
महेश भट जेव्हा स्वतःचे आयुष्य पडद्यावर मांडतात…
निर्माता दिग्दर्शक महेश भट (Mahesh Bhatt) यांचे त्यांच्या वडिलांसोबत संबंध कायमच विचित्र राहिले. त्यांचे वडील नानाभाई भट स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्यानंतर चे एक ख्यातनाम निर्माता दिग्दर्शक होते. त्यांनी त्या काळात अनेक सुपरहिट चित्रपट दिग्दर्शित केले. नानाभाई भट यांनी दोन विवाह केले होते. पैकी एक विवाह त्यांचा शिरीन या मुस्लिम अभिनेत्री सोबत झाला होता. तिच्यापासून त्यांना तीन मुले झाली त्यापैकी एक म्हणजे महेश भट.
परंतु या त्यांच्या लग्नाला समाज मान्यता नव्हती. या कारणाने महेश भट याच्या मनात लहानपणी पासून एक न्यून गंडाची भावना होती. ते स्वतःला कायम अनौरस संतती म्हणून संतती समाजात होते. कारण नाना भयभट यांनी नंतर एका हिंदू स्त्री सोबत लग्न केले त्यांच्यापासून त्यांना सहा मुले झाली. महेश भट हे कायम स्वतःला एक वेगळे समजत होते. हा त्यांच्या मनात पहिल्यापासून एक गंड होता, कॉम्प्लेक्स होता कारण जो मान सन्मान महेश भट यांच्या दुसऱ्या पत्नीला मिळत होता तो महेश भट (Mahesh Bhatt) यांच्या आईला कधीच मिळत नव्हता असे त्यांचे मत होते.

यातूनच त्यांनी आपल्या आयुष्यावर अनेक चित्रपट काढले, ज्यामध्ये ते आपल्या आयुष्यातील अनेक प्रसंग बेमालूमपणे टाकत होते. नव्वदच्या दशकामध्ये त्यांनी आपल्या आईवर एक चित्रपट काढायचे ठरवले. चित्रपटाचे नावच त्यांनी शिरीन असे ठेवले. या चित्रपटात त्यांना आपल्या आईची व्यथा रुपेरी पडद्यावर मांडायची होती. तिचा नवरा एक ख्यातनाम चित्रपट दिग्दर्शक असतो पण केवळ ती स्वतः धर्माने मुस्लिम असल्यामुळे तिला समाजात आणि त्यांच्या कुटुंबात स्थान मिळत नाही. तिची आणि तिच्या मुलांची एका अर्थाने वाताहात होते हे महेश भटला यातून दाखवायचे होते. महेश भटने जेव्हा ट्रेड मॅगझीनमध्ये या सिनेमाची जाहिरात करायला सुरुवात केली.
त्यावेळी नानाभाई भट जिवंत होते. त्यांनी महेश भट यांना कायदेशीर नोटीस बजावली आणि सर्व ट्रेड मॅगझिन्सला देखील त्याची कॉपी पाठवली आणि यापुढे महेश भटच्या सिनेमाची जाहिरात आणि इतर पब्लिसिटी आपल्या माध्यमातून करू नये असे सांगितले. याचे कारण देताना त्यांनी सांगितले की,” महेश भटची (Mahesh Bhatt) आई शिरीन ही माझी पत्नी होत आहे आणि महेश भट हा माझा औरसच मुलगा आहे. भारतामध्ये हिंदू कोड बिल १९५५ साली आले.
माझा आणि शिरीनचा विवाह त्यापूर्वीचा आहे. त्यामुळे द्विभार्या कायदा मला लागू होत नाही. महेश भट हा माझा औरसच मुलगा आहे. त्यामुळे चित्रपटाच्या माध्यमातून महेश भट स्वतःची जी अनौरस असल्याची जाहिरात करतो आहे ती योग्य नाही !” अर्थात पुढे काही दिवसातच नानाभाई भट यांचे निधन झाले. महेश भट यांनी ‘शिरीन’ या चित्रपटाचे नाव बदलून ‘जखम’ असे ठेवले आणि हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटात महेश भटच्या आईची भूमिका त्यांच्या स्वतःच्या मुलीने म्हणजे पूजा भट ने केली होती. तर महेश भट ची (Mahesh Bhatt) भूमिका अजय देवगन यांनी केली होती. नानाभाई भटच्या भूमिकेमध्ये दाक्षिणात्य अभिनेते नागार्जुन हे होते.
याच कथानकावर स्टार प्लस या टीव्ही चॅनलवर ‘नामकरण’ नावाची एक मालिका २०१६ साली प्रदर्शित झाली. दोन वर्ष चाललेल्या या मालिकेने तब्बल ५३६ एपिसोड केले होते. या मालिकेचे कथानक बऱ्यापैकी याच प्लॉटवर बेतले होते. या मालिकेने त्या काळात चांगली लोकप्रिय मिळवली होती. ‘नामकरण’ या मालिकेचे शीर्षक गीत श्रेया घोषाल हिने गायले होते आणि ते त्या काळात बऱ्यापैकी लोकप्रिय देखील झाले होते.
===========
हे देखील वाचा : अमिताभ बच्चन पेक्षा जास्त मानधन सलीम जावेद यांनी घेतले !
===========
महेश भट (Mahesh Bhatt) यांनी आपल्या वैयक्तिक आयुष्यावर बरेच चित्रपट बनवले. १९८५ साली त्यांनी ‘जनम’ ही भारतातील पहिली टेली फिल्म बनवली. या चित्रपटाचे दिग्दर्शन त्यांनी स्वतः केले होते. या आत्मकथनात्मक चित्रपटात त्यांची भूमिका कुमार गौरव या अभिनेत्याने केली होती यात त्यांच्या वडिलांची भूमिका अनुपम खेर यांनी केली होती. यात अनिता कंवर,शेरनाज पटेल , मदन जैन यांच्या देखील भूमिका होत्या. ८ डिसेंबर १९८५ रोजी दूरदर्शन च्या राष्ट्रीय वाहिनीवर या फिल्म चे प्रसारण झाले. या चित्रपटाला फिल्मफेअरचे अनेक नामांकन मिळाली होती. या चित्रपटापासून महेश भट एक सक्षम चित्रपट दिग्दर्शक सोबतच दूरदर्शनवरील टेली फिल्म चे जनक म्हणून ओळखले जाऊ लागले!