
Anwar: हमसे क्या भूल हुयी जो ये सजा हमको मिली…
सत्तरच्या दशकामध्ये गायक अनवर यांनी हिंदी सिनेमासाठी गायन सुरू केले. अतिशय गुणी, मेहनती आणि पार्श्वगायक. मोहम्मद रफी च्या आवाजाशी साधर्म्य असलेला हा स्वर होता. पण त्यांच्याकडून झालेल्या चुकीमुळे त्यांच्या करिअरला ओहोटी लागली. १९७३ साली आलेल्या ‘मेरे गरीब नवाज’ या मुस्लिम सोशल चित्रपटासाठी त्यांनी प्रथम पार्श्वगायन केले. यातील ‘कस्मे हम अपनी जान की खाये हुये चले’ हि गजल त्यांनी अतिशय सुंदर गायली होती. या चित्रपटाचे संगीतकार कमल राजस्थानी होते. रेकॉर्डींग झाल्यानंतर एका स्टुडिओत त्याचे एडिटिंग चालू होते. योगायोगाने तिथेच मोहम्मद रफी यांचे आगमन झाले आणि हे गाणे ऐकून ते देखील भारावून/चक्रावून गेले आणि त्यांनी त्यांच्या असिस्टंटला बोलावून विचारले ‘अरे, ये गाना मैने कब गाया था?’ म्हणजे साक्षात रफीला देखील संभ्रम पडावा तसा अन्वर यांचा आवाज होता.

पुढे हास्यकलाकार मेहमूद यांनी त्यांच्या ‘जनता हवालदार’ (१९७८) या चित्रपटासाठी अन्वर यांचा स्वर सुपरस्टार राजेश खन्ना साठी वापरला. यातील दोन्ही गाणी अतिशय अप्रतिम बनली होती. ‘तेरी आंखो की चाहत में मै तो सब कुछ भुला दुंगा’ आणि ‘हमसे का भूल हुई जो ये सजा हमको मिली’ या गाण्यांच्या लोकप्रियते नंतर अनेक संगीतकारांचे लक्ष अन्वरकडे वेधले गेले आणि त्यांनी आपल्या चित्रपटातून त्याचा स्वर वापरायला सुरुवात केली. कल्याणजी आनंदजी, लक्ष्मीकांत-प्यारेलाल, बप्पी लहरी,अनु मलिक या सर्वांनी अन्वरचा स्वर आपल्या चित्रपटातून वापरायला सुरुवात केली.
दिलीप कुमार, अमिताभ बच्चन, राजेश खन्ना अशा सुपरस्टार पासून कुमार गौरव पर्यंत सर्वांसाठी अन्वरचा स्वर फिट बसू लागला ३१ जुलै १९८० रोजी मोहम्मद रफी यांचं दुःखद निधन झालं. त्यानंतर रफीची रिप्लेसमेंट म्हणून अन्वरचा स्वर वापरला जाऊ लागला. बऱ्याच रसिकांना अन्वर हा मोहम्मद रफी यांचा मुलगा असेच वाटत होते इतके आवाजातील साधर्म्य होते. जिंदगी इम्तिहान लेती है (नसीब) हातो की चंद लकीरो का (विधाता) मोहब्बत अब तिजारत बन गई है (अर्पण) सोनी मेरी सोनी सोनी और नही कोई होणी रब से जियादा तुझे प्यार करता हूं रब मुझे माफ करे मेरा इन्साफ करे (सोहनी महिवाल) कुर्बानी कुर्बानी अल्ला को प्यारी है (कुर्बानी) कोई परदेसी आया परदेस में(हम है लाजवाब) या गाण्यांनी चांगलीच लोकप्रियता मिळवली होती.
================================
हे देखील वाचा : Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..
================================
परंतु अन्वरच्या पार्श्वगायनाचा यशाचा आलेख चढत असताना त्याच्याकडून दोन ठळक चुका झाल्या १९८१ आलेल्या ‘नसीब’ या चित्रपटात अमिताभ बच्चन यांच्यासाठी अन्वर पार्श्वगायन केले होते. गाण्याचे बोल होते ‘जिंदगी इम्तिहान लेती है’ वस्तुतः हे त्रयी गीत होते या गाण्यात त्याच्यासोबत सुमन कल्याणपुर आणि कमलेश अवस्थी यांचा देखील स्वर होता. या चित्रपटाचे निर्माते होते मनमोहन देसाई. त्यावेळी अन्वर यांनी गाण्यासाठी त्यांच्याकडे जास्त पैशांची मागणी केली. मनमोहन देसाई यांना अन्वरची हि कृती पटली नाही. तो राग डोक्यात ठेवला आणि पुढे कधीही अन्वरकडून गाणे गाऊन घ्यायचे नाही असे ठरवलं.

पुढे १९८३ साली आलेल्या ‘कुली’ या चित्रपटापासून त्यांनी अन्वरच्या ऐवजी शब्बीर कुमार यांचा स्वर वापरला ! ऐंशीच्या दशकाच्या सुरुवातीला राज कपूर यांच्या आर के फिल्मसाठी ‘प्रेम रोग’ या चित्रपटाची निर्मिती करत होते. या चित्रपटाला संगीत लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचे होते. यातील नायकावर चित्रित होणारी सर्व गाणी अन्वर गाणार असे ठरले. त्यांच्या रिहर्सल पण झाल्या. परंतु यावेळी देखील अन्वरने राजकपूरकडे जास्त पैशाची डिमांड केली. राज कपूरच्या यांच्या चित्रपटात गायला मिळणे हाच एक मोठा सन्मान असतो. हे अन्वर विसरला. त्याच्या या चुकीची जबरदस्त शिक्षा त्याला लगेच मिळाली.
================================
हे देखील वाचा : ‘या’ सिनेमात पहिल्यांदा मोहम्मद रफी यांनी Rishi Kapoor यांच्यासाठी पार्श्वगायन केले!
================================
‘प्रेम रोग’ मधून त्याची हकालपट्टी झाली त्याच्या जागी सुरेश वाडकर यांचा स्वर ऋषी कपूर साठी वापरण्यात आला. केवळ एका गाण्यात अन्वर चा स्वर सुधा मल्होत्रा सोबत वापरला गेला. (ये प्यार था या कुछ और था..) १ फेब्रुवारी १९४९ रोजी जन्मलेला अन्वर खरोखरच दुर्दैवी ठरला. अतिशय सुरेल स्वर असून त्याला यश नाही मिळालं. मुंबई मिरर ला दिलेल्या मुलाखतीत त्याने सांगितले होते त्याला मध्यंतरी काही काळ चक्क हॉटेलमध्ये गावे लागत होते!