दिग्दर्शक सुभाष घई आणि गीतकार आनंद बक्षी यांचे जबरदस्त ट्युनिंग!
जेव्हा सिनेमाचा शो सुटतो आणि पब्लिक थिएटरच्या बाहेर येतं तेव्हा…
‘आनंद’ (१९७१) सिनेमाचा विलक्षण शोकात्मक शेवट पाहून थिएटरमधून बाहेर पडताना अनेक जण सुन्न मन:स्थितीत होते. कोणी फारसं कोणाशी बोलत नव्हते. वातावरणात एक प्रकारचे अस्वस्थपण होते. काहींच्या डोळ्यात अश्रू होते. राजेश खन्नाचे जबरा चाहते आपल्या हीरोने अतिशय क्लासिक अभिनय केलाय म्हणून सुखावले होते. तरी ‘जिंदगी बडी होनी चाहिए, लंबी नहीं’ हे आयुष्याचे तत्वज्ञान त्यांच्या डोक्यात फिट्ट बसल्याचे त्यांचे चेहरे सांगत होते, तेव्हाच ‘जिंदगी और मौत उपरवाले के हाथ मे है….’ हे आयुष्याचे सत्यही त्याना अस्वस्थ करीत होते. हे एकाच शोला नव्हे तर अनेक शो संपल्यावर साधारण हे असेच भावूक वातावरण. क्लायमॅक्सचा प्रभाव थिएटरबाहेर येत होता. (Memories of theatre)
‘हाथी मेरे साथी’च्या क्लायमॅक्सला रामू हत्तीचे निधन होते आणि मग त्याच्या अंत्ययात्रेच्या वेळी राजेश खन्नाचे ‘नफरत की दुनिया को छोडके…’ हे भावपूर्ण गाणे, या सगळ्यातून वातावरण काहीसे भावूक झाले तरी आम्ही बच्चे कंपनी सिनेमाभर हत्तींनी केलेल्या धमाल मनोरंजनाच्या मन:स्थितीत होतो. त्यातच आवडता राजेश खन्ना. डोळ्यासमोर त्याचे आपले डोळे मिचकावणे वगैरे मॅनॅरिझम आणि अशातच आपापल्या पालकांचा हात घट्ट धरुन अनेक पोरंबाळं थिएटरबाहेर पडत होतो.
‘जंजीर’चा शो सुटला तोच अनेक युवक आपल्या मनातील रागाला वाट मोकळी करून देणारा रुपेरी ‘अँग्री यंग मॅन’ मिळालाय याचा आनंद होत होता. कसला तरी आळस झटकल्याची भावना निर्माण होई आणि याच अनुभवासाठी पुन्हा पुन्हा जाणे होई.
‘शोले’ संपवून बाहेर पडताना मधूनच कोणी तरी आरोळी देई, “अरे ओ सांभा…. कितने आदमी थे….”, तर कोणी म्हणायचे, “होली, कब है होली?” कोणी गब्बरसिंगच्या दहशतीवर आपसात बोले. देशभरात सगळीकडेच अशाच काॅमन प्रतिक्रिया हेच विशेष.
‘जय संतोषी मा’ पाहून बाहेर पडताना श्रद्धाळू भावना व्यक्त झाली होती. अनेकांनी आपणही शुक्रवारचा उपवास करायला पाहिजे असा निर्धार व्यक्त केला होता. तर, ‘राम तेरी गंगा मैली’ संपल्यावर बाहेर पडताना काही मित्र आपसात गप्पा करताना ‘राज कपूरच्या जुन्या पिक्चरची सर नाही’ असे म्हणाल्याचे कानावर येत असे. तर काहीजण धबधब्याखालील मंदाकिनीचे रुपडे ‘श्लील की अश्लील’ यावर वाद घालत. कोणी त्यातच म्हणायचा, पुन्हा व्हिडिओवर पाहूया.
‘तेजाब’ पाहून बाहेर पडताना कोणी मोठ्याने मोहिनी, मोहिनी म्हणत. तर कोणी ‘एक दो तीन चार पाच छे सात…’ हे गाणे गुणगुणत बाहेर पडत. कोणी आपसात मैत्रीपूर्ण दंगामस्ती करत. एकदमच उत्फूर्त रिस्पॉन्स. सिनेमा पडद्यावर ठेवून बाहेर पडायचे नाही. डोक्यात फिट्ट करायचे आणि डोक्यावरही घ्यायचे…… अशा अनेक आठवणी आहेत. त्याचीच एक मालिका होईल.
‘दिल दीवाना’ पाहून बाहेर पडताना अनेकांना आपल्या चेहर्यावरची निराशा लपवता येत नव्हती, यापेक्षा असे म्हणतो की, आपण हा सिनेमा पाहून वैतागलोय हे हक्काने चेहर्यावर येऊ दिले. तोही एक हक्कच. तिकीट काढून सिनेमा पाहिल्याने खरे मत मनापासून येणार. तरी एखादा पुटपुटत असे, ‘जवानी दीवानी’ का इसमे कुछ भी मजा नहीं… वोही नरेंद्र बेदी डायरेक्टर और वोही रणधीर कपूर और जया भादुरी की जोडी. फिर भी बोर हुए. (Memories of theatre)
‘इश्क इश्क इश्क’ पाहून बाहेर पडताना अनेक जण त्रस्त झाल्यासारखे होते. एकदाचा सिनेमा संपला आणि आपण बाहेर पडलोय, आपली जणू सुटका झाली असे भाव अनेकांच्या चेहर्यावर होते. देव आनंदकडून अशी अपेक्षाच नव्हती, असे जेमतेम कोणी म्हणालं इतकेच. देव आनंदचे जुने सिनेमे मॅटीनी शोला पुन्हा एन्जाॅय करणे हा यावरचा उतारा.
‘शालीमार’ बघून बाहेर पडताना कोणी म्हणाले, बोर करती है, कोणी म्हणाले, इंग्लिश पिक्चर की काॅपी है, यह अपनी पिक्चर नही है…झीनत अमान का वेस्टर्न लूक फिल्म को सूट करता है बस और दो गाने अच्छे है. (पूर्वी सिनेमा कसेही असले तरी गाणी हिट असत. सिनेमा विसरला गेला तरी गाणी ओठांवर राहत.)
‘दीदार ए यार’ पाहून बाहेर पडताना कधी बरे एकदा हा सिनेमा विसरतोय असेच अनेकांना झाल्याने जणू अनेकजण भराभर बाहेर पडत होते. या सिनेमाबद्दल अगदी आपसातही बोलण्यात कोणालाही रस नव्हता. खुद्द या सिनेमाचा निर्माता जितेंद्रही अनेक दिवस हा ‘पब्लिक कौल’ पाहून गप्प बसून होता. त्याच्या अख्ख्या करियरमधील हा सणकून फ्लाॅप. अजूनही हा चित्रपट निपचित पडून आहे. कोणीच या पिक्चरची आठवण काढत नाहीत. (Memories of theatre)
कधी ‘अंगूर’, ‘गोलमाल’ अथवा ‘शौकिन’ पाहून बाहेर पडताना एखाद्या विनोदाची छान आठवण अथवा एखादा मिश्किल संवाद. थिएटरबाहेरही झक्कास हलके फुलके वातावरण, तर कधी ‘धुन्द’ पाहून बाहेर पडताना काहींच्या चेहर्यावर आपण क्लायमॅक्सपर्यंत सस्पेन्स ओळखू शकलो नाही, सिनेमा अखेरीपर्यंत पकड कायम ठेवतो याचे समाधान, तरी एखादा मोठ्याने ओरडतो, नवीन निश्चल खुनी आहे….. अशा पध्दतीने सस्पेन्स फोडल्याने पुढच्या शोला आत जात असलेल्या पब्लिकचा रस कमी होतो…. हीदेखील एक चित्रपट पब्लिक संस्कृती.
‘फिर वही रात’ पाहून बाहेर पडताना डॅनी डेन्झोपाने या म्युझिकल रहस्यरंजक सिनेमाच्या दिग्दर्शनात चमक दाखवल्याचे सस्पेन्स सिनेमाच्या चाहत्यांना समाधान. तरीही कोणी पटकन म्हणतो, अरुणा इराणी सगळा ड्रामा करते….अरे पण सस्पेन्स फोडलास ना? आता पुढच्या शोच्या पब्लिकचा दृष्टिकोन बदलला ना?
जसा सिनेमा तसे सिनेमा संपल्यावर रसिकांचे बोलके चेहरे. अगदी एकटा असलेला रसिकही ‘मनातल्या मनात’ या सिनेमाबद्दल काही तरी बरे वाईट बोलतोय हे त्याचा चेहराच सांगे. एखाद्या गोष्टीवर व्यक्त होणे हा मानवी स्वभाव आहे आणि आपल्या देशात सिनेमा आणि क्रिकेट यावर ‘मला काही बोलायचयं’ , ‘मी काय सांगतो ते ऐका’, ‘मी काही तरी वेगळे सांगतोय’ अशा पवित्र्यात राहायला अनेकांना आवडते. ‘ऐकण्याची सवय/गरज असणारे’ तसे थोडेच. (Memories of theatre)
खरं तर ‘ऐकण्याने बरेच काही समजते (पण ऐकतंय कोण?) आणि अडीच तीन तासांचा सिनेमा पाहिल्यावर बोललं तर पाहिजेच. यात एक महत्त्वाचा फंडा असा की, पडद्यावरच्या विश्वात रममाण होणे, हरखून जाणे, हरवून जाणे ही या दृश्य माध्यमाची ताकद. (हातोहाती मोबाईल आल्यावर पडद्याशी असलेल्या एकरुपतेत विघ्न येऊ लागले) आणि सिनेमा संपेपर्यंत डोक्यात बरेच काही साचलेले असतेच असते. ते नेमके सिनेमा संपल्यावर बाहेर येऊ लागते. मग ते सिनेमा आवडला असेल तर सकारात्मक असेल आणि सिनेमामध्ये दम नसेल तर पडद्यासमोरच चुळबुळ सुरु होई. बरं पूर्वीचे सिनेमे मनोरंजनाच्या माध्यमातून प्रबोधन करत, एकादा सामाजिक कौटुंबिक संदेश देत. (‘दोस्ती”चा नातेसंबंधाचा वगैरे) मग ती प्रतिक्रिया पहिली असे. कधी थिएटरबाहेर पडताना एखादा डायलाॅग, कधी एखाद्या गाण्याचा मुखडा/तुकडा, कधी ‘मस्त होता’ अशी बोलकी प्रतिक्रिया. कधी एखाद्या व्यक्तिरेखेचे नाव. “मोगॅम्बो खुश हुआ” ही हिट प्रतिक्रिया. मिस्टर इंडियाची एक ओळख.
=================
हे ही वाचा: इंजिनिअर मुलांनी बनवला रोमँटिक चित्रपट, कोणतंही मोठं नाव नसताना चित्रपट झाला सुपरहिट!
बॉलिवूडमध्ये रिमेक झालेले टॉप १० मराठी चित्रपट
=================
यात अजून एक फंडा आहे. हिट सिनेमाच्या नशिबी हे अनेक आठवडे, अनेक शो येई. फ्लाॅप पिक्चरच्या वाटेलाच पब्लिक कमी कमी येत जाई आणि व्यक्त होणेही आटत जाई. जेवढा जास्त पब्लिक तेवढी विविध वयोगटातून मते. अर्थात, अनेक शहराची, तालुक्यांची आपली एक बोली भाषा असते. त्या भाषेत हे ठिकठिकाणी होई. पण भावना जवळपास सारखीच. (Memories of theatre)
मल्टीप्लेक्स युगात सिनेमा संपल्यावर’ मनापासून बोलणे होत नाही. शो सुरु असतानाच सिनेमा संपल्यावर काय काय करायचे याचा ‘माईंड गेम’ सुरु असतो आणि त्यानंतर मोकळे झालोच, तर फेसबुकवर बोलायचे…. तो संवाद असतो का सांगा? त्या फक्त प्रतिक्रिया असतात. त्यात अस्सल प्रतिसाद नसतो. जो सिंगल स्क्रीन थिएटर्सबाहेर पडताना पब्लिकने व्यक्त केला.