाके लाया” त्यावर गीतकार शैलेंद्र चिडला तो म्हणाला “अबे गेंडे, तू कभी तो अकल से बात करते जा. दस दिशा होती है.” झालं.. ‘दिशा दहा की दिशा चार’ यावर दोघांमध्ये प्रचंड वाद सुरू झाला. (lyricist Shailendra and musician Shankar fight)
संगीतकार जयकिशन आणि इतरांनी त्यांच्यात मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला, पण दोघे थांबायला तयारच होईनात. एकमेकांच्या अंगावर धावून जाऊ लागले आणि अपशब्दांचा वापर करू लागले. शेवटी आपल्या ‘बॉस’ कडे जाऊन याचा तोडगा काढावा असे ठरले. (lyricist Shailendra and musician Shankar fight)
दुसऱ्या दिवशी दोघेही राज कपूर यांना भेटायला गेले. सुरुवातीला गीतकार शैलेंद्रने जाऊन आपली बाजू स्पष्ट केली. नंतर संगीतकार शंकर तिकडे गेले. संगीतकार शंकर देखील आपली बाजू मांडताना दिशा चारच असतात, असे सांगू लागला. त्यावर राजकपूर म्हणाला “ देखो शंकर मै भी कोई पंडित तो हू नही . पण उद्या जर लोक दहा दिशा म्हटल्यानंतर हसू लागले, तर आपण कानावर हात ठेवायचे आणि शैलेंद्रकडे बोट दाखवायचे. इज्जत जायचीच असेल तर शैलेंद्रची जाईल. तुला काय फरक पडतो? तुम सिर्फ धून बनाने का काम करो!” असे म्हणून त्याने वादावर तोडगा काढला.
संध्याकाळी राज कपूरने त्यांच्या ओळखीच्या मित्राला विचारून नेमक्या दिशा किती याची माहिती घेतली. त्या विद्वानांनी ‘दहा दिशा’ हेच उत्तर बरोबर आहे, असे सांगितले. हिंदू संस्कृतीमध्ये ‘वराह पुराणामध्ये’ त्याचा उल्लेख आहे.
मुख्य चार दिशा पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण; चार उपदिशा आग्नेय, नैऋत्य, वायव्य, ईशान्य आणि याशिवाय ऊर्ध्व आणि पाताळ या दिशा असतात, असे त्यांनी सांगितले. आता तर नासाने देखील भारताच्या या पुराण संस्कृतीला मान्यता दिली आहे. अशा पद्धतीने गाणे शैलेंद्रच्या म्हणण्यानुसार पूर्ण झाले आणि प्रचंड लोकप्रिय झाले. (lyricist Shailendra and musician Shankar fight)
=========
हे देखील वाचा – एकुलत्या एक मुलाच्या अपघाती मृत्यूच्या दु:खाने ‘या’ गायिकेचा गाता गळा कायमचा स्तब्ध झाला?
=========
आज हे गाणे प्रदर्शित होऊन तब्बल साठ वर्षाचा कालावधी होऊन गेला असला तरी कोणीही या गाण्यात चूक काढलीच नाही उलट दिवसेंदिवस या गाण्याची लोकप्रियता वाढत चालली आहे. अर्थात शैलेंद्र आणि शंकर हे दोघेदेखील वाद विसरून गेले आणि पुन्हा नव्या जोमाने गाणी तयार करायला बसले.