‘आई तुळजाभवानी’च्या पौराणिक गाथेत उलगडणार एक नवा अध्याय; चिंतामणी पाषाणाचा
60च्या दशकात लता मंगेशकर यांच्यावर कुणी केला विष प्रयोग?
समाजामध्ये विविध प्रवृत्तीचे लोक आपल्याला दिसत असतात. दुसऱ्याच्या उत्कर्षाने आणि यशाने आनंदी होणारे जसे लोक असतात तसेच या उत्कर्षाने ‘जेलस’ होणारे देखील लोक असतात. मत्सर हा बऱ्याच व्यक्तींचा स्थायीभाव असतो. यातून कधीकधी पराकोटीचे पाऊल उचलले जाते. दुसऱ्याचे यश, दुसऱ्याची प्रगती, दुसऱ्याचा आनंद अशा लोकांना बघवत नाही. त्याच्या इतके यश आपण मिळवू शकत नाही या न्यूनगंडातून त्यांच्यातील मत्सरी प्रवृती बळावते. असे मत्सरी लोक ते त्या यशस्वी व्यक्तीच्या प्रगतीमध्ये अडथळे निर्माण करतात. समाजामध्ये असे अनेक लोक तुम्हाला दिसतील. कलाक्षेत्रामध्ये देखील अशा प्रवृत्तीची कमतरता नाही. गानसम्राज्ञी लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांना देखील अशाच एका कटू अनुभवातून साठच्या दशकात जावे लागले होते. लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांच्यावर या काळात चक्क विष प्रयोग करण्यात आला होता. यातून त्यांचं दैव बलवत्तर म्हणून थोडक्यात लता मंगेशकर वाचल्या. एकूणच त्यांच्या आयुष्यातील हा एक कटू अध्याय होता. कुणी केला होता हा विष प्रयोग? काय होती नक्की स्टोरी?
‘लता इन हर ओन्ली व्हाईस’ या पुस्तकामध्ये याचा उलगडा करण्यात आला आहे. लेखिका मुन्नी नसरीन कबीर यांनी लिहिलेल्या या पुस्तकामध्ये लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांनी तो कम्प्लीट एपिसोड सांगितला आहे. १९६२ साली एके दिवशी सकाळी लता मंगेशकर नेहमीप्रमाणे उठल्या. गाण्याच्या रेकॉर्डिंगला जायचं असल्यामुळे त्यांनी आवरायला घेतलं. पण त्या दिवशी त्यांना थोडसं बरं वाटत नव्हतं. थकल्यासारखं वाटत होतं. त्यांनी नाश्ता केला आणि रेकॉर्डिंगला जाण्यासाठी त्या तयार झाल्या. पण लगेच थकवा जाणवला त्यांना चक्कर आली. पाठोपाठ एक मोठी उलटी झाली. त्यानंतर त्या अक्षरश: कोसळल्या. त्यांचे बीपी एकदम डाऊन झाले. पुन्हा एकदा मोठी उलटी झाली. या उलटीमध्ये हिरवट रंगाचे पाणी पडले. लताला वाटले कदाचित आपले पोट बिघडले असावे. परंतु ज्यावेळी थकवा वाढत गेला त्यावेळेला डॉक्टरला घरी बोलवण्यात आले. डॉक्टरने त्यांना तपासले आणि त्यांच्या पोटाचा एक्स-रे केला ते पाहून ते गंभीर झाले आणि त्यांनी लताच्या घरच्या लोकांना सांगितले की,” लता वर कुणीतरी स्लो पॉइजनिंग करत आहे! तिच्या जेवणातून रोज तिला विष दिले जात आहे!” हे ऐकून घरातील सर्व मंडळी हादरून गेली. उषा मंगेशकर यांनी ताबडतोब किचनचा ताबा घेतला आणि किचन मधील सर्व आचारी, वाढपी आणि नोकरांना बोलावून त्यांना सांगितले,” यापुढे दीदीचा स्वयंपाक मी करेन आणि कुणी ही दिदीला काहीही करून खायला द्यायचे नाही. यापुढे लता मंगेशकरच्या (Lata Mangeshkar) संपूर्ण खाण्यापिण्याची जबाबदारी ही माझी राहील!”
त्यानंतर संध्याकाळी एक गोष्ट घडली. त्यांच्या घरातील एक खानसामा त्याचा पगार न घेता कुणालाही न सांगता गुपचूप पणे गायब झाला! त्याचा शोध घेतला तरी तो कुठे सापडला नाही याचा अर्थ तोच आचारी लता मंगेशकर वर विष प्रयोग करत होता. परंतु हा विष प्रयोग कुणाच्या सांगण्यावरून करत होता हे शेवटपर्यंत कळाले नाही. लता मंगेशकर(Lata Mangeshkar) मात्र या स्लो पॉइझनिंग एपिसोडमुळे तब्बल तीन महिने घरात पडून राहिल्या. त्यांना अक्षरशः बेडवरच सर्व काही करावे लागत असेल. या काळात लता मंगेशकर यांना हळूहळू साधे अन्न द्यायला सुरुवात केली. खिचडी, ताक भात, मेतकूट भात असा हलका आहार, पोटाला पचेल असं सात्विक साधं अन्न देऊ लागले.
या काळामध्ये लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांना भेटण्यासाठी रोज गीतकार मजरूह सुलतानपुरी संध्याकाळी येत असत. मजरूह सुलतानपुरी आपलं दिवसभराचं काम आटपून नित्यनेमाने लताशी येऊन बातचीत करत असत. तिला कविता ऐकवत असत गाणी ऐकवत असे विनोद ऐकवत असे. लतासोबत ते देखील तोच आहार घेत असतं. मजरूहच्या येण्याने लताला खूप बरे वाटे. यामुळे लता मंगेशकर यांची तब्येत सुधारायला मदत झाली. हळूहळू लताची तब्येत चांगली होऊ लागली. साठच्या दशकाच्या काळात लता मंगेशकर संगीत क्षेत्रामध्ये टॉपला पोहोचली होती. तिच्याशिवाय हिंदी चित्रपट संगीताचे पान देखील हलत नव्हते. तीन महिने लता मंगेशकरच्या (Lata Mangeshkar) अनुपस्थितीमुळे अनेक संगीतकार यांचे धाबे दणाणले. प्रत्येक जण लता मंगेशकरच्या बरे होण्याची वाट पाहत होता. देवाकडे प्रार्थना करत होता. कारण त्यांचे अनेक प्रोजेक्ट अक्षरशः या काळात रखडले होते.
=====
हे देखील वाचा : ‘या’ चित्रपटातून सुपर स्टार राजेश खन्नाचा पत्ता कट
=====
शेवटी ही कोंडी फोडली संगीतकार हेमंत कुमार यांनी. हेमंत कुमार तीन महिन्यानंतर लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांच्या घरी गेले आणि माई मंगेशकर यांना त्यानी असे सांगितले,” माई, मी लताला आज घेऊन रेकॉर्डिंगला जात आहे. मी स्वतः लता मंगेशकर यांची काळजी घेईल. त्यांना जर थोडा जरी त्रास वाटला तर मी लगेच त्यांना घरी घेऊन येईन. तुम्ही अजिबात काळजी करू नका. लता मंगेशकर यांची तब्येत आता सुधारत आहे!” माई मंगेशकर यांनी हेमंत कुमार यांना परवानगी दिली. हेमंत कुमार यांचा ‘बीस साल बाद’ हा चित्रपट त्यावेळी निर्मिती अवस्थेत होता. या चित्रपटाचे निर्माते आणि संगीतकार स्वतः हेमंत कुमार होते. अशा प्रकारे हेमंत कुमार लता मंगेशकर यांना घेऊन रेकॉर्डिंग स्टुडिओमध्ये गेले. या गाण्याची रिहर्सल तीन महिन्यापूर्वीच झाली होती. लता मंगेशकर देखील आपल्या तब्येतीमुळे थोडीशी काळजीत होती. आपण पहिल्यासारखे जाऊ शकेल की नाही याची त्यांना भीती होती. पण हेमंत कुमार आणि त्यांच्या इतर सहकाऱ्यांनी लता मंगेशकर यांना धीर दिला. गीतकार शकील बदायुनी हे देखील यावेळी रेकॉर्डिंगला उपस्थित होते. सर्वांनी लता मंगेशकर यांना धीर दिला आणि,” दीदी तुम्ही व्यवस्थित जाऊ शकाल!” अशा शुभेच्छा दिल्या. सर्वांच्या शुभेच्छा आणि शुभ आशीर्वादाने लता मंगेशकर गाणे गाऊ शकल्या. गीताचे बोल होते ‘कही दीप जले कही दिल…’ लता मंगेशकर यांच्या जीवघेण्या आजारानंतर त्यांनी गायलेले पहिलंच गाणं जबरदस्त हिट ठरलं. पुढे चित्रपट प्रदर्शित झाला आणि सुपर डुपर हिट झाला. या गाण्यासाठी लता मंगेशकर यांना त्यावर्षीचे फिल्मफेअर अवॉर्ड मिळाले. तसेच या गीताचे गीतकार शकील बदायुनी यांना देखील फिल्मफेअर अवॉर्ड मिळाले. या गाण्याचे संगीतकार हेमंत कुमार यांना या सिनेमा साठी फिल्मफेअरचे नॉमिनेशन मिळाले.(अवार्ड मात्र संगीतकार शंकर जयकिशन यांना ‘प्रोफेसर’ या सिनेमा साठी मिळाले!) या गाण्यामुळे लता मंगेशकर यांचा आत्मविश्वास पुन्हा परत आला आणि पुन्हा एकदा त्यांनी नव्या दमाने आपली सेकंड इनिंग सुरू केली!