जेंव्हा लंडन मध्ये अमिताभ-जया ला कुणीच ओळखले नाही!
अमिताभ बच्चन आणि जया भादुरी (Amitabh-Jaya) यांचा जंजीर हा चित्रपट ११ मे १९७३ या दिवशी संपूर्ण भारतभर प्रदर्शित झाला आणि प्रचंड तो यशस्वी झाला. या चित्रपटानंतर तीन आठवड्यातच ३ जून १९७३ या दिवशी अमिताभ आणि जया विवाह बंधनात अडकले. जया भादुरी च्या गुड्डी, बावर्ची, पिया का घर या सिनेमात अमिताभचा सहभाग होता पण यात ती तिचा नायक नव्हता.प्रकाश वर्मा यांच्या ‘बंसी बिरजू’ या सिनेमात ते पहिल्यांदा एकत्र आले. हा सिनेमा सुपर फ्लॉप ठरला. यानंतर बी आर इशारा यांच्या ‘एक नजर’ या सिनेमात ते एकत्र आले.हे दोन्ही सिनेमे १९७२ साली आले होते. लग्नाच्या वेळी जया बऱ्यापैकी स्टार बनली होती. तर अमिताभ मात्र यशाच्या प्रतीक्षेत होता. ‘जंजीर’ ने यशाची ध्वजा फडकती ठेवली. अमिताभ बच्चन आणि जया भादुरी (Amitabh-Jaya) यांची प्रेम कहानी पुण्यातून सुरू झाली. एकदा के ए अब्बास यांच्यासोबत अमिताभ बच्चन पुण्याच्या एफ टी आय मध्ये आले होते. तिथे त्यावेळी जया बच्चन शिकत होती ही त्या दोघांची पहिली भेट. या भेटीत दोघे एकमेकांना बोलले नाही पण दोघांनी एकमेकांना पाहिले होते. पुढे अमिताभ बच्चन यांनी जया भादुरीचा फोटो एका सिने मासिकाच्या कव्हर वर पाहिला आणि तिथेच त्यांच्या हृदयात दीडदा-दीडदा झाले. जया भादुरीचे डोळे त्यांना खूप आवडले होते. ऋषिकेश मुखर्जी यांनी ‘गुड्डी’ या चित्रपटासाठी या दोघांना एकत्र आणण्याचे ठरवले होते. त्यावेळी ऋषींदानी या दोघांची ओळख करून दिली. हरिवंशराय बच्चन यांचा मुलगा ही अमिताभ बच्चन यांची पहिली ओळख जया भादुरीसाठी होती. ‘गुड्डी’ मध्ये पुढे अमिताभ बच्चनच्या ऐवजी समित भांजा ची निवड झाली आणि अमिताभला हृषिदांनी ‘ आनंद ‘ या चित्रपटातील बाबू मोशाच्या भूमिकेसाठी कास्ट केले.
पण या नंतर अमिताभ जया (Amitabh-Jaya) यांच्या नियमित भेटी होऊ लागल्या. बन्सी बिरजू चित्रपटात ते दोघे पहिल्यांदा एकत्र आले तिथूनच त्यांच्या प्रेमाचा अंकुर रुजू लागला. ‘एक नजर’ च्या वेळी दोघे एकमेकाना आवडू लागले होते. त्याची कुणकुण घरच्यांना लागली. ‘जंजीर’ चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर तो जर हिट झाला तर सर्व युनिट लंडनला जाणार होते. अमिताभ बच्चन यांनी त्यांचा लंडन प्लॅन घरी सांगितल्यावर, घरच्यांनी लग्नाच्या आधी कुठेही बाहेर परदेशात जायचे नाही असे बजावले. त्यावेळेला अमिताभ ने भीड चेपून जया सोबत लग्नाचा प्रस्ताव ठेवला आणि अक्षरश: ‘चट मंगनी पट ब्याह’ अशा स्वरूपात लग्न ठरले आंनी झाले ही. ‘जंजीर’ प्रदर्शित झाला की तीन आठवड्याच्या आत दोघांचे लग्न झाले.
लग्नाच्या नंतर हे दोघे लंडनला हनिमून साठी गेले. लंडनमध्ये त्यांना ओळखणारे तसे कोणीच नव्हते. भारतात हळूहळू त्यांना लोक ओळखू लागले होते पण लंडनमध्ये तो प्रश्न नव्हता. त्यावेळी मिडिया आजच्या सारखा पॉवरफुल नव्हता. त्या मुळे पटकन कुणी कुणाला ओळखत नसे! त्यामुळे बिनधास्तपणे ते सगळीकडे फिरत होते. एकदा मादाम तुसा म्युझियममध्ये हे दोघे गेले. तिथे वॅक्स स्टॅच्यू पाहत असताना एक भारतीय मुलगी आपल्या आई सोबत म्युझियम पाहायला आली होती. तिने अमिताभ बच्चन कडे बघितले आणि तिला काहीतरी क्लिक झाले. तिने आईला विचारले ,”आई तो अमिताभ आहे का गं?” त्यावर आईने अमिताभ कडे पाहिले आणि म्हणाली,” नाही गं… तो इथे कसा असेल?” मुलगी पुन्हा पुन्हा म्हणत होती,” नाही, आई मला त्याची हेअर स्टाईल तशीच वाटते आहे. डोळे तसेच वाटताहेत. मला तो अमिताभ बच्चनच वाटतोय.” आई म्हणाली,” शक्यच नाही. हा अमिताभ बच्चन नाही!” अमिताभ बच्चन मायलेकींचा संवाद व्यवस्थित अंतर ठेवून ऐकत होता. त्याचे डोळे जरी म्युझियम पाहत असले तरी त्याचे कान त्या मायलेकींच्या संवादाकडे होते. (Amitabh-Jaya)
=======
हे देखील वाचा :‘या’ सिनेमासाठी प्रियांका चोप्राला कसे काय मिळाले सहापट अधिक पैसे?
=======
शेवटापर्यंत त्या मुलीने काही ओळखले नाही आणि त्या निघून गेल्या. अमिताभ बच्चन याला खूप वाईट वाटले. त्यावेळी तो विचार करू लागला.’ जर माझा देखील इथे वॅक्स चा पुतळा असता तर लोकांना ओळखणे किती सोपे गेले असते!’ अमिताभची ही भविष्यवाणी पुढे पंचवीस तीस वर्षानंतर अक्षरशः खरी ठरली आणि अमिताभ बच्चन यांचा वॅक्स म्युझियममध्ये स्टॅच्यू बनवला गेला. जगभरातले अमिताभचे चाहते तिथे गर्दी करत असतात. अमिताभ च्या वॅक्स स्टॅच्यू सोबत फोटो काढून घेत असतात. अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या ब्लॉगमध्ये ही आठवण सांगितली आहे.