‘शोले’ रिलीज झाला तेव्हा पहिले एक दोन आठवडे पडला… पडला अशीच हवा होती!
तुम्हाला गुरुदत्त दिग्दर्शित ‘कागज के फूल’ (१९५९) या चित्रपटाची सुरुवात आठवतेय. या चित्रपटातील दिग्दर्शक सुरेश सिन्हा (गुरुदत्त) एकटाच बसलाय. त्याला विलक्षण कुतूहल आहे की आपल्या आजच्या शुक्रवारी प्रदर्शित झालेल्या चित्रपटाचा पब्लिक रिपोर्ट काय असेल. तेवढ्यात एक खबरी धावत पळत येऊन सांगतो, अपनी पिक्चर फ्लॉप हो गई…. लोगोने पिक्चर को नाकारा…. (या चित्रपटाची थीम चित्रपटसृष्टी आणि नातेसंबंध अशी आहे. इतरही अनेक घटक आहेत.)
आजच्या ग्लोबल युगातील चित्रपट रसिकांना कदाचित या दृश्याचा अर्थ लागणार नाही. त्यात आजच्या काळात चित्रपट कसा आहे, हे समजण्यापूर्वीच त्याने पहिल्याच दिवशी किती कोटीची कमाई केली याच्या ब्रेकिंग न्यूज सुरु होतात. कॅलक्यूलेटरपेक्षाही अधिक वेगाने ही कमाई मोजली जाते आणि त्याला मराठी चित्रपटही अपवाद नाही. पण नव्वदच्या दशकापर्यंत चित्रपटाच्या यशाचे परिणाम मोजण्याची वेगळी पध्दत होती. तेव्हा मेन थिएटरमधील फस्ट डे फर्स्ट शोचा पब्लिक सिनेमा पाहून बाहेर पडताना कशा पद्धतीने व्यक्त होतोय, आपसात काय बोलतोय, त्याचा चेहरा काय सांगतोय, त्याची देहबोली कशी आहे यातून उत्तर मिळे आणि ते अगदी करेक्ट असे वा ठरे. प्रत्येक व्यवसायातील यशापयशाचे काही सिम्पटम्स असतातच. तसेच हे होते आणि त्यावरूनच ‘कागज के फूल’मधील खबरी व्यक्त होतो. दुर्दैवाने हा ‘कागज के फूल’ही तस्साच फ्लॉप ठरला.
दुसरे उदाहरण म्हणजे, राज कपूर निर्मित, अभिनीत आणि दिग्दर्शित ‘मेरा नाम जोकर’ (१९७०) चे! राज कपूरने दीर्घकाळ पाहिलेले हे रुपेरी स्वप्न होते. त्याचा हा महत्वाकांक्षी चित्रपट होता. आपला दोन मध्यंतरचा ‘संगम’ (१९६४) खणखणीत यशस्वी ठरल्याने राज कपूरने ‘मेरा नाम जोकर’ही असाच दोन मध्यंतरचा चित्रपट निर्माण केला. मुंबईत या चित्रपटाचे मेन थिएटर नॉव्हेल्टी मध्ये या चित्रपटासाठी तिकीट दरात वाढ करताना अप्पर स्टॉल सात रुपये आणि बाल्कनी आठ रुपये असे वाढवले. (तुम्हाला कदाचित कल्पना नसेल पण १९७० साली मुंबईतील मध्यमवर्गीय मराठी माणसाला मासिक तीनशे रुपये पगारही खूप मोठा वाटे, घरातील अथवा कुटुंबातील बुजुर्गाना विचारा). या फिल्मचा फस्ट डे फर्स्ट शोचा पब्लिक बाहेर पडताना बेक्कार है, बोअर है, डिब्बा है, खास नही, पैसा फोकट असे ओरडत ओरडत आले…. आता तुम्ही म्हणाल की अशाने काय होते? तर या चित्रपटाचा सेकंड शोचा ब्लॅक मार्केटमधील दर कोसळतो. त्याला चांगला भाव मिळत नाही. रात्रीच्या शोला मुद्दल भावात तिकीट विकावे लागते. एव्हाना आपल्या चित्रपट व्यवसायाची मक्का नाझ थिएटर इमारतीत पब्लिक रिपोर्ट पोहचलेला असतो, पिक्चर फ्लॉप… (हा हॉटस्पॉट म्हणजे, येथील सर्वच्या सर्व सहा सात मजले चित्रपट वितरकांची कार्यालये होती. तेथे प्रत्येक चित्रपटाची ‘व्यावसायिक कुंडली’ समजायची.) लगेचच दुसरा आठवडा सुरु होताना ‘जोकर’वर कात्री लावली आणि लांबी कमी करुन तो एका मध्यंतरचा करण्यात आला आणि तिकीटाचे दरही मूळ पदावर म्हणजे एक आणि दोन रुपये असे करण्यात आले…..
त्या काळात मिडियात ‘जोकर पडला की पाडला?’ यावर बरेच लिहिले गेले. इतके की, एखाद्या हिट चित्रपटावर इतके लिहिले जात नसे. त्यातूनच या चित्रपटाभोवती सहानुभूती निर्माण होत गेली आणि चित्रपटातील गाणी लोकप्रिय असल्याने आज पन्नास वर्षांनंतरही या चित्रपटाचे अस्तित्व कायम आहे.
रमेश सिप्पी दिग्दर्शित ‘शोले’ (१९७५) रिलीज झाला तेव्हा पहिले एक दोन आठवडे पडला… पडला अशीच हवा होती. खरं तर या चित्रपटाचा थरार मिनर्व्हा थिएटरमध्ये अनुभवणं योग्य होते. याचे कारण म्हणजे मुंबई आणि ठाणे जिल्ह्यातील याच एकमेव थिएटरमध्ये हा चित्रपट सत्तर एमएम आणि स्टीरिओफोनिक साऊंड सिस्टीममध्ये होता. वीरु आणि जयमधील नाणेफेकीच्या प्रसंगात आपल्या जवळच ते नाणे पडल्याचा फिल येई. तेथे संपूर्ण चित्रपट रोमांचित अनुभव देई. मी गिरगावात राहिल्याने याचा अनुभव अनेकदा घेतल्याने मला त्याची कल्पना आहे. हळूहळू हा चित्रपट असा आणि इतका पीकअप झाला की ‘प्रेक्षकांनी तो बघता बघता’ या चित्रपटाची देशभर क्रेझ निर्माण झाली. ‘आपल्या देशाची जणू एक लोककथा’ असे या चित्रपटाचे वर्णन होऊ लागले. मिनर्व्हा थिएटरबाहेरच्या ब्लॅक मार्केटवाल्यानी बक्कळ कमाई केल्याच्या बातम्या झाल्या. अप्पर स्टॉल चार रुपये चाळीस पैसे असलेले तिकीट वीस अथवा रविवारी पंचवीस रुपये आणि बाल्कनी पाच रुपये पन्नास पैसे असलेले तिकीट पंचवीस आणि रविवारी तीस रुपये असे चढत्या भावात विकले गेले. त्यातूनच या काळाबाजारवाल्यानी थिएटरजवळच हॉटेल सुरु केले, गावी बंगला बांधला असे किस्से, कथा, दंतकथा रंगल्या.
आपल्या देशातील चित्रपट प्रेक्षकांच्या संस्कृतीचे वैशिष्ट्य म्हणजे एकदा का चित्रपट आवडला की तो डोक्यावर घ्यायचा, कायमचा डोक्यात ठेवायचा. ‘शोले’ ही त्यातलाच आहे.
आता एकादा चित्रपट पाडायचा म्हणजे काय?
आपला व्यावसायिक शत्रू असलेल्या सिनेमावाल्याच्या चित्रपटाची मेन थिएटरची बरीच तिकीटे आपण काढायची आणि मग आपल्या चमच्यांना तेथे पाठवून सिनेमा सुरू असतानाच हुर्यो उडवत राह्यचे. म्हणजे इतरही रसिकांना वाटणार हा चित्रपट वाईट्ट आहे. चित्रपट संपल्यावर बाहेर पडताना अर्वाच्य शिवीगाळ करायची. वातावरण गढूळ करायचं. कालांतराने जुहूचे चंदन टॉकीज यासाठी बॅरोमिटर होते. तेथे काही जण हा उद्योग करीत.
ज्याचा चित्रपट पाडायचा आहे, त्या चित्रपटाच्या थिएटरवरील ब्लॅक मार्केटवाल्याना ‘आपलेसे करायचं’. फस्ट डे फर्स्ट शोपासूनच दर पाडायचा. जीवघेणी स्पर्धा म्हटल्यावर हे होणारच.
कधी एखाद्याला महत्वाची थिएटर्स मिळू द्यायची नाहीत, जमल्यास रिव्ह्यू मॅनेज करायचे, गाणी हिट होऊ नयेत यासाठी तबकडी अथवा ऑडियो कॅसेट मोठ्या प्रमाणात विकत घेऊन त्याचा नाश करायचा. असे अनेक प्रकार केले जातात.
एकदा तर सुधाकर बोकाडे निर्मित आणि विनय लाड दिग्दर्शित ‘पटली रे पटली’ हा मराठी चित्रपट रिलीज व्हायच्या दिवशीच त्याला उघडपणे अपशकुन करण्यासाठी मूळ हिंदी चित्रपट ज्योती स्वरुप दिग्दर्शित ‘पडोसन’ पुन्हा एकदा प्रदर्शित केला. आता मार्केटमध्ये पुन्हा एकदा ओरिजिनल माल असताना ड्युप्लीकेट वस्तूला पसंती कशी मिळेल?
कालांतराने चित्रपट पाडण्याची प्रथा बदलली. आता सोशल मिडियात विरोधात पोस्ट वाढवत जायचं. विशेषतः काही पीआरओ हे काम करताहेत अशी चर्चा आहे. नेमकी वस्तुस्थिती काय आहे हे तेच जाणोत. पण कार्पोरेट युगात एकमेकांविरुध्द ट्वीटर वॉर शक्य असते. एखाद्या चित्रपटाबाबत वातावरण गढूळ करणे, पब्लिक रिपोर्ट नरम आला तर तो ‘कॅच’ करणे असे हे उद्योग आहेत.
खरं तर चित्रपट पाह्यचा की नाही याचा ‘पहिला आणि शेवटचा निर्णय’ प्रेक्षकांच्या आवडी निवडीवरच असतो. पण त्यांचा कल आणि कौल घडवणे अथवा बिघडवणे यात काही ट्रीक आहेत हे नक्की. जेथे दोन बडे निर्माते अथवा दोन स्टुडिओत तीव्र स्पर्धा निर्माण झाली की ‘चित्रपटाच्या पाडापाडी’चे अलिखीत नियम येतात. अहो, आपल्या व्यावसायिक शत्रूचा चित्रपट यशस्वी ठरला तर आपल्या चित्रपटाची गोची अथवा कोंडी होऊ शकते ना? प्रेक्षकांची टेस्ट बदलते, वातावरण बदलते, मिडियात त्या हिट चित्रपटावर फोकस असतो, सोशल मिडियात त्या चित्रपटावर कॉमेंट्स, लाईक्स असतात. मग आपल्या चित्रपटाचे काय? कधी कधी ‘तुम भी चलो, हम भी चले, चलती रहे जिंदगी’ असा समजूतदारपणाचा फंडा अवलंबला जातो. दोन अथवा तीन मोठ्या निर्मिती संस्था (ज्यांना आज ‘स्टुडिओ’ म्हणतात) आपल्या चित्रपट रिलीजमध्ये चार आठवड्यांचे अंतर ठेवून अॅडजेस्टमेंट करतात. तेवढे सकारात्मक असावे, खरं तर मला तरी पूर्वीच्या तुलनेत आजच्या ग्लोबल युगातील चित्रपटसृष्टीत समंजसता आणि व्यावसायिकता जास्त दिसतेय. त्यातूनच ‘चित्रपट पाडण्याची प्रथा’ थोडी बाजूला झाली आहे.
आता फस्ट डे फर्स्ट शोलाच ‘ट्यूबलाईट’ अथवा ‘ठग्ज ऑफ हिन्दुस्तान’ हे पडद्यावर कंटाळा आणत असतातच अनेकांनी व्हॉटसअपवर मेसेज पाठवणे सुरु केले, डब्बा… बोअर है… नॉट सो गुड..
आता शेवटचा प्रश्न, पाडलेल्या चित्रपटाचा आवाज जास्त येतो की पडलेल्या?
दिलीप ठाकूर