Chhaava : ‘छावा चांगला असला तरी…’ मराठी अभिनेत्रीची सिनेमावर नाराजी

Deewaar : ‘दीवार’ पुन्हा पाहताना…
आपल्या देशातील चित्रपट-प्रेक्षक संस्कृतीतील एक भारी फंडा म्हणजे, आवडलेला चित्रपट कितीही वेळा न कंटाळता पाहणे…त्या चित्रपटाचे वय (म्हणजेच तो फर्स्ट रनला प्रदर्शित झाल्यापासूनच दिवस) कितीही का असेना. त्या वयाशी चित्रपट व्यसनींना काहींही घेणे देणे नसते आणि आपल्याही वाढत असलेल्या वयाच्या आड तो अनेकदा पाहिलेला चित्रपट पुन्हा पाहणे येत नाही… सच्चा चित्रपट रसिकांना वयच नसते. असते ते वेड. (Deewaar)

‘दीवार’ला दक्षिण मुंबईतील रिगल चित्रपटगृहात हाऊसफुल्ल गर्दी झाल्याचे पाहून म्हणूनच मला अजिबात आश्चर्य वाटले नाही. आणि त्यात मीदेखील एक ‘फिल्म दीवाना प्रेक्षक’ म्हणून रांगेत उभा राहिलो आणि त्याच रांगेतून चित्रपटगृहात प्रवेश केला. पूर्वीचे दिवस आणि अनुभव आठवले. रांगेत उभे राहून पिक्चरचे तिकीट हाती येण्यात केवढा आनंद असे. या विशेष खेळाला निमित्त होते, ‘दीवार’ ला पन्नास वर्ष पूर्ण झाली. (Deewaar)
गुलशन राॅय निर्मित व यश चोप्रा दिग्दर्शित त्रिमूर्ती फिल्मचा ‘दीवार’ (Deewaar) मुंबईत २४ जानेवारी १९७५ ला रिलीज झाला. मुंबईत मेन थिएटर मिनर्व्हावरचे दीवारचे एका टोकापासून दुसर्या टोकापर्यंतचे डेकोरेशन आजही माझ्या डोळ्यासमोर आहे. माझ्या पिढीतील अनेक चित्रपट दीवाने ‘थिएटरवरचे डेकोरेशन’ पाहण्यातही एक प्रकारचा आनंद घेत असू… अशाच अनेक गोष्टींनी आपल्या देशात मसालेदार मनोरंजक चित्रपट रुजला. मी अर्थातच पहिल्यांदा ‘दीवार’ मिनर्व्हात पाहिला, तो दिवस होता २८ जानेवारी १९७५. आणि रात्रौ नऊ वाजताचा खेळ होता आणि बाल्कनीचे तिकीट होते चार रुपये. हे मी रिगलबाहेर रांगेत उभा असतानाही एका हिंदी न्यूज चॅनेलला ते तिकीट दाखवून अभिमानाने सांगितले…. (Deewaar)
रांगेत माझ्यासारखेच अनेकदा ‘दीवार’(Deewaar) पाहिलेले पुन्हा एकदा तो पाहण्यासाठी होते. चित्रपट दिग्दर्शक अभिजित देशपांडे यांचीही भेट झाली. ‘स्कायफोर्स’ या चित्रपटाच्या पटकथा लेखक टीममधील पंडित नावाचा एक जण भेटताच मी म्हणालो, दीवारची सलिम जावेद यांची पटकथा व संवाद लेखन हा चित्रपट माध्यमासाठी एक प्रकारचा अभ्यास आहे. यावर तो म्हणाला, या चित्रपटाकडून शिकण्यासारखे बरेच काही आहे… त्याचे म्हणणे मला आवडले. चित्रपट कसा बनवावा,पुन्हा पुन्हा एन्जाॅय करावा यासाठी आपल्या पारंपरिक लोकप्रिय चित्रपटाचा उल्लेख होणे अभिमानास्पद गोष्ट! (Deewaar)

रिगल कुलाब्यातील एका टोकाला असूनही खूप दूरवरुन अनेक चित्रपट रसिक आले होते. त्यात गोवंडीवरुन आलेला राहुल भालेराव भेटला. तो याच रिगलला ‘शोले’च्या विशेष खेळासही आला होता. आवडता चित्रपट प्रवासातील अंतर कमी करते. काही अमिताभ दीवाने निळ्या रंगातील शर्टाला 786 चा बिल्ला लावून आले होते. कम्माल म्हणतात ती हीच. या सगळ्याच गोष्टी चित्रपट रसिक प्रेक्षकांच्या प्रेमाचा एक भाग आहेत. (Deewaar)
‘दीवार’ (Deewaar) पहायला रिगलला अभिषेक बच्चन, दिग्दर्शक राजीव राॅय ( गुलशन राॅय यांचा मुलगा), विवेक वासवानी असे काही फिल्मवाले आले. अभिषेक आपल्या छोट्याश्या भाषणात म्हणाला, मोठ्या पडद्यावर पहिल्यांदाच दीवार पाहतोय. त्याचेही बरोबरच आहे म्हणा. त्याचे वय पाहता त्याने व्हिडिओवर, डीव्हीडीवर दीवार पाहिला असणार… (Deewaar)
पडद्यावर ‘दीवार’चे सेन्सॉर प्रमाणपत्र येताच थिएटरमध्ये सुरु झालेला टाळ्या आणि शिट्ट्यांचा वर्षाव मग चित्रपट संपेपर्यंत सतत होत राहिला. श्रेयनामावलीत सलिम जावेद, संगीतकार राहुल देव बर्मन, दिग्दर्शक यश चोप्रा ही नावे येताच थिएटरमध्ये प्रचंड जल्लोष झाला. आणि मग जवळपास प्रत्येक डायलॉगला टाळ्या… चित्रपट हे दृश्य माध्यम असले तरी आपल्या देशात ते संवाद माध्यम म्हणून जास्त एन्जॉय केले जाते. ‘दीवार’चे अनेक संवाद चपखल आहेत. “दोस्तो के नाम भी होते है” असो अथवा “सुना है लिफ्ट की दीवारो के कान नही होते”…. नेमक्या शब्दात भारी इफेक्ट. आज भी मै फेके हुये पैसे नही उठाता डायलॉगला पडलेल्या टाळ्या कदाचित गेट वे ऑफ इंडियाला पोहचल्या असतील. (Deewaar)

आपल्या देशात चित्रपट पाहणे म्हणजे एक प्रकारचे सेलिब्रेशन असते, पडद्याशी एकरुप होवून त्यात गुंतत जायचे. ‘दीवार’ ने फर्स्ट रनला घवघवीत यश मिळवताना रसिकांच्या एका पिढीचे भावविश्व व्यापून टाकले. ते एकपडदा चित्रपटगृह अर्थात सिंगल स्क्रीन थिएटर्सचे युग होते. गल्ली चित्रपटातही ‘दीवार’ (Deewaar) दाखवणारे मंडळ एकदम फाॅर्मात असे. १९८२ साली देशात रंगीत दूरदर्शन व व्हिडिओ आला. १९९२ साली उपग्रह वाहिन्यांचे युग आले. २००० साली मल्टीप्लेक्स आले ते कालांतराने रुजले. डिजिटल मिडिया आला. यू ट्यूब आले. सतत नवीन पिढी तयार होत गेली आणि त्यासह ‘दीवार’ ही चालत चालत आला. याचे कारण, पिक्चरमध्ये दम असेल तर त्याला कोणीही थांबवू शकत नाहीत. ‘मैने तुझे मांगा’ गाणे सुरु होताच उत्साह निर्माण झाला हे का सांगतोय, तर ‘दीवार’चे संगीत कमजोर आहे इसे तत्कालिन समिक्षकांचे मत होते. चित्रपट चालल्यावर त्याची गाणीही आपोआप चालतात ती अशी….(Deewaar)
दीवार पुन्हा एकदा (कितव्यांदा हा प्रश्न अजिबात महत्वाचा नाही) पाहिल्यावर एका कलाकाराचे नाव समजले हे सांगायलाच हवे. चित्रपटात रवि (शशी कपूर) नोकरीच्या शोधात एक दोन ठिकाणी इंटरव्ह्यू देतो. तेव्हा त्याची एका युवकाची भेट होते (त्याला नोकरीची जास्त गरज आहे हे लक्षात येताच रवि ती नोकरी नको म्हणतो. मासिक साडेतीनशे रुपयांत आपण काम करणार नाही म्हणतो….पन्नास वर्षांपूर्वी ही रक्कम बरीच चांगली होती हा विषय वेगळा). हा युवक कोण? तर रमणकुमार. कालांतराने तो चित्रपट लेखक व दिग्दर्शक झाला. (Deewaar)

१९७५ सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय अशा अनेक दृष्टीने महत्त्वपूर्ण वर्ष. त्यात अनेक चित्रपटही आहेत. अगदी ३० मे १९७५ रोजी प्रदर्शित झालेला ‘जय संतोषी मा‘ हा सामाजिक, पौराणिक चित्रपट असा काही सुपरहिट ठरला की १५ ऑगस्ट १९७५ रोजी दणक्यात पडद्यावर आलेल्या ‘शोले’च्या अक्राळविक्राळ लाटेतही तो टिकून राहिला आणि ‘दीवार’चेही अस्तित्व व महत्व कायम राहिले…म्हणून तर त्याच्या पन्नाशीनिमित्तचा रिगल चित्रपटगृहात खास खेळ हाऊसफुल्ल गर्दीत एन्जाॅय करता आला.(Deewaar)
===============
हे देखील वाचा : Hum : ‘जुम्मा चुम्मा दे दे’ चा वाद केवढा गाजला!
===============
चित्रपट ही हाऊसफुल्ल गर्दीत एन्जाॅय करणारी कला आहे. ती गंमत मोबाईल वा ओटीटीवर एकट्यानेच चित्रपट पाहण्यात नाही. जाता जाता एक विशेष गोष्ट, अनेक नवीन चित्रपट ( अपवाद पुष्पा २, छावा) प्रेक्षकांची वाट पाहत पाहत एकाच आठवड्यात पडद्याआड जात असतानाच पन्नास वर्षांपूर्वीच्या शोले, दीवार यांना हाऊसफुल्ल गर्दी होतेय…(Deewaar)